

✒️बीड,प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.10ऑक्टोबर):-अखेरच्या काळात माझी एकच इच्छा आहे, माझ्या विजयसिंहला (विजयसिंह पंडीत, एकदा निवडून द्या, असे भावनिक आवाहन माजी मंत्री आणि बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडीत यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देताना केले.माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी रोहयो मंत्री संदीपान भूमरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. त्या सत्काराला उत्तर देताना पंडीत यांनी आपली इच्छा व्यक्त केली.
शिवाजीराव पंडित म्हणाले की, मी राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर सत्कार घेण्याचे बंद केले होते. पण, माझे नेते शरद पवार साहेब येणार आहेत, म्हटल्यावर मला हा सत्कार घ्यावा लागला. मी १९६२ पासून गेवराई तालुक्यासाठी सालगड्यासारखे काम केले आहे. आज मी थकलो असलो, तरी तुमची राखण करतो आहे. त्यासाठी माझी तीनही मुले इमानदारीने काम करत आहेत.
हा अभिष्टचिंतन सोहळा पाहून माझे जीवन सार्थक झाल्याचा आनंद होतो आहे. लोकांच्या आशीर्वादामुळेच मी हे करु शकलो. मतदारसंघात शाळा उभ्या केल्या. नवोदय विद्यालय आणले, त्यातून शेकडो मुले देशाच्या विविध भागात काम करत आहेत. ही सारी मुलं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आहेत, याचा मला अभिमान आहे, असेही पंडीत यांनी नमूद केले.माजी मंत्री पंडीत म्हणाले की, राजकारणाचा गुरुमंत्र मला बाबूराव पाटील अनगरकर यांनी दिला, त्यांचे आशीर्वाद मी कधीच विसरु शकत नाही. ते माझे ट्रेनिंग सेंटर होते. आज आपल्या व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत. या निमित्ताने जळगाव ते सोलापूर या रेल्वे मार्गाची मागणी आज त्यांना करतो आहे.