केसांचा भांग पाडणारी फॅशनेबल हत्तीण ठरतेय चर्चेचा विषय

41

हत्ती हा सर्वात हुशार प्राण्यांपैकी एक समजला जातो. हत्ती अनेक गोष्टी लक्षात ठेवतो असं सांगितलं जातं. याच हुशारीच्या जोरावर हत्ती आणि त्याची देखभाल करणाऱ्या व्यक्तीचं खास नातं तयार होतं असंही अनेक संशोधनांमध्ये दिसून आलं आहे. हत्तीला जेवढं प्रेम द्याल, त्याची जेवढी काळजी घ्याल तितकचं प्रेम तो तुम्हाला देतो असं अनेक प्राणी अभ्यासक सांगतात. आजपर्यंत तुम्ही अनेकांना हत्त्तीची काळजी घेताना त्याला वेळेत खायला देणं, त्याला अंघोळ घालणारे महुत असं सारं बघितलं असेल मात्र सध्या तामिळनाडूमध्ये एका अगदीच स्टायलिश हत्तीची चर्चा आहे. या चर्चेला कारणही तसे खास आहे कारण या हत्तीच्या डोक्यावरील केसांचा चक्क भांग पाडला जातो. होय हे खरं आहे या हत्तीणीचं नाव आहे सेंगामल्ला.

तामिळनाडूमधील थिरुवारुर जिल्ह्यातील मन्नारगुडी येथील राजगोपालस्वामी मंदिरामधील ही हत्तीण ‘बॉब- कटींग सेंगामल्ला’ नावाने प्रसिद्ध आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिस असणार्या सुधा रामेन यांनी ट्विटवरुन सेंगामल्लाचे काही अगदी गोंडस फोटो शेअर केले आहेत. “ती बॉब- कटींग सेंगामल्ला नावाने लोकप्रिय आहे. तिच्या केवळ हेअरस्टाइलचा मोठा चहाता वर्ग आहे. तुम्ही तिला पाहण्यासाठी तामिळनाडूमधील थिरुवारुर जिल्ह्यातील मन्नारगुडी येथील राजगोपालस्वामी मंदिरात जाऊ शकता,” असं सुधा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पाच जुलै रोजी सुधा यांनी शेअर केलेली ही पोस्ट पाहता पाहता व्हायरल झाली. दोन दिवसांच्या आत ४ हजार ९०० हून अधिक जणांनी ही पोस्ट शेअर केली असून २९ हजारहून अधिक जणांनी ही पोस्ट लाइक केली आहे. अनेकांनी कमेंट करुन सेंगामल्ला खूपच गोंडस दिसत असल्याचे म्हटले आहे. तर या हत्तीणीला पहिलेल्या काही जणांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. अनेकांनी ही हत्तीण प्रत्यक्षातआणखीन सुंदर दिसते असं म्हटलं आहे. राजगोपालस्वामी मंदिरात जाणारे अनेकजण आवर्जून सेंगामल्लाचं दर्शन घेतात. इन्स्टाग्रामवरही सेंगमल्लाचे खूप फोटो आहेत.

सेंगमल्लाच्या या लोकप्रिय हेअरस्टाइलसाठी तिचा महूत एस. राजगोपाल खूपच मेहनत घेतो. ही हेअरस्टाइल करण्यासाठी खूपच संयमाची गरज असते. मात्र त्या संयमाचे फळ सेंगमल्लाच्या वाढल्या लोकप्रियतेमधून दिसून येतं असं म्हणता येईल.