आकोलीतील ‘सावित्रींच्या लेकीं‘ची ‘लालपरी‘ घेतेय दररोज ‘परीक्षा‘

15

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.23सप्टेंबर):- गंगाखेड तालुक्यातील आकोली हे जवळपास ३ हजार लोकसंख्येचं गाव आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता सातवी पर्यत शाळा आहे. त्यामुळे गावातील मुला-मुलींना पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी ‘लालपरी‘चा आधार घ्यावा लागतो. परंतु शाळेसाठी निघालेल्या मुलींना आकोली पाटीवर ‘लालपरी‘ची तासनतास वाट पाहावी लागत आहे. मात्र, बस आल्यावरही ‘ती‘ न थांबता हुलकावणी देत तशीच निघून जाते. गेली अनेक महिने दररोज हा प्रकार घडत आहे. त्यामुळे पाठीवर दप्तरांचे ओझे घेऊन शिक्षणासाठी निघालेल्या आकोलीतील ‘सावित्रीच्या लेकीं‘ची ‘लालपरी‘कडून ‘परीक्षा‘ घेणे सुरू आहे का? असा संतप्त सवाल पालक करीत आहेत.

आकोली पाटीवर अधिकृत थांबा असूनही बस थांबत नाही. त्यामुळे विद्यार्थीनींनी पालकांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. तरीही हा प्रकार सातत्याने सुरूच आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थीनींना शाळेत पोहोचण्यास विलंब होत आहे. तसेच शाळा सुटल्यावरही घरी जाण्यासाठी वेळेवर बस उपलब्ध होत नाही. त्यामुळेही विद्यार्थीनींची मोठी गैरसोय आहे.

(दि.23) रोजी सुध्दा आकोलीच्या विद्यार्थीनी सकाळी ८:२० पासूनच बसची वाट पाहाण्यासाठी पाटीवर थांबल्या होत्या. त्यानंतर सकाळी ९ वाजता येणारी बडवणी ते गंगाखेड एम.एच.२० बीएल १७९२ हि बस आली आणि न थांबतच निघून गेली. त्यामुळे हतबल झालेल्या ‘त्या‘ विद्यार्थीनींनी हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते बाबा पोले यांच्या कानावर घातला. त्यानंतर कोणताही विलंब न करता सामाजिक कार्यकर्ते बाबा पोले यांनी आपल्या गाडीतून ‘त्या‘ बसचा पाठलाग करून शहरातील कृष्णानगर येथे बस अडवली आणि बस का थांबवली नाही? अशी चालकास विचारणा केली. तसेच हा प्रकार तुम्ही थांबविणार आहात का नाही? म्हणत चालकाची ‘शाळा‘ घेतली. त्यामुळे चालकाची चांगलीच भंबेरी उडाली.

शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासन प्रयत्न करीत असून ‘बेटी बचाव, बेटी पढाव‘चा नारा पंतप्रधान त्यांच्या ‘मन की बात‘ मधून सातत्याने देत असतात. त्यात कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद होत्या. मात्र, शाळा सुरू झाल्यावरही केवळ ‘लालपरी‘च्या आनास्थेमुळे विद्यार्थीनीच्या शिक्षणाची वाट बिकट झाली आहे. त्यामुळे ‘हात दाखवा अन् एसटी थांबवा‘ हे घोषवाक्य केवळ महामंडळाच्या कागदावरचं धुळखात पडले आहे का? अशीही विचारणा सामाजिक कार्यकर्ते बाबा पोले यांनी महामंडळाकडे केली आहे. तसेच हा प्रकार जर थांबला नाही तर शाळकरी मुला-मुलींसह पालकांना घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बाबा पोले यांनी दिला आहे.

दरम्यान, हा प्रकार दररोज घडत असल्याचे वर्षा पोले, राजश्री गिरी, राजनंदनी पोले, नम्रता बिडगगर, काजल पोले, आरती कांगणे, शिवकन्या टोमपे, ज्ञानेश्वरी पोले यांच्यासह अनेक विद्यार्थीनींनी सांगितले आहे.

तरीही तालुका आगार प्रमुख अनभिज्ञ गेली अनेक दिवस हा प्रकार सुरू असल्याने मुलींचा अभ्यासक्रम बुडतो आहे. परंतु ‘लालपरी‘ कडून सातत्याने हुलकावणीच मिळत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बाबा पोले यांनी बस चालकाची शाळा घेतली. मात्र, तरीही माझ्या कानावर हा प्रकार आजच आला असून याबाबत मला अधिक माहिती नाही. परंतु मी संबंधितांना योग्य त्या सूचना देणार असल्याची प्रतिक्रिया तालुका आगार प्रमुख के.व्ही.कराळे-पाटील यांनी दूरध्वनीद्वारे दिली आहे.