डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे विवाहितेचा बळी,

34

🔹नातेवाईकांचा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या 

🔸तब्बल ६ डॉक्टरांवर गुन्हा दाखल 

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.29सप्टेंबर):-चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील प्रियंका विकी निरभवने (वय २४) हिचा डॉक्टरांनी सिझरीग शस्त्रक्रिया दरम्यान निष्काळजीपणा केल्यामुळे तब्बलदोन महिन्यांनी मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालाचा आधार घेऊन चांदवड व पिंपळगाव बसवंत येथील निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक जिल्ह्यात दोन मोठ्या हॉस्पिटलवर प्रथमच अशाप्रकारची कार्यवाही झाल्याने परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रियंका निरभवणे हिस आठव्या महिन्यात प्रसूती कळा सुरू झाल्याने चांदवड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे तिचे सीझर करण्यात आले. तिने गोंडस बाळाला जन्म दिला. तिला डॉक्टरांनी डिस्चार्जही दिला. मात्र काही दिवसात तिला प्रचंड वेदना सुरू झाल्या. त्यामुळे तिला पुन्हा उपचारार्थ दाखल केले असता पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र तब्येतीत फारसा फरक न पडल्याने अधिक उपचारासाठी पिंपळगाव बसवंत येथील प्रतिष्ठित दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथेही परत शखक्रिया करण्यात आली. तब्बल २०/२१ दिवसांच्या उपचारानंतर तिला मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र तिचा दि. २४ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. नातेवाईकांनी तिच्या दोन महिन्यांच्या बाळासह नातेवाईक व परीसरातील नागरिक यांनी प्रियंका निरभवणे हिच्या प्रेता सह चांदवड पोलीस स्टेशन गाठत प्रचंड आक्रोश केला.

नागरिकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केल्याने तसेच प्रियंकाचा मृतदेह देखील पोलीस ठाण्याच्या प्रांगणात ठेवण्यात आल्याने दिवसभर तणावाचे वातावरण होते. मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक समीर बावकर यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकात खांडवी यांनी देखील चांदवडला भेट देत परिस्थितीचा आढावा घेत नातेवाईकांची समजूत काढत रात्री उशिरा पोलिसांनी मृतदेह कडक बंदोबस्तात मंगरूळ या गावी पाठवला. मात्र नातेवाईक यांनी संबंधित डॉ यांच्या वर गुन्हा दाखल झाल्याशिवाय अंत्यविधी केला जाणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणाव वाढत होता नाशिकजिल्हा शल्यचिकित्सकांचा आल्याशिवाय गुन्हे दाखल करता येत नसल्याचे पोलिसांनी सांगून देखील नातेवाईक २६ रोजी दिवसभरात पोलीस स्थानक आवारात ठाण मांडून होते. शेवटी जिल्हा शल्यचिकित्सा अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली.

प्रियंकावर उपचार केलेली सर्व कागदपत्रे व तकारी अर्ज तपासल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तज्ञ समितीने या प्रकरणात सिजेरीयन शस्त्रक्रियेनंतर झालेल्या गुंतागुंतीचे वेळी योग्य निदान व वेळेत उपचार करण्यात विलंब झालेला आहे व प्रथमदर्शनी यात निष्काळजीपणा झाला असल्याचा अभिप्राय दिला. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अहवालाचा आधार घेऊन चांदवड पोलिसांनी चांदवड येथील खासगी रुग्णालय पवार मेमरी हाॅस्पीटल चे डाॅ दिपक पवार, डॉ योगिता दिपक पवार, नाशिक येथील डॉ हेमंत मंडलिक, पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयातील डॉक्टर रोहन मोरे, डॉ उमेश आहेर डॉ कविता आहेर अशा तब्बल ६ डॉक्टर यांच्या वर भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३०४, ३०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नाशिक जिल्ह्यातील दोन मोठ्या दवाखान्यावर प्रथमच अशा प्रकारची कार्यवाही झाली आहे.