🔸खेड्यातील लेक🔸

7

पंख असते जर का मला ग आई
उडू नी तूजपाशी मी आले असते
काय काय शिकले मी नवीन ग आई
प्रथम तुलाच ग सांगितले असते..

मंदबुद्धी म्हणून लोकांनी
जेव्हा मला हिणवले होते
तू सांगितले नाही मला पण
तेव्हा तुझे मन दुखावले होते.

शब्दांची थोडी सांगळ घातली
नी वाचायला सगळ्यांना दिली
बघ ना ग आई चहूकडे नी मग
कौतुकाची थाप च कानी आली…

तेच घरातले साहित्य पण
आज मी नवे पदार्थ बनविते
कस सांगू आई तुला मी
थोड़ कौतुक आता माझ ही होते..

तूजपाशी असतांना काश मी
हे सारेच ग शिकले असते
तुझ्या चेहर्‍यावरचे भाव जरा मी
या नयनांनी टिपले असते..

खेड्यातली पोर ही हिला काय येते
असे म्हणून लोक मला ग हिणवायचे
खर सांगू आई तेव्हा
काळजाचे ग माझ्या
तुकडे तुकडे व्हायचे..

आज थोड थोड करत मी ही
शहरातल्या गोष्टी शिकले
खर सांगू आई आज एक
वेगळेच समाधान झाले..

काय शिकवलस भाऊ तू पोरीला
असे टोमणे बाबूजीं ना दिले गेले
खर सांगते आई तेव्हा त्याचेही
शब्दात उत्तर द्यावेसे वाटले..

शब्दाने उत्तर देण्यापेक्षा कर्माने उत्तर दे
हे मज आत्या बाई ने शिकविले
सांग आई आज बाबूजीं ना
मी खूप काही शिकले..

अजुनी पुढे मला ग आई
खूप काही शिकायचे आहे
डोळ्या मधली चमक तुझ्या ग
डोळ्यात माझ्या साठवायची आहे..

पैश्या खेरीज ह्या जगात ग आई
कुठलीच कला मौल्याची नसते
जिथून येतात दोन पैसे हातात
हे जग त्यालाच महत्व देत असते …

लेक तुझी मी खेड्या मधली
अजुन बरेच काही शिकणार आहे
येईल पगार माझ्याही हाता वरती
ही जिद्द उराशी मी बाळगली आहे..

आज जर का पडली मी तर
उठूनही मी च उभी राहणार आहे
विखुरलेल्या माझ्या मी ला
मी च स्वतः सावरणार आहे..

लेक तुझी मी खेड्या मधली 
अजूनही पुढे शिकणार आहे
शर्यत आहे ही स्वतःशीच
अजूनही मी लढणार आहे…

                        शब्द माझे..
सौ आरोही भारत मलकवाडे
( शुभांगी ओ कांबळे)