आखेर त्या वादग्रस्त १४ गावांच्या सिमांकन मोजणीला मुकदमगुडा येथून सुरवात

40

🔸१५ सप्टेंबर पासून महसूली मोजणीला सुरूवात

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.17सप्टेंबर):– जिवती तालुक्यातील मुकदमगुडा येथे महाराष्ट्र तेलंगाना सीमावादात अडकलेल्या त्या वादग्रस्त १४ गावांच्या जमीनमोजणी संदर्भात आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत महसूल विभाग व भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांची समन्वय सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.तालुक्यातील एकूण ८३ महसूली गावांपैकी फक्त ७५ गावांचा रेकॉर्ड महसूल विभाग तसेच भुमी अभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध आहे. परंतु आठ महसूली गावे व सहा गुडे अशा एकूण १४ गावांतील २,३८७ हेक्टर जमीनीचे रेकॉर्ड मागील ४० वर्षापासून उपलब्ध नाही. आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने आता हे शक्य होणार आहे.

या वादग्रस्त १४ गावांच्या सिमांकन मोजणीला १५ सप्टेंबर पासून मुकदमगुडा येथून सुरुवात करण्यात आली आहे.३० सप्टेंबर पर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम राबविण्यात येणार असून यात १४ गावांची जमीन मोजणी करण्यात येईल. सदर कार्यक्रमात नागरिकांच्या प्रत्यक्ष वहिवाटी नुसार गावांचे व शेतीचे सिमांकनाचे नकाशे तयार करण्यात येणार आहेत. व यांची भूमी अभिलेख विभागाच्या दस्त ऐवजात सर्वांच्या नोंदी घेण्यात येतील.यावेळी मोजणीसाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख चंद्रपूर तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख जी.अ. भू. अभिलेख चंद्रपूर कार्यालयातील गणेश मानकर व जिवती कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.