आपटा वृक्षाचे विजयादशमीला महत्व

39

दसऱ्याचा सण खरंतर स्नेह, आपुलकी, मैत्रीचा सण.दसरा हा उत्सव म्हणजे चांगल्या प्रवृत्तींनी दृष्ट प्रवृत्तीवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. वर्षानुवर्षे सर्वजण हा सण आपट्याची पाने एकमेकांना वाटून साजरा करतात. पण कधी विचार केलाय का? या कृतीमुळेआपट्याच्या झाडावर किती अन्याय होतो?,त्याची संख्या किती झपाट्याने कमी होत आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.
आपटा ही बोहिमियाच्या अनेक जातीपैकी भारतात सापडणारी एक वनस्पतींची जात आहे. ही वनस्पती शुष्क पानझडीच्या जंगलात आपल्याला सर्वत्र आढळते तसेच पश्चिम हिमालयात 100 मीटर उंचीवर सुद्धा ही वनस्पती सापडते. सर्वत्र या वनस्पतीचा अधिवास आहे. आपल्या शेतामध्ये तसेच डोंगराळ भागांमध्ये सुद्धा आपल्या आजूबाजूला ही वनस्पती आढळते. परंतु आज-काल वन्य प्राण्यांच्या भीतीने शेताच्या बांधावर असलेली दुर्मिळ आपट्यांची झाडे तोडली जात आहेत संस्कृत मध्ये याला वनस्पतीला वनराज म्हणजे जंगलाचा राजा म्हणतात . यावरूनच या झाडाचे महत्व किती आहे हे याच्या वनराज या नावावरूनच कळते.या वनस्पतीला पांढऱ्या रंगाची छोटी फुले येतात म्हणून याला श्वेतकांचन असेही म्हणतात . परंतुआपल्या जवळपास आढळणाऱ्या कांचन या वनस्पतीला सुद्धा आपटा समजले जाते कारण या दोन्हीची पाने आकाराने सारखी आहेत व वृक्ष सुद्धा सारखाच दिसतो. पण कांचनची फुले जांभळी गुलाबी असतात परंतु दोन्ही वनस्पतीमध्ये बरेचसे साम्य असल्यामुळे आपटा समजून कांचनची पानेही मोठ्या प्रमाणात तोडल्या जातात.

आज-काल कांचन या वनस्पतीची झाडे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात लावली जात आहेत. दोन्ही वनस्पती या निसर्गातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपटा या वनस्पतीमध्ये ऑंटी एक्सीडेंट व जंतू विरुद्ध लढण्याचे गुणधर्म असतात. रोग बरे करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये आहे म्हणून ही वनस्पती जुलाब ,अतिसार, अशा पोटाच्या विकारावर व इतर आजारावर, वापरतात . कर्करोग या आजारामध्ये ट्यूमर तयार होण्यास यामुळे प्रतिबंध होतो तसेच कॅन्सरच्या सुरुवातीच्या अवस्थेत करण्यात येणाऱ्या उपचारांमध्ये आपटा ही वनस्पती वापरतात . आयुर्वेदामध्येही या वनस्पतीला अनन्य साधारण महत्त्व आहे.फेब्रुवारी व मेच्या दरम्यान याला फुले येतात पण आजच्या काळात आपट्याची पाने देण्या घेण्याच्या या प्रथेमुळे या जातीची जी अगदी थोडी झाडे उभी आहेत, त्यावर दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून देण्याच्या प्रथेमुळे परिणाम होत आहे .तसेच कांचन या जातीची अनेक झाडे ही आपटा समजून तोडली जात आहेत. या झाडाच्या पानांचे महत्त्व फक्त दसऱ्याच्या दिवशीच असते दुसऱ्या दिवशी रस्त्यावर ही पाणे पसरलेली दिसतात, त्याचबरोबर घरातील उरलीसुरली पाने ही कचराकुंडीत जाताना दिसतात. आजच्या पर्यावरणाचा विचार केला तर वृक्षांचे महत्त्व हे अनन्य साधारण आहे.आपली संस्कृती व परंपरा आपल्याला झाडे तोडावी असे सांगत नसली तरीही मात्र मोठ्या प्रमाणात दसऱ्याच्या दिवशी आपट्याची झाडे तोडली जातात. हे सत्य नाकारून चालत नाही. पर्यावरणातील प्रत्येक वृक्ष आपल्या परीने निसर्गामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.

या वृक्षांची भूमिका ही कित्येकदा आपल्या लक्षात येत नसली तरी जेव्हा तो घटक दुर्मिळ होतो तेव्हा आपल्याला त्याची खरी कमतरता जानऊ लागते .त्याचबरोबर प्रकर्षाने जैवविविधतेमध्ये त्याचा परिणाम दिसून येतो .त्यामुळे वृक्षा बाबत, पर्यावरणाबाबत , शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा पर्यावरण रक्षणाचीजाणीव होणे, खूप महत्त्वाचे आहे कारण ते उद्याचे नागरिक आहेत शहरातच नव्हे तर खेडोपाडी ,सामान्य जनतेमध्ये सुद्धा याबाबत जनजागृती होणे खूप महत्त्वाचे आहे .यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग आपल्याला करता येईल. लुप्त होणाऱ्या प्रजाती ,नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास, यामुळे अप्रत्यक्षरीत्या निसर्गावर या मानवनिर्मित संकटाचा परिणाम होऊ लागला आहे मनुष्य प्रत्येक ठिकाणी निसर्गातील या घटकांचा वापर स्वतःसाठी करत असल्यामुळे अनेक वृक्षावर असणाऱ्या वन्यजीवांचे आदिवासी सुद्धा यामुळे नष्ट होत आहेत.

जर आपल्याला असा हा बहुगुणी आपटा वाचवायचा असेल तर या प्रथेसाठी एक पर्याय आहे आणि तो म्हणजे या आपट्याची पाने सोने म्हणून देण्याऐवजी आपण याची रोपे जर एकमेकाला देऊन दसरा सण साजरा करू शकलो तर यामुळे या झाडांची कत्तल किंवा तोड कमी होईल व या प्रजातींची संख्या वाढण्यास मदत होईल व त्याच बरोबर आपटा व कांचन या झाडाचे सुद्धा संवर्धन होईल. निसर्गातील वृक्षांचे संवर्धन करण्यास आपला हातभार लागेल. दसरा या सणाच्या फक्त शुभेच्छा देऊन सुद्धा आपण हा सण साजरा करू शकतो.किशोर राणे, ( विज्ञान शिक्षक)

✒️महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, उमरखेड तथा मराठी विज्ञान परिषद उमरखेड(मो:-9881561532)