पोलिस उपायुक्तांच्या बदल्या तडकाफडकी रद्द, चर्चेला उधाण

  45

  ✒️मुंबई (पुरोगामी संदेश नेटवर्क)

  ?मुंबई पोलिस दलातील १० पोलिस उपायुक्तांच्या तीन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या बदल्या गृह विभागाने रविवारी तडकाफडकी रद्द केल्या. बदल्यांतील निर्णयाच्या गोंधळामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

  नवी मुंबई व ठाणे महापालिकेतील आयुक्तांच्या दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बदल्यांमुळे प्रशासनातील वाद उघडकीस आला होता. त्यानंतर करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई शहरात दोन किमी अंतरातच मुंबईकरांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी, असा आदेश काढून अनेक वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली होती. ही कारवाई पोलिस आयुक्तांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचनेवरून केली होती. मात्र त्या निर्णयाची माहिती गृहमंत्र्यांना नव्हती. यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आक्षेप घेतल्याचे समजते. त्यानंतर गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिस दलातील उपायुक्तांच्या बदल्या केल्या. बदली झालेल्या ठिकाणी तत्काळ पदभार स्वीकारा, असेही त्या आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार बहुतांश अधिकाऱ्यांनी नवीन ठिकाणी जाऊन पदभार स्वीकारला व कामकाजास सुरुवातही केली. मात्र, लगेचच रविवारी बदली रद्द करण्यात आल्याचे आदेश गृह विभागाच्या वतीने जारी करण्यात आले.

  शासकीय कामकाजासाठी रविवारी सुट्टी असतानाही मुंबईचे पोलिस सहआयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी १० उपायुक्तांच्या बदलीचे आदेश रद्द केले. त्यात त्यांनी १० पोलिस उपायुक्तांनी नवीन ठिकाणचा पदभार सोडावा आणि पूर्वीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे स्पष्ट केले आहे.

  गृह विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयाने संयुक्तपणे बदल्या रद्द केल्या आहेत, असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. पण झालेल्या बदल्या या गृहमंत्र्यांच्या संमतीने झाल्याचे बोलले जात आहे. ज्या पोलिस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यात रश्मी करंदीकर, शहाजी उमप, विशाल ठाकूर, संग्रामसिंह निशाणदार, परमजित दहिया, प्रशांत कदम, गणेश शिंदे, मोहन दहिकर, प्रणय अशोक, नंदकुमार ठाकूर या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी नेमणुकीच्या ठिकाणी रुजू झाले होते.

  अतिरिक्त कार्यभार
  दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करतानाच नवी दिल्ली येथे प्रतिनियुक्तीवर पाठविलेले उपायुक्त अभिनाश कुमार यांच्या पदाचा अतिरिक्त कारभार पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांच्याकडे तर उपायुक्त नियती ठाकर दवे यांच्या पदाचा अतिरिक्त कारभार पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांच्याकडे देण्यात आला आहे.

  मुख्यमंत्र्यांना माहितीच नव्हती
  पोलिसांच्या बदल्यांबाबत २ जुलै रोजी घेतलेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नव्हती, असे कळते. शिवसेनेच्या नेत्यांनी त्यास आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यातही अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतही चर्चा झाली होती.