आरोग्याचा महामेळा मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींच्या शिबिरास आजपासून प्रारंभ

25

✒️नांदेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नांदेड(दि.22सप्टेंबर):-मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे.वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटी, लायन्स क्लब मिडटाऊन च्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींच्या शिबिरास गुरुवार दि. २२ सप्टेबर पासून प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या आरोग्य शिबिरासाठी मुंबई येथील प्रसिध्द बालमस्तिष्करोग तज्ञ डॉ. अनैता हेगडे यांच्यासह ३५ ते ४० तज्ञ डॉक्टरांची टिम दाखल होणार आहे.

प्रतीशिबिराप्रमाणेच यावेळीही शिबीर यशस्वी व्हावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, प्र.उपाध्यक्ष कमल कोठारी, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, लायन्स कल्ब मिडटाऊन चे अध्यक्ष प्रेमकुमार फेरवानी व प्रकल्प समन्वयक प्रवीण अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात व शाळेचे मुख्याध्यापक नितीन यांच्या नियोजनात शाळेचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

आत्तापर्यंतच्या एकवीस आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले. याचा तब्बल ५ हजारापेक्षा अधिक रुग्णांना लाभ झाला आहे. नेत्रशस्त्रक्रियेमुळे दृष्टिहीन असलेल्या रुग्णांना दृष्टी मिळाली तर हाडाच्या शस्त्रक्रियेनंतर उभे राहण्यास असमर्थ असणाऱ्या रुग्णांना आता चालता येऊ लागले आहे. अनेक रुग्णांचे चालताना तोल जाणे, फिट्स येणे व ऑटीझम अशा मेंदूशी संबंधित आजारातून सातत्याने आरोग्य शिबिरात घेतलेल्या उपचारामुळे काहींची सुटका झाली आहे तर बहुतेक रुग्ण सुटकेच्या मार्गावर आहेत. हे आरोग्य शिबीर मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी वरदान ठरले आहे. या शिबिरातही उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगाना येथील राज्यातूनही मोठ्या संख्येने रुग्णांची नोंदणी झाली आहे.