हवेमार्फतही पसरतो करोना विषाणू; शेकडो शास्त्रज्ञांचा दावा

41

✒️नवी दिल्ली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

😷जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी मास्क न घालता फिरत असाल, आणि एखाद्या व्यक्तीपासून शारीरिक अंतर पाळले असेल तर तुमच्या शरीरात करोनाचा विषाणू शिरकाव करणार नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर सावधान…! करोनाचा हा घातक विषाणू हवेमार्फत देखील पसरू शकतो असे जगभरातील शेकडो शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाद्वारे स्पष्ट केले आहे. नोवेल करोना विषाणूचे छोटेछोटे कण हवेत देखील जिवंत राहतात आणि त्याचा देखील लोकांना संसर्ग होऊ शकतो असे एकूण ३२ देशांच्या २३९ शास्त्रज्ञांना आपल्या संधोधनात आढळून आले आहे.

करोना या विषाणूचा संसर्ग हवेमार्फत होत नाही असे या पूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले होते. हा घातक विषाणू केवळ थुंकीतील कणांद्वारे पसरतो असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. हे कण कफ, शिंक आणि बोलण्यामुळे शरीराच्या बाहेर पडतात. थुंकीचे कण इतके हलकेही नसतात जे हवेत तरंगत उडू शकतील. ते लगेचच जमिनीवर पडतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते.
न्यूयॉर्क टाइम्समध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, शास्त्रज्ञांचा नवा दावा काही वेगळेच सांगत आहे. या विषाणूबाबत दिल्या जाणाऱ्या माहितीमध्ये तत्काळ सुधारणा करावी असा आग्रह शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला केला आहे. जगभरात या विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

आतापर्यंत जागतिक स्तरावर १ कोटी १५ लाख ४४ हजारहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. तर ५ लाख ३६ हजार लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. भारतात देखील कोविड-१९ मुळे जवळपास ७ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे. भारतात आतापर्यंत १९ हजार २८६ इतके मृत्यू झाले आहेत. अशात जर हा विषाणू हवेमार्फत पसरू शकतो हा दावा खरा निघाला, तर चिंतेत अधिक वाढ होणार आहे.

शास्त्रज्ञांनी लिहिले पत्र
जगभरातील ३२ देशांमधील या २३९ शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला एक पत्र लिहिले आहे. करोनाचा विषाणू हवेमार्फत परसतो या दाव्याच्या आधारासाठी पुरावे उपलब्ध असल्याचे या शास्त्रज्ञांनी पत्रात स्पष्ट केले आहे. हे पत्र पुढील आठवड्यात सायन्टिफिट जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहे.