शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष आक्रमक

33

🔹कोरपना तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा धडकला

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.16सप्टेंबर):-कोरपना तालुक्यातील व चंद्रपूर जिल्हयातील शेतक-यांच्या विविध ज्वलंत मागण्यांची तातडीने पूर्तता करून न्याय मिळावा, यासाठी आज दिनांक १६ सप्टेंबरला कोरपना तालुका शेतकरी संघटना, महिला आघाडी व शेतकरी युवा आघाडी तसेच स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने कोरपना बसटाॅप ते तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. चालू वर्षातील पावसामुळे ढगफुटी, अतिवृष्टी आणि नद्या व नाल्याच्या महापूरामुळे शेतक-याच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून जमीनी खरडून गेल्या आहेत. वन्य प्राण्यांचा प्रचंड उपद्रव वाढलेला आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे .

आधीच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत रास्तभाव मिळत नसल्यामुळे शेतीत बचत नसल्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला असून आधीच कर्जापायी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे आता तातडीने शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांची पूर्तता करावी, यासाठी कोरपना बस स्थानकापासून तहसील कार्यालयावर निघालेल्या भव्य मोर्चाने धडक देऊन तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन दिले.

मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते माजी आमदार अँड. वामनराव चटप, जिल्हा प्रमुख अरुण पाटील नवले, महिला जिल्हाप्रमुख सौ.ज्योत्स्ना मोहितकर, पौर्णिमा निरंजने, रमाकांत मालेकर, नीळकंठ कोरांगे, अविनाश मुसळे, सय्यद शब्बीर जागीरदार, सविता काळे, बंडू पाटील राजूरकर, प्रवीण सावकार गुंडावार, अनंत गोडे, देविदास वारे, श्रीनिवास मुसळे, खुशाल सोयाम, भास्कर मत्ते, विलास धांडे, सुदाम राठोड, संजय येरमे, डॉ.नि.बा.मोहितकर, रवी गोखरे, संध्या सोयाम, गणपत काळे,मदन पाटील सातपुते, सय्यद इस्माईल, सत्यवान आत्राम, प्रभाकर लोडे, पांडुरंग वासेकर , नरसिंग हामने यांचेसह अनेक पदाधिकारी यांनी केले.

ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून तात्काळ न्याय मिळविण्याचे हेतूने मोर्च्याद्वारे निवेदन देऊन अनेक मागण्या करण्यात आल्या. कोरपना , जिवती, राजुरा,गोंडपिपरी तालुके व चंद्रपूर जिल्हा शासनाने तात्काळ ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, पुरबाधीत व अतिवृष्टी बाधीत शेतक-याचे सर्व पिक कर्ज व शेतीपंपाचे वीजबिल माफ करण्यात यावे, विदर्भाचे स्वतंत्र राज्य तात्काळ केंद्र सरकारने निर्माण करावे, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करून तात्काळ वाटप सुरु करावे, राज्य शासनाने नियमीत कार्ज भरणा-या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदानाची रक्कम तात्काळ वितरीत करावी, वनहक्क कायद्यातील वनजमिनीवरील अतिक्रमण नियमीत करून पट्टे देताना असलेली तीन पिढ्याची अट रद्द करून तात्काळ पट्टे देण्यात यावे, शेतमालावर केंद्रसरकारने लादलेला जीएसटी तात्काळ मागे घेण्यात यावा, विजेची दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, शेतकऱ्यांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे, कोरपना तालुक्यातील विरूर येथील शिल्लक राहिलेली १७ % जमीन व राजुरा तालुक्यातील सास्ती गावातील शिल्लक १६ % जमिनीचे वेकोलीनी तात्काळ अधिग्रहण करावी.

वन्य जीव सुरक्षा कायद्यात साप हा वन्यजीव असून पकडल्यास वा मारल्यास २ वर्षाची शिक्षेची तरतूद असल्यामुळे साप चावून मरणाऱ्या व्यक्तीचे कुटुंबास इतर वन्य प्राण्याप्रमाणे आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी, वन्य प्राण्यांचे शेतीतील पिकातील उपद्रव वाढले असून सतत उभे पिक शेताशेतात घुसून नष्ट केले जात आहे, त्यामुळे वण्याप्राण्याचा बंदोबस्त करण्याकरिता शेतकऱ्यांना सौर उर्जा कुंपणाचे याथाशिघ्र वाटप करण्यात यावे, जीवती येथे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी तथा व्यवहार न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालय तत्काळ मंजुरी प्रदान करून सुरु करण्यात यावे, गडचांदुर – आदिलाबाद रेल्वे मार्ग तात्काळ मंजूर करावा या मागण्यांचा निवेदन देण्यात आले. मोर्चात कोरपना तालुक्यातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.