इ.झेड. खोब्रागडे यांचा प्रशासनाला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न -डॉ. राजेंद्र गोणारकर

  36

  ?प्रशासनातले समाजशास्त्र या पुस्तकावर ऑनलाइन चर्चा

  ✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  नागपुर(7 जुलै):-भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त सनदी अधिकारी अधिकारी इ.झेड. खोब्रागडे यांनी प्रशासनात काम करताना प्रशासनाला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.प्रा. राजेंद्र गोणारकर यांनी केले.

  स्वयमदीप प्रकाशन आणि संविधान फाउंडेशनच्यावतीने या पुस्तकावर ऑनलाइन चर्चा घडवून आणण्यात आली. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. गोणारकर बोलत होते.यावेळी पुढे बोलताना गोणारकर म्हणाले की, खोब्रागडे यांनी प्रशासनामध्ये मध्यम मार्गाचा अवलंब करीत प्रशासकीय व्यवस्थेत खूप सकारात्मक बदल केले. प्रशासन लोकांच्या कल्याणासाठी असते व त्यासाठी आपण प्रामाणिकपणे कितीही संकटे आली तरी निराश, हताश न होता काम करायला पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी प्रशासनाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांची संपूर्ण प्रशासकीय कारकीर्द प्रशासनाला दिशा देणारी होती. प्रशासनात नाविन्यपूर्ण उपक्रम आणणारी,त्याचबरोबर उपक्रमशील, सर्जनशील आणि गतिशील अशी होती. त्यांच्यामध्ये माणुसकीचा मोलाचा संस्कार असल्याने त्यांनी समाजातल्या वंचित -उपेक्षित घटकांनाप्रति आपल्या संवेदना सदैव जागृत ठेवून काम केले.

  प्रशासनात त्यांनी शेतकरी,महिला युवक यांच्यासाठी खूप उत्कृष्ट काम केले. विविध पदांवर काम करताना केवळ समाजहित डोळ्यासमोर ठेवून ‘एक पाऊल पुढे’ जाऊन रूढीवादी प्रशासनाला फाटा देत त्यांनी प्रशासनात नवनवीन कल्पना आणण्याचा प्रयत्न केला. प्रशासनातले समाजशास्त्र या पुस्तकात त्यांनी जे अनुभव कथन केले आहेत हे अनुभव नव्याने प्रशासनात येणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असे आहेत, त्यामुळे हे पुस्तक फार उपयुक्त ठरू शकेल,असेही शेवटी गोणारकर यांनी सांगितले.
  चर्चेच्या प्रारंभी यशदा येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी या पुस्तकाची आपल्या प्रस्तावनेत सविस्तर माहिती दिली. पुस्तकाचे लेखक इ.झेड. खोब्रागडे यांनी आपल्या मनोगतात हे लेखन मी काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून केले होते, त्यामध्ये मला प्रशासनात जे अनुभव आले ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा प्रशासकीय प्रवास हा अत्यंत गमतीशीर असून माझ्या 29 वर्षात 21 बदल्या झाल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक सेवाकाळात जेवढे दिवस काम करता येईल तेवढे दिवस प्रामाणिकपणे काम केल्याचे ते म्हणाले.
  या ऑनलाईन चर्चासत्रात महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील विशेषत: दुबई येथून मनीषा जगतकर या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी या पुस्तकावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, खोब्रागडे यांचा प्रशासकीय प्रवास हा प्रेरणादायी आहे. धुळे येथून डॉ. दिलीप लोखंडे पुण्याहुन उमाकांत कांबळे आणि प्रदीप भोगले, डॉ. चेतन, आशा विद्यागर, डॉ. सावंत यांनी प्रसंगी या पुस्तकावर आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बबन जोगदंड यांनी तर आभार प्रा. महेंद्रकुमार मेश्राम यांनी मानले.