गांजा शेतीवर स्थानिक गुन्हे शाखेची धाड — म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

34

सातारा (जिल्हा प्रतिनिधी-मो.9763526231)

सातारा(दि-6 जुलै):-बनगरवाडी (ता. माण) येथील शिंगाडेचे शेत नावाच्या शिवारामध्ये एका व्यक्तीने गांजाची शेती केली असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला समजली होती. त्यानुसार सातार्‍यातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड पोलिसांनी त्या गांजाच्या शेतीवर धाड टाकली. यावेळी गांजाच्या झाडांची पाने तोडत असताना तिघेजण आढळून आले. या तिघांचीही विचारपूस केली असता ही झाडे गांजाची बाजारात विक्री करण्यासाठी लावण्यात आल्याची कबुली दिली.

जिल्ह्यात मागील काही वर्षातील प्रथमच अंमली व मादक द्रव्याची सर्वात मोठी कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून गांजासारख्या अंमली पदार्थ तयार करण्यास शासनाचा प्रतिबंध असतानाही बनगरवाडीमध्ये गांजाची शेती करुन त्याची तस्करी करणार्‍या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर अंमली व मादक द्रव्य पदार्थांच्या तस्करीविरोधी गुन्ह्याची नोंद म्हसवड पोलिसांत झाली आहे.हि कारवाई काल दिनांक 5जुलै रोजी करण्यात आली.