आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष अधिकार वापरून शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ निधी जमा करावा

14

🔹उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रिपब्लिकन युवा सेनेने केली मागणी

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि.8ऑक्टोबर):- तालुक्यातील नऊ मंडळातील 35,355 शेतकऱ्यांची पिके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित होऊन शेतकऱ्यांचे आतोनात आर्थिक नुकसान झाले असून अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी उमरखेड तालुक्याला 54 कोटीचा निधी प्राप्त झालेला असून नैसर्गिक आपत्ती काळात कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्त पंचनामे केले.

आतापर्यंत मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकरी नावाची मराठी यादी पाठविली जात होती आता राष्ट्रीयकृत बँकांना इंग्रजी लिपीमध्ये यादी पाठवायची असून या विषयी कृषी, तलाठी व ग्रामसेवक विभागामध्ये विरोधाभास दिसून येत आहे.

विशेष म्हणजे नुकसानग्रस्तांचा आकडा मोठा असून ज्या पद्धतीने कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्त पंचनामे केले त्याच पद्धतीने आपणांस संबंधित विभागाविषयी आपत्ती व्यवस्थापनाचे प्राप्त असलेले विशेष अधिकार वापरून संबंधित तिन्ही विभागांना सदर निधी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्या विषयी आदेशित करावे.

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचा दसरा सण आनंदात साजरा व्हावा व शासनामार्फत प्राप्त झालेल्या निधीचा आधार मिळावा याकरिता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आज रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली.

तात्काळ निधी जमाने झाल्यास कायदेशीररित्या सदर प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करून वरिष्ठाअन्वये दोषींवर कठोर स्वरूपाची कार्यवाही करण्यात येऊन संबंधित विभागाच्या विरोधात जाहीर निषेध दर्शवून शेतकरी व रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, तालुकाध्यक्ष गौतम नवसागरे, तालुका उपअध्यक्ष भीमराव खंदारे, तालुका संघटक संदीप राऊत, तालुका सहसचिव साहेबराव कदम, मेजर दिलीप मुनेश्वर, साईनाथ हिंगमिरे, कैलास कांबळे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.