सायबर गुन्हेगारांचे अदृश्य चेहरे!

18

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. या युगात सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहून आपण किती सोशल आहोत हे दाखवून देण्याची चढाओढ लागलेली असते. त्यातही तरुण वर्ग तर सोशल मीडियाच्या आहारीच गेला आहे. सोशल मीडियावर आपले फॅन फॉलोअर्स कसे वाढतील? आपल्या पोस्टला जास्तीतजास्त लाईक आणि शेअर कसे मिळतील याकडे तरुणांचे लक्ष असते. मात्र काही वेळा हेच जास्त फॅन फॉलोअर्स असलेले अकाउंट सायबर गुन्हेगारांना आकर्षित करतात आणि यांना धोका दिला जातो. सायबर गुन्हेगार ज्यांचे जास्त फॅन फॉलोअर्स असतील अशा तरुणांना स्टार्टअप कंपनी आपल्या प्रोडक्टच्या जाहिराती करण्यासाठी संपर्क करतात त्यातही या सायबर गुन्हेगारांचे लक्ष तरुण मुलींवर अधिक असते. सुंदर आणि जास्त फॅन फॉलोअर्स असणाऱ्या तरुण मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी सायबर गुन्हेगार आपण मोठ्या कंपनीतून बोलत असून या मुलींचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील रिल्स आणि व्हिडिओ पाहून संपर्क केल्याचे सांगतात. मुलींचा व्हिडीओ कंपनीला आवडला असून तुम्हाला आमच्या कंपनीच्या प्रोडक्टसाठी जाहिरात करण्यासाठी निवडले असल्याचे सांगून आणखी व्हिडीओ आणि रिल्स पाठवण्यास सांगतात. बहुतेक वेळा असा संपर्क ईमेल द्वारे केला जातो. मुलीही जणू आपण मॉडेल बनलो आहोत अशा आविर्भात त्यांनी सांगितल्याप्रमाणे व्हिडीओ पाठवतात व इथेच फसतात.

व्हिडिओ पाठवल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्या मुलींना मेल येतो हा मेल त्यांचाच मॉर्फ केलेला व्हिडिओ असतो. तो व्हिडिओ मॉर्फ करून अश्लील बनवलेला असतो. हा व्हिडीओ पाठवून मुलींना ब्लॅकमेल केले जाते. हे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलींकडे पैशांची मागणी केली जाते. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या मुली पैसे देऊन स्वतःची सुटका करून घेतात मात्र ज्यांना पैसे देणे शक्य होत नाही त्या मुली बदनामीच्या भीतीने स्वतःच आयुष्य संपवून टाकतात . आजवर देशात अनेक मुली या सायबर गुन्हेगारांच्या कारस्थांनाना बळी पडल्या आहेत. विशेष म्हणजे हे ब्लॅकमेलर सायबर गुन्हेगार अदृश्य असल्याने सायबर क्राईमकडे तक्रार करूनही यांचा छडा लागेलच असे नाही. अशा अनेक केसेस पोलिसांच्या सायबर क्राईम सेल कडे दाखल असूनही अनेक गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. अशा सायबर गुन्हेगारांचा छडा लावणे पोलिसांसाठी डोकेदुखीची बाब बनली आहे. पोलिसांच्या सायबर सेलकडून अशा आमिषाला बळी पडू असे आव्हान केले जातेतरीही अनेक तरुण आमिषाला बळी पडतात. अलीकडे तर हे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे सोशल मीडियावर वावरताना खूप सतर्क राहणे आवश्यक आहे.

सायबर गुन्हेगारांची ही टोळी आपली सोशल मीडियामध्ये आपण टाकत असलेल्या पोस्टवरुन आपली मानसिकता ओळखून पद्धतशीरपणे जाळे टाकतात व फसवतात त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट टाकताना काळजी घ्यावी. सोशल मीडियावर ओळखीच्याच लोकांना फॉलो करावे. अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. अनोळखी लोकांच्या मेल आणि फोन कॉलला उत्तर देऊ नये. स्वतःच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक बाबी सोशल मीडियावर टाकू नये. सोशल मीडियावर वावरताना जर सतर्क राहिले नाही तर सायबर गुन्हेगारांचे हे अदृश्य चेहरे आपल्याला घेरण्यास टपून बसलेलेच आहेत याची जाणीव सोशल मीडिया वापरणाऱ्या सर्व तरूणांनी ठेवावी

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५