मत्स्य संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी ना.सुधीर मुनगंटीवार आग्रही, चार जिल्ह्यांना मिळणार लाभ !

18

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.13ऑक्टोबर):-पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये तळ्यांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे येथे मत्स्य प्रादेशिक संशोधन केंद्राची स्थापना करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सूचना दिल्या आहेत.हे संशोधन केंद्र झाल्यावर चारही जिल्ह्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे.

विदर्भातील अप्रयुक्त गोड्या पाण्याचे स्रोत लक्षात घेऊन महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ. पातुरकर यांनी काल नागपुरात मंत्री मुनगंटीवार यांची भेट घेतली. या भेटीत मत्स्य प्रादेशिक संशोधन केंद्राच्या स्थापनेबाबत चर्चा झाली. त्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर एक्वाकल्चर (ICAR-CIFA) आणि MAFSU च्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथे प्रादेशिक संशोधन केंद्राची (Regional Research Centre) स्थापना करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

सदर केंद्राची स्थापना झाल्याने चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांतील गोडया पाण्यातील मत्स्य व्यवसाय व मत्स्य संवर्धनास चालना मिळेल. सदर केंद्राच्या स्थापनेमुळे सखोल अभ्यास व संशोधन झाल्याने केंद्राची उद्दिष्ट्ये साध्य होणार आहेत. व्यवसाय आणि उद्योगांना चालना देण्याचा महाराष्ट्र सरकारचा हा एक प्रयत्न आहे. डॉ. पातुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथे प्रादेशिक संशोधन केंद्र सुरू झाल्यावर त्याचा एक नाही तर अनेक फायदे. मच्छीमार बांधवांना होणार आहे. त्यांचा व्यवसाय अधिक वृद्धिगंत होईल आणि आपल्या परिसरात मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार आहे.

गोड्या पाण्यातील मत्स्यबीजाद्वारे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे, मायनर कार्प्सचे संगोपन आणि संवर्धनाद्वारे मत्स्यशेतीचे विविधीकरण; गोड्या पाण्यातील कोळंबी संस्कृती; एकात्मिक मत्स्यपालन प्रणाली विकास; ब्रूडबँकचा विकास; मच्छीमार महिला, बचत गट, अल्पभूधारक शेतकरी, सहकारी संस्था सदस्य इत्यादींचे सक्षमीकरण या संशोधन केंद्राच्या स्थापनेने होणार असल्याचे ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.