आयटीआय प्रवेशास १७ तारखेपर्यंत मुदत वाढ

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.7सप्टेंबर):-नुकताच दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय द्वारा प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिलेली आहे. ही प्रवेश प्रक्रिया १७ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. नुकताच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतल्या गेलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तीर्ण उमेदवारांची संख्या लक्षात घेता राज्यभरातील शासकीय आयटीआय मध्ये पुढील शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश निश्चित करणे दि.७ ते ११ सप्टेंबर पर्यंत राहणार आहे.

तर सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी दिनांक ११ सप्टेंबर पासून समुपदेशन फेरीची प्रक्रिया सुरू होईल. नोंदणीकृत उमेदवारांनी १३ते१७ यादरम्यान संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यक्तीश: हजर राहून समुपदेशन फेरीकरिता हजेरी नोंदवावी. नोंदवलेल्या उमेदवारांमधून संस्थास्तरावर गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्यानुसार प्रवेशासाठी उपलब्ध जागा लक्षात घेऊन त्याच दिवशी उमेदवारांना प्रवेशासाठी जागांचे वाटप करण्यात येईल आणि प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही करण्यात येईल. संपुर्ण प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून प्रवेशाची सविस्तर माहिती itiadmission@dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंखे यांनी केले आहे.