योद्धा तलवार लपवत नाही-नेता विचार लपवत नाही!

30

आम्ही कांग्रेस विषयी नेहमी नेहमी विचार करतो,लिहीतो, चर्चा करतो. कारण मानसिकता कांग्रेस ची आहे. असे खूप लोक आहेत. पण समोर नेता दिसत नाही. म्हणून मूग गिळून चूप बसतात. बोलावे कोणाला? सांगावे कोणाला?जो तो आपल्या आर्थिक व्यवसायात गडलेला आहे. त्याला वाटते, पक्ष गेला खड्ड्यात! पण आपण निवडून आले पाहिजे. यासाठी तो पैशांनी मतदार खरेदी करणार आहे. म्हणून पोतडी भरण्याचा उद्योग करीत आहे.किराणा दुकान चालवण्याऱ्याला रस्त्यावर उतरून काम करता येत नाही. रस्त्यावर उतरून आंदोलन करता येत नाही. तसे करायला गेले तर इकडे दुकान बंद पडेल किंवा उलगून जाईल. म्हणून दुकान नसलेली माणसेच राजकीय काम करू शकतात. पण आता महाराष्ट्रात तर सगळेच. कांग्रेस आमदार फक्त दुकानदार उरले आहेत. शाळा, कॉलेज, पतपेढी, साखर कारखाना, दवाखाना वगैरे वगैरे. ही माणसे विरोधी पक्षांचा उघड विरोध करू शकत नाही. ही माणसे अधिकारी विरोधात बोलू शकत नाही. कारण उद्याच यांच्या दुकानांची तपासणी सुरू होईल. यांच्या दुकानात फक्त नफा नसतो तर घालमेल, गोलमाल, हेराफेरी, जादूगिरी चालते. यामुळे हे स्पष्ट बोलू शकत नाहीत.

आतापर्यंत अशोक चव्हाण, थोरात, पृथ्वीराज चव्हाण, शिरीष चौधरी, अमित देशमुख, के सी पाडवी ,नाना पटोले कोणत्याही विषयावर आमदारांच्या भुमिकेत बोललेच नाहीत. मंत्री म्हणून तर काहीच काम केले नाही. एकतर बोललेच नाहीत. कधी चुकून बोलले तर असे बोलले कि जे कोणाला कळू नये. कळले तर वांदे होतील. अशी भयग्रस्त माणसे त्यांचा विधानसभा मतदारसंघ सांभाळून असतात. आता तर पैसे देऊन आमदारकी जिंकता येते. तितकी आर्थिक तरतूद करून ठेवली आहे. यांच्या हिशोबाने कांग्रेस जगली काय, मेली काय?काय फरक पडतो?सगळेच विखे पाटील आहेत. कोणी काल ,कोणी आज कोणी उद्या भाजपात, शिवसेनेत जातीलच. काही नाही गेले तरीही कांग्रेस पक्षाला काय उपयोग?जर मतदारसंघ सोडून बाहेर पडत नसतील तर!

मी आधीच सुचना केली होती कि, दुकानदार माणसे आमदार म्हणून संख्या वाढते म्हणून ठिक आहे,पण पक्ष संघटनेत दमदार शिलेदार हवेत. दुकानदार नकोत.दमदार शिलेदारांचा घोडा, तलवार,ढाल,रसद पुरवण्यासाठी ठेवावेत.दुकानदार आणि शिलेदार यांची उपयुक्तता कांग्रेस नेत्यांनी ओळखून त्यांची नियुक्ती केली पाहिजे.आज रोजी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा आप मधे जो जोश आहे, कार्यक्षमता आहे,ती कांग्रेस मधे दिसत नाही. उलट शिथीलता, निरुत्साह, फाटाफुट, पळापळ सुरू आहे.कांग्रेस फुटली, फुटीच्या मार्गावर. अशा बातमीने आणखी प्रतिमा खराब होते. अशोक चव्हाण असो कि आणखी कोणी जर महिने दोन-चार महिने पळापळीच्या बातम्या आल्या तर जास्त वाईट.त्यापेक्षा आझाद सारखे एकदाच काय ते ठरवून निघून गेले पाहिजे.असे हलाल नको, खटका पाहिजे.कांग्रेस च्या नेत्यांमधे एक अहंकार, मग्रूरी आहे.ते बाहेरील माणसाला आत घेत नाहीत.बाहेरील माणसाचे ऐकून घेत नाहीत.त्यामुळे नवीन विचार, भुमिका, धोरण स्विकारत नाहीत. आम्ही अध्यक्ष झालो,कसे झालो ते विचारू नका. आणि अध्यक्ष झालो म्हणजे काहीतरी हुषार असलाच पाहिजे.तर तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवू नका. अशी मनाची कवाडे,बुद्धीचे दरवाजे बंद करून घेतात.

मला संशय येतो.कि कांग्रेस पुर्ण नेस्तनाबूत करण्याचा ठराव पारीत तर झाला नसेल?कारण सगळेच नेते त्याच दिशेने जात असतील तर संगनमताने जात असतील.बरबादीकडे.एका माणसाची बुद्धी जर सतत चार पांच वर्षे चालत नसेल,तो एकाच वर्गात चार वेळा नापास होत असेल तर त्याला शाळेत ठेवणे योग्य नाही. तसे एकाच माणसाला पदाची जबाबदारी सोपवली आणि तो ठोंब्या काहीच करीत नसेल तर का ठेवायचे?त्याला सरकावले पाहिजे,चेसमधील सोंगटी सारखे. निर्बल, निर्बुद्ध, निष्क्रिय,निठल्ला माणूस जास्त दिवस पदावर ठेवणे कोणत्याही पक्षाला हानीकारक असतो.

आता भाजप जरी घवघवीत यश मिळवत असले तरी ते पुंजीवादींच्या मदतीने.पुंजीवादी अंबानी,अदानी यांच्या आहारी भाजप जात आहे.ते जनतेला कळते. चीड येत आहे. पण समोर पर्यायी नेतृत्व नसल्याने भाजपचे फावते.भारतीय असो कि, इतर देशांतील,पुंजी वादी विरोधात जनमत तयार होत आहे. अमेरिकन लोक सामान्य माणूस बराक ओबामा यांना दोन वेळा अध्यक्ष निवडून देतात पण पुंजीवादी ट्रम्प ला पुन्हा नाही.हे ज्वलंत उदाहरण आहे.तिच अवस्था भाजपची होणार आहे.पण इकडे कांग्रेस जनतेचे नेतृत्व करायला सक्षम पाहिजे. इकडेही पुंजीवादी , भांडवली नेते असतील तर त्यांना आणि भाजपला सारखेच समजले जाईल.म्हणून लोक तिसरा,चौथा पर्याय शोधतील.शोधला.आप, तृणमूल,पीआरसी, वायएसआर.
माझ्या जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी तरी जबाबदारीने काम करीत नाहीत.हे मी ठामपणे सांगतो.योद्धा तलवार लपवत नाही.तो रणांगणात आवाहन करतो.नेता तोंड लपवत नाही.तो सर्वांच्या पुढे चालतो.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव