जज लोया यांच्या मृत्यूचा बाजार

33

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.4ऑक्टोबर):- बृजमोहन हरकिशन लोया हे सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातील न्यायाधीश होते. त्यांचा १ डिसेंबर २०१४ मध्ये संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. शहा हे सध्याचे भाजपमधील सर्वात वजनदार व देशाचे गृहमंत्री आहेत, त्यामुळे हे प्रकरण ‘मॅनेज’ केल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

वास्तविक या प्रकरणाचा सखोल तपास व्हायला हवा व दिवंगत जज लोया यांना त्वरित न्याय मिळावा, अशी भूमिका ‘स्प्राऊट्स’ची आहे. मात्र दुर्दैवाने शहा यांचे राजकीय विरोधक अहमद पटेल हे निरंजन टकले यांच्यासारख्या पोटभरु पत्रकार व त्याच्या कथित टीमला पुढे करतात व या प्रकरणाचे फक्त ‘भांडवल’ करु इच्छितात, असे ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला आढळून आले आहे. ( आज पटेल हयात नाहीत, पण टकले यांना लागलेली सवंग पत्रकारितेची चटक मात्र जात नाही.)

टकले यांनी जज लोया यांच्या संशयास्पद मृत्यूवर एक पुस्तक लिहिले आहे. मात्र या पुस्तकाच्या माध्यमातून जज लोया यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात त्यांना तसूभरही रस नाही. त्यांना यातून केवळ पैसा कमवायचा आहे आणि जोडीला हवी आहे सवंग पब्लिसिटी, हे या पुस्तकाचे वाचन केल्यावर स्पष्टपणे जाणवते.

हे पुस्तक म्हणजे पोटार्थी टकले यांनी लिहिलेले स्वतःचे ‘आत्मस्तुती पुराण’ आहे. यात स्वतःचा मोठेपणा व जज लोया यांच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती प्रकशित केलेली आढळते. जी याआधीही अन्य प्रसारमाध्यमांतून आलेली आहे. वास्तविक ही शोधपत्रकारिता नसून केवळ पीत पत्रकारिता आहे, हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात येईल.

पुराव्यांचा मांडलेला बाजार

या पुस्तकात भरभक्कम पुरावे असल्याचा टकले यांचा दावा आहे. मात्र हा दावा अगदीच हस्यास्पद आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा प्रचंड ताकदवर व मुरब्बी नेता आहे, तो हत्या घडवून आणल्यानंतर भरभक्कम पुरावे मागे ठेवून देईल, यावर कोण तरी विश्वास ठेवेल काय?

टकले यांच्या या कथित पुराव्यांत जज लोया यांच्या मुलाने त्याच्या आत्याला लिहिलेले पत्र, लोया यांना ऍडमिट केल्यानंतर आलेले हॉस्पिटलचे बिल हे प्रकाशित केलेले आहेत. हे सर्व पुरावे लोया यांच्या कुटुंबीयांनी दिल्याचे स्पष्ट आहे. हे सर्व पुरावे म्हणून प्रसिद्ध करण्यात शौर्य ते काय?

लोया यांचा पोस्टमार्टम व व्हिसेरा रिपोर्ट ( Viscera Report ) हेदेखील या पुस्तकात पुरावे म्हणून प्रकाशित करण्यात आलेले आहेत. हे सर्व पुरावे या प्रकरणातील सरकारी वकिलांनी सुप्रीम कोर्टात सादर केलेले आहेत. हे सर्व रिपोर्ट जगजाहीर आहेत. यात कुठली आली शोधपत्रकारिता?

टकले यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या बिनबुडाच्या पण रंजक कथा

टकले यांनी त्यांच्या या पुस्तकात दावा केल्याप्रमाणे त्यांच्यावर आतापर्यंत याप्रकरणात ३ कथित हल्ले झाले आहेत, मात्र या हल्ल्यांच्या घटनांना कोणताही आधार नाही. या प्रकरणी त्यांनी कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर तर सोडा, साधी ‘एनसी’ही केलेली नाही. इतकेच नव्हे तर एका प्रकरणात त्यांचे साक्षीदार ऐनवेळी गाडीत नव्हते, तर दुसऱ्या एका हल्यात त्यांचा साक्षीदार हा शेवटपर्यंत कसा झोपला होता व मग टकले यांनी एकट्याने कसा साहसाने या गुंडाचा सामना केला, या कथित घटनेचे गमतीदार वर्णन केले आहे, इतके होऊनही या प्रकरणात त्यांना साधे खरचटलेही नाही, हे आणखी विशेष.

एका कथित हल्ल्यात टकले यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आल्याची भाकडकथा वर्णन करण्यात आली आहे. या कथित जीवघेण्या हल्ल्यात टकले यांनी गाडीतील हत्यारे म्हणजे हॉकीस्टिक, काठी कशी बाहेर काढली व कथित गुंडाशी कशी ‘फाईट’ केली व मग ते कथित सराईत गुंड कसे घाबरून पळून गेले.

याशिवाय मुंबईतील कॉटनग्रीन येथील त्यांच्यावर दुसरा हल्ला झाला. या कथित हल्ल्यात टकले यांनी करून गुंडाना बॉक्सिंग केली. (टकले हे कॉलेजमध्ये बॉक्सिंगपटू होते, अशीही थाप त्यांनी यावेळी मारली आहे. ) व त्यांना कसे पिटाळून लावले, याचीही सुरस कहाणी वर्णन केली आहे.

टकले यांच्यावर कथित तिसरा हल्ला झाला तो नागपूरमध्ये. यावेळी तर टकले यांच्यावर एका गुंडाने बाईकवर येवून हल्ला केल्याची गमतीदार घटना त्यांनी सुरसपणे लिहिलेली आहे. हा कथित गुंड त्यांना म्हणाला ‘जादा शाणा मत बन, चले जा’ पण याप्रकरणात तर कमालच झाली. टकले मारामारीवर उतरले त्यानंतर ते थेट त्या कथित गुंडाच्या बाईकवरच जावून बसले व त्यामुळे घाबरलेल्या गुंडाने तात्काळ पळ काढला.

टकले यांच्या पुस्तकातील या लिखाणाला कोणताही आधार नाही. विशेष म्हणजे या प्रकरणातील कथित आरोपी हा भारताचा गृहमंत्री आहे, ज्याने माजी मुख्यमंत्री व आगामी पंतप्रधान पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस सारख्या मुरब्बी राजकारण्याला शह दिला आहे. भारतात त्यांची प्रचंड दहशत आहे. तो असले बालिश हल्ले करेल काय? पत्रकारांवर असे हल्ले तर हल्ली गावातले ‘जुगार’, ‘मटका’ खेळणारादेखील करत नाही. त्यामुळेच या पुस्तकातील कथित हिरो टकले हे गुंडांवर प्रतिहल्ले करणारे तमिळ किंवा भोजपुरी चित्रपटातील ‘टपोरी हिरो’ वाटतात.

एकूणच काय या पुस्तकाच्या माध्यमातून टकले यांनी ‘गगनभेदी थापा’ मारलेल्या आहेत. यातून त्यांनी रंजकता जरूर आणली आहे, पण त्या थापही न पटण्यासारख्या आहेत. मृताच्या मढ्यावरील लोणी खाण्याचा हा घृणास्पद प्रकार आहे.