माणसातील राजा माणूस : आदरणीय श्री जयसिंगराव पाटील (बापू)

31

थोर स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा गेली ९१ वर्षे चालवणारे त्यांचे सुपुत्र माननीय श्री. जयसिंगराव पाटील (बापू) आज ९२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. लहानपणी पारतंत्र्य भोगलेले, तारुण्यात स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या वडिलांचा सहवास लाभलेले, स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे सुराज्य बनवण्यासाठी धडपडणारे, साधी राहणी, स्वच्छ विचार, परखड बाणा, स्पष्टवक्तेपणा यासाठी संपूर्ण उंडाळे परिसरात ओळखले जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री जयसिंगराव पाटील (बापू) हे होय. त्यांचा जन्म १० ऑक्टोंबर १९३१ रोजीचा. मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. पण त्यांनी केलेल्या सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी क्षेत्रातील कार्यामुळे कराड दक्षिण मधील जनमाणसाच्या मनात बापू सदैव घर करून आहेत. आपला माणूस, माणसातला राजा माणूस म्हणून बापूंची एक वेगळीच ओळख आहे. वयाच्या २२ व्या वर्षी बापू उंडाळे गावचे पहिले सरपंच झाले. तेंव्हापासून त्यांनी राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर सर्वोत्कृष्ट काम केले आहे. ते कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे १९५८ ते १९६४ पर्यंत संचालक, १९६३ पासून उंडाळे सोसायटीचे संचालक, सलग २५ वर्षे गजानन हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष, राज्य साखर संघाच्या कार्यकारणी समितीचे सदस्य, ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इत्यादी महत्त्वाच्या पदांवर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पण हे करीत असताना सामान्य माणसासोबतची नाळ कधी तोडली नाही.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे बापू. त्यांनी मोट चालवण्यापासून ते ठिबक सिंचन पर्यंतचा प्रवास पाहिला आहे. त्यांनी गावातील दिवाबत्तीसाठी रॉकेलच्या कंदीला पासून ते सौरऊर्जेवरील लाईट पाहिली आहे. नवनवीन तंत्रज्ञानाची आस असणारे आणि हे तंत्रज्ञान आपल्याजवळ असावे याचा ध्यास असणारे व्यक्तिमत्व बापूंचे आहे.

सर्वसामान्य डोंगरी, गरीब दीन-दलितांसाठी तर बापू एक लोकन्यायालय आहेत. हा वारसा त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतला आहे. सत्तेतील नेत्यांकडे जेवढी लोकांची वर्दळ नसते तेवढे वर्दळ बापूंच्याकडे सदैव असते. वाड्या-वस्त्यावरील लोकांच्या समस्या, त्यांच्यातील भांडणे, तंटे , घरातील वाद यावर त्वरित न्याय देणारे लोकन्यायालय म्हणजे बापू. बापूंना माणसांची नस लगेच ओळखता येते. त्यामुळे खऱ्याखोट्याची जाण असणाऱ्या बापूंना न्याय करताना कोणत्याही पुराव्याची गरज भासत नाही. माणूस बघितला की ते योग्य न्याय करतात. म्हणून आजही लोक न्याय मागण्यासाठी, मध्यस्थीसाठी बापूंच्या या लोकन्यायालयात दाखल होतात. संपूर्ण वाड्यावस्त्यावरील खडान्- खडा माहिती असणारे बापू म्हणजे आजच्या काळातील गुगल मॅप आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेकांचे संसार फुलवले, अनेकांच्या हाताला काम दिले, अनेकांना रोजगार दिला. बोलण्यापेक्षा कृती करण्यावर अधिक भर देणारे बापू म्हणजे उंडाळे परिसराची शान आहेत.

✒️प्रा.प्रदीप चोपडे(कला व वाणिज्य महाविद्यालय,उंडाळे)