सेनेचे जहाज भरकटले,आदळले,फुटले

13

राजकीय पक्ष काही ध्येय धोरण घेऊन जन्माला येतो.जसा कांग्रेस हा स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी.भाजप हा हिंदुत्वासाठी.शिवसेना मराठी माणसासाठी.आप प्रामाणिक शासनासाठी.हे पक्ष यशस्वी होतात.मोठे होतात.लोकांच्या पसंतीला येतात.निवडून सत्तेवर येतात.नियंत्रण आणि तिजोरी हातात येते.तेंव्हा चाचे,चोर,तस्कर,स्मगलर पक्षात शिरतात.पक्षनेत्याला पैसा, प्रसिद्धी देतात.तेंव्हा नेता स्वार्थाने आंधळा बनतो.शिलेदारांना डावलून या चोरांना बगलेत घेतो.हे चोर कच बनून नेत्यांच्या पोटात शिरून विद्या शिकतात.मोठे होतात.शुक्राचार्यांचे पोट फाडून बाहेर येतात.तिच परिस्थिती शिवसेनेची झाली आहे. चोर,चाचे,स्मगलर केंव्हा,कसे पक्षात शिरले कि मुद्दाम घेतले हे नेत्यांच्या लक्षात आलेच नाही.जेंव्हा ते मधे पक्षात मोठे झाले तेंव्हा त्यांनी पक्ष फाडला.ते बाहेर पडले.याचा अनुभव बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे यांना आला आहे.पक्षातील उपनेता सुखरूप बाहेर येतो तेंव्हा जास्त वेदना होत नाही.पण जेंव्हा तो पक्ष फाडून बाहेर येतो तेंव्हा मात्र नेत्याला भयंकर वेदना होतात,यातना होतात.बरे झाले! गद्दार बाहेर पडले.असे जरी वरकरणी म्हणत असले तरी ते स्वताची समजूत घालून घेण्यासाठी असते.या वेदना उद्धव ठाकरे यांना होत आहेत.अतिभयंकर वेदना होतात. आता शिवसेना आज या अवस्थेत जात आहे.आपलाच सहयोगी उपनेता आपलाच पक्ष फोडून, फाडून आपल्याच नरडीपर्यंत हात घालतो.इतका चवताळला कि बोलण्याची ,भाषणाचीही संधी देत नाही.

शिवसेनेचे आमदार फोडले.पक्ष फाडला. टराटरा फाडलाच.सिंहासन बळकावले.आता पक्ष गिळंकृत करीत आहेत.पक्षाचे लेबल, पक्ष चिन्ह , पक्ष कार्यालय सुद्धा कब्जा करीत असतील तर उद्धव ठाकरेंना खूप वेदना होत असतील.आता तर चक्क दसरा मेळावाच ब्लॉक करायला निघाले.म्हणजे ठाकरेंचे तोंड सुद्धा बंद?शिवसेना ओरीजनल आणि शिवसेना डुप्लीकेट मधील हा संघर्ष यापुर्वी कोणत्याही पक्षाने अनुभवला नाही.आम्ही पाहातो आहोत,याचि देही,याचि डोळा.शिवसेना फाडून, आमदार फोडून जाणाऱ्याला कोणी बेईमान म्हणत असेलही.तो राग आहे.तो संताप आहे.तो पुरेसा नाही.आता सिंहावलोकन केले पाहिजे.आत्मचिंतन केले पाहिजे.शिवसेना पक्षात चोर,चाचे कधी शिरलेत हे बाळासाहेब ठाकरेंना कळलेच नाही.चोर,चाचे,दरोडेखोर,चाकू,सुरी पिस्तूल कधी पक्षात शिरले हे कळलेच नाही.उद्धव ठाकरेंनी यांना जवळ घेतले.मोठे केले.तिजोरीजवळ नेले.ते पाहून यांच्या नजरा फाटल्या.

आपणच नेता झालो तर ही तिजोरी आपलीच.म्हणून नेत्यालाच लाथ मारली पाहिजे.तोच प्रकार शिवसेनेत झाला.सुमार दर्जाच्या माणसांना ठाकरेंनी नेते केले.मंत्री केले.ते आता मुळ स्वभावावर,मुळ गुणांवर आलेत.तो स्वभाव,तो गुण आता उफाळून आला.सत्तेसाठी,मत्तेसाठी शिवसेना फाडून टाकली.म्हणे आता तो नेता नाही.मीच नेता आहे.चोर,चाचे,चालू माणसे तंबूत घेतले तर ते दगाफटका करतीलच.ही माहिती जनतेला होती.जनता अधूनमधून बोलत होती.पण कोणी याकडे लक्ष दिले नाही.कारण ते चोर,चाचे लुटमार करून कमवून आणत होते.ते नेत्यांना आवडत होते. म्हणून हे परिणाम भोगणे प्राप्त झाले. आणि तेच महागात पडले.राजकारणात सुसंस्कृत माणसे असली पाहिजे.पण शिवसेनेला हे मान्य नाही.आडदांड,भांडखोर माणसे नजरेत भरतात पण ती बरबाद करून जातात.पॉलिटिकल पार्टी मुळातच पोलाईट लोकांचा समुह असतो.शिवसेनेला हे अजून तरी पटलेले दिसत नाही.

स्वताला जगज्जेता समजणारा शिकंदर भारतावर स्वारी करण्यासाठी आला.तोपर्यंत ग्रीक सैन्य थकले होते.ते भारतात लढायला तयार नव्हते.म्हणून शिकंदरने या मार्गावर चाचेगीरी करणारे लोकांना सैनिक म्हणून घेतले.जिंकलो तर राज्य माझे आणि लूट तुमची.या बोलीवर ते चाचे लढले.जिंकले.पण परतीच्या वाटेवर याच चाच्यांनी शिकंदरला मारले.तशीच घटना ठाकरे आणि शिवसैनिक यांच्याबाबत आज घडलेली आहे.१९६७पासून आजतागायत कांग्रेस, राष्ट्रवादी,भाजप सत्तेवर असूनही शिवसेनेचा दसरा मेळावा अडवला नाही.तो अडवला अखेर शिवसैनिकानेच.शिवसेना कांग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजपने नाही शिवसैनिकांनीच गाडली.जे गेलेत ते राजकीय माणसे नव्हतीच पण जे आहेत ते तरी राजकीय माणसे आहेत का?याचा विचार उद्धव ठाकरेंनी करायला हवा.माझा अनुभव आहे.जो कोणी अशी सुचना देतो.उघड बोलतो.त्याची जीभ काळी म्हणून दूर ठेवतात.पण या काळ्या जिभेच्या माणसाला काळात दडलेले दिसते.तेच घडते.एका कथेत सातव्या मुलीची सातवी मुलगी म्हणते,मी बोलते, म्हणून ते घडत नाही.जे घडणार आहे तेच मी बोलते.मला कळते.तुम्हाला कळत नाही.म्हणून मी सांगते.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव