स्वातंत्र्याचे शिल्पकार : महात्मा गांधी

87

आपण महात्मा गांधींचा उल्लेख भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असा करतो.महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी देण्यात आली आहे. त्याचे कारण म्हणजे आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या देशभक्ता मध्ये महात्माजींचा मोलाचा वाटा आहे.महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला.

1८८८ मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरीस्टर ही पदवी मिळवली.भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसायाला सुरवात केली. काही दिवसांनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन वकिली करू लागले. तेथेही ते योगायोगाने तेथील भारतीय नागरिकांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले. पुढे या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला.सत्याग्रहाचा प्रयोगही त्यांनी प्रथम तेथेच केला. तेथेच त्यांनी इंडियन ओपीनिय नावाचे वृत्तपत्र काढले. सत्याग्रह शिबिराची स्थापनाही त्यांनी तेथे केली. व ज्ञानाची शिदोरी घेऊन ते भारतात परतले.तेव्हा भारतीय शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पाहुन महात्मा गांधी हताश झाले. म्हणून त्यांनी चंपारन्य येथे शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. व शेतकऱ्यांच्या मनात आपल्या हक्कासाठी लढण्याची ताकद निर्माण केली. पुढे अहिंसक असहकार आंदोलन, दांडी येथील मीठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग,व्यक्तिगत सत्याग्रह आणि १९४२ चे भारत छोडो आंदोलन या सार्‍यात महात्माजींचे नेतृत्व खंबीरपणे पेटून उठले.

९ ऑगस्ट १९४२ ला त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन जनतेला केले. त्यानंतर त्यांना अटक झाली. त्यांना पुण्यात आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले.* *त्यांनी अनेकदा उपोषणाचा मार्ग अवलंबून ब्रिटिश सरकारला जेरीस आणले.* *महात्मा गांधी यांच्या प्रयत्नांमुळे अखेर १५ ऑगस्ट १९४७ ला भारतभूमीला स्वातंत्र्य मिळाले.पण त्याही वेळी हा महात्मा देशात सुरू असलेल्या जातीय दंगल विझवण्यासाठी काम करीत होता. लोकांसाठी आयुष्याचा होम करणार्‍या महात्मा गांधींना एका विघ्नसंतोषी माणसाने 30 जानेवारी १९४८ मध्ये गोळी घातली. त्यातच त्यांचे निधन झाले.महात्मा गांधी म्हणजे केवळ राजकारणीच नव्हे तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थतज्ञ होते याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे.महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की व्यक्तीची प्रमुख संघर्ष भावना ही मनातून असावी. ती आतील शक्तीला प्रेरणा देणारी असावी. हक्काची जाणीव लोकांना समजून सांगण्याचे कार्य वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे करू शकतात. एका लेखकाच्या रूपाने त्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार मांडले, त्यामुळे तत्कालीन बुद्धिमंत वर्गाने म्हणजे वकील, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, नेते आदींनी गांधीजींना आपले प्रेरणास्थान मानले.

त्यांनी ‘हरीजन’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले या वृत्तपत्राचा उद्देशच ग्रामीण भागातील लोकांचे भले करणे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा करणे हा होता. सामाजिक सुधारणा, शिक्षणपर लेख आदी विषयावर ते नेहमी लेखन करायचे. अशा या दूरदृष्टी असणाऱ्या महान संतास विनम्र अभिवादन!!!!!
————————————–
✒️श्री अविनाश अशोक गंजीवाले(स शिक्षक)जि प प्राथमिक शाळा करजगाव,पं स तिवसा जि अमरावती