शिवसेवक समितीच्या वतीने महामेळावा संपन्न…

52

🔸मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही — आबासाहेब पाटील

✒️जामनेर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जामनेर(दि.27सप्टेंबर):- येथील संत तुकाराम बहुउद्देशीय सभागृह “मराठा मंगल कार्यालयात” जळगाव जिल्हा विद्यार्थी – शेतकरी – महिला व युवकांचा महामेळावा २०२२ उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरवातीला संभाजी नगर येथून आलेले महाराष्ट्रातील नामवंत शिवशाहीर सुरेशराव जाधव, त्यांचे चिरंजीव यशवंत जाधव व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शिवजन्म, शिव इतिहास पूर्वार्ध, क्रांतिसिंह नाना पाटील, रायगड महती या सर्व विषयांवर अंगावर शहारे येतील अशा स्वरूपाचे पोवाडे सादर करून जिवंत व ज्वलंत इतिहास मांडला. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. भारतीय संस्कृतीनुसार अतिथी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम दरम्यान प्रसिद्ध चित्रकार योगेश सुतार यांनी छत्रपती शिवरायांचे लाईव्ह पोट्रेट तयार करून कार्यक्रमात जिवंतपणा आणला शाहिरांच्या पोवाडा व शिवगर्जनेनंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये सामजिक कार्यकर्त्या सोनमताई पाटील यांनी स्त्री सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर विविध उदाहरणे देऊन सविस्तर मांडणी केली. म्हस्के मॅम यांनी स्वानुभव सांगून सामाजिक कार्यात झोकून देण्याचे आवाहन केले. सचिन पाटील या कार्यकर्त्याने समाज संघटना व सामाजिक तेढ या विषयावर मत व्यक्त केले. ज्यांच्या मनोगताची सर्व आतुरतेने वाट बघत होते असे शिवसेवक समितीचे संस्थापक अध्यक्ष व मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतातून मराठा आरक्षण का गरजेचे आहे याबाबत विस्तृतपणे माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.

लाखोंच्या संख्येने ५८ मोर्चे निघाले, मराठा मुक मोर्चाची दखल बीबीसीने घेतली परंतु इथल्या सरकारने मात्र घेतली नाही त्यामुळे मी व माझ्या सहकाऱ्यांनी ठोक मोर्चाची भूमिका घेतली. याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळाला;आज हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळाली हे आमच्या संघटीत आंदोलनाचे यश आहे, असे आबासाहेब पाटील म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबासाहेब पाटील होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून शिवशाहीर सुरेशराव जाधव व त्यांचे सहकारी,सामाजिक कार्यकर्त्या सोनमताई पाटील, संजय डुकरे (पाटील), सागर धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेवक समिती जामनेर ता. जामनेर जि. जळगाव यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेवक समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश पाटील तसेच त्यांचे सहकारी अतुल पाटील, किरण पाटील, प्रल्हादभाऊ बोरसे व सर्व मित्र परिवाराने परिश्रम घेतले. कार्यक्रमाला धरणगाव येथून सामजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील तसेच अमोल सोनार, प्रफुल पवार, दिनेश भदाणे, विक्रम पाटील यांच्यासह जामनेर व परिसरातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब पाटील यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.