शिक्षक आणि संस्कार

90

सध्याची परिस्थिती म्हणजे भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतरची सर्वाधिक समस्या असणारी आहे असे म्हणावे लागेल.सकाळी वर्तमानपत्र हाती घेतले की ,पहिल्या पानावर चोरी, खून, मारामारी, बलात्कार, भ्रष्टाचार, व्यभिचार, बॉम्बस्फोट, दहशतवाद यांच्या सारख्या भरपूर बातम्या आपल्याला दिसतात. आणि याही पलीकडे आता कोरोना या विषाणूमुळे जगाची झालेली दैना आपल्या डोळ्यासमोर ताजी आहे. आणि त्यामुळे शिक्षणाचा झालेला खेळखंडोबा सर्वश्रुत आहे………..

जो व्यक्ती विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्ये रुजवितो आणि त्याला सुसंस्कारित माणूस घडवितो त्या गुरुप्रती आपण आदर व्यक्त करतो. मग एवढी नीतिमूल्ये रुजवून देखील दिवसेंदिवस असे बरेच अपराध का वाढत आहे.माणूस पुर्णतः हरवला आहे.माणूस हा पशुसारखा वर्तन करत आहे. माणसामधील माणुसकी कमी होत आहे. ज्या गुरूने सुसंस्कार दिले त्याची पुर्णतः वाट लागली आहे.काही व्यक्ती सोडले तर असंस्कृत व्यक्तीचाच भरणा भारतीय समाजात अधिक वाढत आहे. या व्यक्तींना आपण करत असलेले कृत्य चांगले की वाईट हे समजण्याचे भान सुद्धा राहिलेले नाही. जनावरांसारखे वर्तन अंगिकरून हे लोक जीवन जगत आहेत आणि याचे परिणाम आपल्या सर्व समाजाला ,देशाला भोगावे लागत आहे.

मग आज आपण शिक्षक या सर्व गोष्टीला जबाबदार आहे का?. की शिक्षक मूल्ये रुजविण्यात कमी पडले का? असा विचार करतो.पण आपणास असे म्हणता येणार नाही. कारण हा प्रश्न कायमस्वरूपी सुटू न शकणारा आहे. मुलं जेव्हा कुटुंबात जन्मते, मोठे होते तेव्हापासून त्यांच्यावर संस्कार पडत असतात. मुलं जसजसे मोठे होते तसतसे ते अनुकरणाने शिकत असते.आणि अनुकरणातून त्यांच्यावर तसे संस्कार आपोआप रुजले जातात. म्हणुन कुटुंब प्रमुख या नात्याने आई, वडील किंवा कुटुंबातील इतरही व्यक्ती आपल्या मुलांवर संस्कार पाडण्याच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या सहभागी असतात.

असो आज देशात जरी अराजकता असली तरी उद्याची पिढी कशी सुजाण नागरिक घडेल या प्रक्रियेत शिक्षकासोबत आपण पालकही सहभागी होऊया.आपल्या घरातील आनंदी वातावरण, खेळीमेळीच्या वातावरणात संभाषण, विविध कार्यक्रम, प्रसंग,सण,समारंभ, इ सारख्या अनेक गोष्टीं मुल घडविण्याच्या प्रक्रियेत महत्व पूर्ण असते.कारण या सर्व प्रकारातून मुलांवर विविध प्रकारे प्रभाव पडतो. नातेसंबंध, मित्र,शेजारी एकमेकांचे सुख दुःख आदी गोष्टी मुले अश्या प्रसंगातून अनुभवत असतात.यामध्ये मुले आपल्याशी व इतरांशी सुद्धा प्रेमाने वागण्यास सुरवात करतात. त्यांना असलेल्या अडचणी आपल्या समोर दिलखुलास मांडतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढतो.आपण बऱ्याच वेळा विद्यार्थी आत्महत्या हा प्रकार वर्तमानपत्रात वाचतो.तो या सर्व गोष्टीचा अभाव असल्यामुळे होतो.म्हणुन गुरुप्रती नुसता आदर व्यक्त करून चालणार नाही तर आपणही आपल्या सर्वांच्या गुरूने हाती घेतलेल्या या महान कार्याला हातभार लावूया.

मुले शाळेत जायला लागली की त्यांच्या बऱ्याच नकारार्थी गोष्टीला शिक्षकांना जबाबदार धरले जाते. पण आपणा सर्वांना माहीत आहे की,” जसे पेरलं,तसे उगवेल” ही म्हण सर्वश्रुत आहे. त्यामुळे जन्मापासून तर शाळेत येण्याच्या काळापर्यंत कुटुंबात जर मुले चांगली रमली,खेळली,बागडली तर निश्चितच ती शाळेत सुद्धा बहरेल.शाळा सुद्धा एक कुटुंब आहे ही भावना त्यात लवकर दृढ होईल.घरातील संस्कार हे शाळेतील संस्काराशी रममान होईल. म्हणजेच शाळेतून एक चांगली पिढी निघावी यासाठी आपली असलेली इच्छा नक्की पूर्ण होईल.

म्हणून आजच्या याक्षणी एवढीच शपथ घेऊया की,समाजाचा घटक म्हणून फक्त शिक्षक नव्हे तर आम्ही सर्व पालक,आई,वडील, भाऊ,बहीण,मित्र,नातेवाईक सुद्धा सुजाण नागरिक घडविण्याच्या प्रक्रियेत स्वतःहुन सहभागी होऊया व शिक्षक करीत असलेल्या कार्यात सहकार्य करून येणारी पिढी कशी जबाबदार व सुजाण नागरिक बनेल यासाठी प्रयत्न करूया.हीच खरी शिक्षकांप्रती आदराची भावना ठरेल!!!

✒️श्री अविनाश अशोक गंजीवाले(शिक्षक)जि. प. शाळा, करजगाव पं. स. तिवसा जि. अमरावती