

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०
येवला(दि.9ऑक्टोबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ८७ व्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातून अनुयायी अभिवादन करण्यासाठी येणार आहे. येणाऱ्या या सर्व अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. यासाठी सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्न करत नियोजन करावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज मुक्तिभुमी येवला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ८७ व्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभुमीवर आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी नागेंद्र मुत्केकर, पोलीस उपअधीक्षक संग्रामसिंह साळवे, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका पोलिस निरिक्षक अनिल भवारी, शहर पोलिस निरिक्षक भगवान मथुरे, गटविकास अधिकारी अन्सार शेख, उपविभागीय अभियंता सागर चौधरी, शाखा अभियंता मुकेश पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद कातकाडे, बार्टीच्या समन्वयक पल्लवी पगारे, समाज कल्याण विभागाच्या सौ. डेंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, माजी सदस्य मोहन शेलार, मकरंद सोनवणे, सचिन कळमकर, माजी नगरसेवक प्रवीण बनकर, मलिक मेंबर, भगिनाथ पगारे, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, सुभाष गांगुर्डे, गोटू मांजरे, सुमित थोरात, विशाल परदेशी, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी बांधव उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, धर्मांतर दिन कार्यक्रमाच्या दृष्टीने संपूर्ण परिसराची स्वच्छता, गार्डनची व देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात यावी. बार्टीच्या वतीने एकच मुख्य स्टेज उभारण्यात येऊन कार्यक्रमस्थळी संपूर्ण मंडपाची व्यवस्था करण्यात यावी. मुक्ती भूमीला जोडणाऱ्या शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. भाविकांना येण्यासाठी स्वतंत्र पार्किंगचे नियोजन करण्यात यावे. कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी. पोलीस यंत्रणेने सतर्क राहून नियोजन करावे वाढीव बंदोबस्त ठेऊन कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.
ते म्हणाले की, अद्यापही कोरोना व साथरोग कमी झालेला नाही. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने सतर्क राहून नियोजन करावे. अतिदक्षता म्हणून रुग्णवाहिका तसेच अग्निशामक दलाच्या तुकडी या ठिकाणी कार्यरत ठेवावी. पर्यटन विभागाने या ठिकाणी स्वतंत्र केंद्र उभारावे. येणाऱ्या अनुयायांना मदत व्हावी यासाठी स्वतंत्र मदत कक्षाची निर्मिती करण्यात यावी. गर्दीचे सुयोग्य आणि शिस्तबद्ध नियोजन करण्यात यावे. पिण्याच्या पाण्याची तसेच मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात यावी. मुक्तिभुमिवरील हा कार्यक्रम अतिशय शांततेत व शिस्तबध्द पद्धतीने पार पडावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
कार्यक्रम स्थळाची केली पाहणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ८७ व्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनानिमित्त आज मुक्तीभूमी येथील कार्यक्रम स्थळाची पाहणी करत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.