कामगारांच्या मागण्यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटक एम्टाच्या अधिका-यांना सुनावले

18

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.25सप्टेंबर):-भद्रावती तालुक्यातील बरांज येथे असलेल्या कर्नाटक एम्टा कंपनीतील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कंपनीच्या अधिका-यांना चांगलेच सुनावले. या कामगारांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून कंपनी व्यवस्थापन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे गावक-यांनी निदर्शनास आणून दिले. यावर पालकमंत्री यांनी संबंधित अधिका-यांना जाब विचारला.

केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांच्या बैठकीत मान्य झालेल्या मागण्या नंतरही सुधारीत नियुक्तीपत्र का दिले नाही. तसेच हजारीबाग (झारखंड) येथे असलेल्या त्रिवेणी माईन्सच्या धर्तीवर कामगारांचे किमान वेतन का लागू केले नाही. किमान कोल वेतनानुसार कामगारांचे वेतन ठरविणे आवश्यक आहे. यासंदर्भात 21 जुलै 2022 रोजी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांच्या किमान कोल वेतनाबाबत बैठक घेण्यात आली. मात्र तरीसुध्दा कर्नाटक एम्टा याबाबत चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत लवकरच राज्य सरकार, कर्नाटक सरकार, एम्टा कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांशी मुंबईत बैठक घेतली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

कंपनीच्या खाणीमध्ये आतापर्यंत 10 कामगारांचा मृत्यु झाला. मात्र केवळ सहा जणांनाच आर्थिक लाभ मिळाला असून उर्वरीत चार जणांना कधी लाभ देणार, अशी विचारणा पालकमंत्र्यांनी अधिका-यांना केली.तीन दिवसांत संबंधित कुटुंबाला नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. येत्या मंगळवारपर्यंत हा लाभ संबंधित कुटुंबाला मिळाला पाहिजे. पुनर्वसनास प्राप्त असलेल्या प्रकल्पग्रस्तांची यादी त्वरीत अंतिम करा. ब्लास्टिंग करतांना काही कामगारांच्या घराच्या भिंतीला तडे गेले आहे. त्याची नुकसानभरपाई कंपनीने तात्काळ द्यावी. तसेच यापुढे ब्लास्टिंगमुळे भिंतींना भेगा पडणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

यावेळी गावक-यांनी सुधारीत नियुक्ती पत्र, किमान कोल वेतन, आंदोलनात सहभागी झालेल्या 25 जणांना नोकरीत सामावून घेणे, कामगारांसाठी घरे, पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी आर.ओ. मशीन, गावात मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आदी मागण्या कंपनीकडे केल्या.बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. नैताम, भाजप जिल्हाध्यक्ष श्री देवराव भोंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने बरांज येथील गावकरी उपस्थित होते.