नांदगाव पेठ येथील कोरोनामुक्त महिलेच्या कुटुंबावर अप्रत्यक्ष बहिष्कार

  47

  ?लेखी तक्रार आल्यास संबंधितावर कारवाई करू-पो.नी. गोरखनाथ गांगुर्डे

  ?पीडित महिलेचा कुटूंबियांची तब्बेत ठणठणीत-डॉ. रवींद्र सिरसाट

  ✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हाप्रतिनिधी)

  मो:-9545619905

  अमरावती (दि:-6जुलै)येथून जवळच असलेल्या नांदगांव पेठ  येथे दीड महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या येथील एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांच्या वतीने अप्रत्यक्षरीत्या बहिष्कार टाकण्यात आल्याची खळबळ उडवून देणारी घटना  मध्ये उघडकीस आली आहे.याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र सिरसाट म्हणतात संबंधीत महिलेचा कुटूंबाची तब्बेत ठीक असून कोरोना बाबतचे कुठलेही लक्षण नाही.तर पो.नि.गांगुर्डे यांनी तक्रार आल्यास संबंधितावर कारवाई करू असे सांगितले. या घटनेमुळे अमरावती विभागा सह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.

  कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तब्बल एक महिना स्वतःहून होम क्वारंटाईन राहून सुद्धा आता ती महिला किंवा कुटुंबीय घराबाहेर निघाल्यानंतर त्यांना लोकांच्या हीन भावनेचा सामना करत शाब्दिक मारा सुद्धा सहन करावा लागतो आहे.विशेष म्हणजे येथील आरोग्य उपकेंद्रात नेत्र तपासणी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या मुलास सुद्धा नेत्र चिकित्सकांनी हीन वागणूक दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.सदर महिला नांदगाव पेठ या गावची मुलगी असून आपल्या पती व मुलासह अनेक वर्षांपासून याठिकाणी वास्तव्यास आहे. दोघे पती पत्नी संघर्षमय जीवन जगत आहे. स्थानिक खासगी रुग्णालयात ते काम करतात. दीड महिन्यांपूर्वी ती महिला पॉजीटीव्ह आढळली होती,उपचारानंतर ती महिला गावात आली तेव्हा अनेकांनी तिला व कुटुंबातील सदस्यांना वास्तव्यास असलेला परिसर सोडून इतरत्र कोठेही क्वारंटाईन राहण्यासाठी दबाव आणला.

  सुरुवातीला महिलेच्या पतीला आणि मुलाला येथील सरपंच दिगंबर आमले यांनी सहारा दिला.महिला कोरोनामुक्त झाल्यानंतर येथील नागरिक सुभाष राऊत यांनी त्या कुटुंबाला स्वतःच्या घरात आसरा दिला.एक महिना स्वतः आणि कुटुंबीय होम क्वारंटाईन राहले मात्र जेव्हा महिला किंवा घरातील इतर सदस्य काही कामानिमित्त घराबाहेर पडले तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलून गेला.
  ती महिला दिसताच लोक आपला रस्ता बदलायला लागलेत, बाहेर का फिरतेस, तू कोरोना पॉजीटीव्ह आहे, आम्हाला मारायला बाहेर निघाली का अश्या असह्य शब्दांचा मारा तिला दररोज सहन करावा लागतो. नातेवाईकांनी बोलणे सोडले, दीड महिन्यात कोणी साधी विचारपूस देखील करायला न आल्याने ती महिला आणि कुटुंब अगदी अस्वस्थ झाले आहे.महिला ऑटो मध्ये बसली तर ईतर प्रवासी तीला पाहून त्या ऑटोमध्ये बसणे टाळतात. मुख्य बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी या महिलेचा मुलगा नेत्र तपासणी साठी आरोग्य उपकेंद्रात गेला तेव्हा त्याला काही वेळ बाहेरच उभे ठेवण्यात आले,त्यानंतर नेत्र चिकित्सकाने दुरूनच टॉर्चने तपासणी केली व औषध लिहून परत पाठविले.आरोग्य विभाग जर अश्या पद्धतीची वागणूक देत असेल तर दोष कुणाला द्यायचा असा त्या महिलेने प्रश्न उपस्थित केला.
  पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या या प्रकारावर तसेच लोकांच्या बहिष्कृत मानसिकतेवर आळा घालता येईल अन्यथा भविष्यात मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  ?दररोज येतात आत्महत्येचा विचार:-संबंधित महिला

  बालपण या गावात गेलं,लहानाची मोठी झाली,बेताची परिस्थिती असल्याने लग्नानंतर पतीसोबत याठिकाणी राहून संघर्ष करीत संसाराचा गाडा ओढत आहे, कोरोना अहवाल निगेटिव्ह आहे तरीसुद्धा एक महिना स्वतः आणि कुटुंब होम क्वारंटाईन राहले,तरीपण बाहेर निघाल्यानंतर काही लोक टोमणे मारतात, मेली का नाहीस,आमच्या परिसरात येतेस आता आम्हाला मारशील का? असे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा मनात केवळ आत्महत्येचे विचार येतात असे पीडित महिलेने माध्यमांना सांगितले.

  ?बहिष्कृत भावना बाळगणे अत्यंत चुकीचे:-डॉ.रवींद्र सिरसाठ

  महिलेची आणि तिच्या कुटुंबियांची तब्येत ठणठणीत आहे. कोरोनाचे कुठलेही लक्षण त्यांच्यामध्ये नाही. शिवाय कोरोना बरा होणारा आजार आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे मात्र अश्याप्रकारे बहिष्कृत भावना बाळगणे अत्यंत चुकीचे आहे.

               -डॉ. रवींद्र शिरसाठ, वैद्यकीय अधिकारी
                  प्रा. आ.केंद्र माहुली जहाागीर

            

  ?….तर कायदेशीर कार्यवाही करू:-पो. नि.गांगुर्डे

  कोरोनामुक्त झाल्यानंतर नागरिकांनी महिलेला अश्या प्रकारे बहिष्कृत वागणूक देणे हा गुन्हा आहे.ही बाब अत्यंत गंभीर असून यामुळे त्या महिलेच्या मनावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतात.महिलेने नावानिशी तक्रार दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही केल्या जाईल. समाजातील चांगल्या नागरिकांनी अश्यावेळी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

                    -गोरखनाथ गांगुर्डे, पो.नि.नांदगांव पेठ