टेनिसची अनभिक्षित सम्राज्ञी सेरेना!

29

गेली २५ वर्ष महिला टेनिसवर एकहाती हुकूमत गाजवणारी टेनिसची अनभिक्षित सम्राज्ञी सेरेना विल्यम्स हिने अखेर टेनिसला रामराम केला. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील ऑस्ट्रेलियाच्या अजला टॉमलजानेविच विरुद्धचा सामना हा तिच्या कारकीर्दीतला शेवटचा सामना ठरला. या सामन्यात तिला पराभव स्वीकारावा लागला तरी आपल्या शेवटच्या सामन्यात तिने दाखवलेली जिद्द, उत्साह आणि जिंकण्याची ईर्षा यात काहीही कमतरता दिसली नाही. सामना संपल्यानंतर भावुक झालेल्या सेरेनाने आपल्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना म्हटले की माझ्यासाठी २५ वर्षाचा काळ हा अविश्वसनीय होता. यावेळी तिने तिचा उत्साह वाढवणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानले. निरोपाचे तिचे शब्द ऐकून सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या भाषणाची आठवण झाली.

क्रिकेटमध्ये जे सचिनचे स्थान आहे तेच टेनिसमध्ये सेरेनाचे आहे. दोघांच्याही कारकीर्दीवर नजर टाकली तर अनेक साम्य पाहायला मिळतील. सचिनने तब्बल २४ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले तर सेरेनाने २५ वर्ष. सचिन वयाच्या ४० व्या वर्षी निवृत्त झाला तर सेरेना ४१ वर्षी सचिनप्रमाणेच सेरेनाने अनेक विक्रम रचले. सचिन प्रमाणेच तिनेही लहान वयातच टेनिस खेळायला सुरवात केली. वयाच्या चौथ्या वर्षीच टेनिसची रॅकेट हातात धरलेल्या सेरेनाने लहान वयातच टेनिसमधील आपले कौशल्य दाखवायला सुरवात केली. दहा वर्षाखालील टेनिस स्पर्धेत तिने विजय मिळवत आपली चुणूक दाखवून दिली. १९९५ साली वयाच्या १४ व्या वर्षी व्यावसायिक स्पर्धेत भाग घेतलेल्या सेरेनाने लवकरच यशाची शिखरे गाठली. वयाच्या १७ वर्षी सेरेनाने अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकून पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. अंतिम फेरीत तिने मार्टिना हिंगिस सारख्या दिग्गज खेळाडूचा पराभव केला होता. त्यानंतर तिने तब्बल २३ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला. यादरम्यान एकाच वर्षात चार ग्रँडस्लॅम आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून गोल्डन ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याचीही किमयाही तिने केली.

आपल्या समकालीन सर्व खेळाडूंचा पराभव करून तिने जवळपास २५ वर्ष तिने टेनिसवर एकहाती राज्य करून स्टेफी ग्राफ, मार्टिना नवरतिलोवा, ख्रिस एव्हर्ट यासारख्या महान खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवले. कोणताही खेळाडू सलग २५ वर्ष कोणत्याही खेळात एकहाती हुकूमत गाजवू शकत नाही. वयाच्या ३० व्या वर्षापासून खेळाडूंची कारकीर्द उताराला लागते. मात्र सेरेनाने वयाच्या ४१ व्या वर्षापर्यंत कारकीर्द गाजवली. इतकी दीर्घ कारकीर्द राखण्यासाठी प्रचंड फिटनेस राखावा लागतो. सेरेनाने तो राखला यासाठी तिला सलाम करावाच लागेल. हे केवळ फिटनेसनेच साध्य होते असे नाही तर त्यासाठी प्रचंड, जिद्द आणि चिकाटी लागते सेरेनाने ती दाखवली. या दरम्यान तिला अनेकदा टिकेलाही सामोरे जावे लागले. तिचे कपडे, तिची ताकद आणि तिचा वर्ण यावरून तिला अनेकदा ट्रोलही केले गेले मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले त्याचेच फळ तिला मिळाले. वयाच्या पस्तिशीत तिला प्लमनरी आंबोलिझम हा दुर्मिळ आजार झाला. या आजारात फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या होतात. हा आजार झाल्यावर तिची कारकीर्द संपली असे म्हटले गेले मात्र जिद्दी सेरेनाना या आजारावर देखील मात केली. लग्नानंतर तिने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. लग्न आणि मुले झाल्यावर महिला खेळाडूंची कारकीर्द संपते असे मानले जाते मात्र सेरेनाने दोन जुळ्या मुलींची आई झाल्यानंतरही अनेक ग्रँडस्लॅम जिंकून सुपर मॉम झाली.

सेरेना ही केवळ एक खेळाडू नाही तर ती एक प्रेरणास्रोत आहे. तिच्याकडून प्रेरणा घेऊनच अनेक मुलींनी टेनिसमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. आज ती निवृत्त झाली असली तरी एक महान खेळाडू म्हणून तिचे नाव इतिहास नोंदले गेले आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत, ताकद आणि जिंकण्याची ईर्षा या शब्दांचा पर्यायी शब्द बनलेल्या सेरेना विल्यम्सला निवृत्तीनंतरच्या आयुष्याला शुभेच्छा!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५