मताचे पांचशे आणि दवाखान्याचे पांच हजार ?

13

जळगाव मनपा निवडणूक व विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी मतदारांना प्रत्येकी पांचशे रूपये दिले.अगदी घरपोहच.रात्री दरवाजा ठोठावून उठवले.मतदाराला वाटले.हा तर देवदूत आला.लक्ष्मी द्यायला.मतदार उठला.त्यांने देवाचे आभार मानले.नितीन गडकरींचे भाषण आठवले,लक्ष्मी घरी चालून आली तर नाही म्हणू नका.
“सर,तुमच्या घरातील किती मतदार आहेत ?”

“आम्ही येथे तीन आणि मुलगा पुण्यात राहातो, इंजिनिअरिंगला.तुम्ही त्याचे येण्याजाण्याचे भाडे दिले तर त्याला ही बोलवून घेऊ.”
“नाही सर, आम्हाला फक्त मतदारांचे प्रत्येकी पांचशे द्यायचे सांगितले आहे. आम्ही त्याप्रमाणे दोन हजार देऊ.जर तुम्हाला पुण्याहून येण्या जाण्याचे भाडे हवे असेल तर सकाळी आमच्या निवडणूक कार्यालयात येऊन भेटा.त्यांना वाटले तर देतील ते.”

” अरे,नाहीरे! मला कुठे बोलवतो तिकडे !तूच देऊन टाक.माझे नांव सांग .दिले म्हणून.खरे म्हणजे ,मला हेच पैसे घ्यायची लाज वाटते.पण आता तुम्ही देता आहात तर, नाही कसे म्हणणार? मी नाही म्हटले तर तुम्ही तिकडे सांगितले कि आमचे बारा वाजलेच समजा.त्यापेक्षा जे काही द्यायचे ते येथेच देऊन टाक.अरे! समोरच्या पार्टी कडून भाड्याचे पैसे मिळाले म्हणून मी बोललो.तसे आम्ही इज्जतदार माणसे आहोत.असे दोन चार हजार घेणे म्हणजे आमचा कमीपणाच आहे.हळू बोला.शेजाऱ्यांना समजले तर इज्जतीचा कचरा.””नाही सर.त्यांनी सुद्धा घेतले.त्यामुळे तुम्ही इज्जतीची काळजी करू नका.हे बघा, त्यांच्या नावापुढे टिकमार्क केले आहे.”

“अरे!हो.त्यांनी पण घेतले.च्यायला,हलकट साला.काही लाज आहे का,त्याला?”” सर, लाजेचे नंतर पाहू.लाज तर आम्हाला ही नाही. मी तुमचे नांव लिहून घेतो.सकाळी उमेदवाराला समजावून सांगतो.त्यांनी दिले तर फोन करतो.घेऊन जा.”” पुन्हा तेच.अरे!मला कशाला बोलवतो तिकडे? कोणी पाहिले तर ! समोरच्या पार्टी ला माहिती पडले तर!ते दिलेले पैसे परत मागतील.त्यापेक्षा नको.तूच आणून दे.मीच तुला त्यातील काही खुशाली देऊन टाकीन.”जळगाव शहरातील दिड लाख पगार घेणाऱ्या सरांचा हा पंटरशी संवाद आहे.आपण पैसे घेतो,मत विकतो,याची त्याला जाणीव आहेच.पण मिळते तर कशाला सोडायचे?अशी भावना जळगाव येथे विकसित झाली आहे.त्याचा हा दुष्परिणाम आहे.तरीही हे लोक काव्यरत्नावली चौकात संध्याकाळी कुचागळ्या काढतात.”आमदार ,नालायक आहे.तोच दारू विकतो तर काय रस्ते बनवेल? आपले लोकही नालायक आहेत.मताचे पैसे घेतात तर तो आमदार तितके निधीतून वसुल करणारच.”

” काका, आमदार रस्ते बनवत नाहीत.म्हणून खड्डे पडलेत.मणके मोडलेत.हात पाय मोडलेत.तर त्याचा दवाखान्याचा खर्च सुद्धा आमदार कडून घेतला पाहिजे.”
” शिवराम भाऊ,तो देईल का,असे दवाखान्याचे पैसे?”
“दिले नाही दिले तो नंतरचा प्रश्न.पण मागायला काय हरकत आहे? तुम्ही मागा तर खरे!मला सांगा.मी येतो , तुमच्या सोबत .मी काढून देतो आमदार कडून पैसे.तुम्ही दवाखान्याचे बील सोबत आणा.आपण आमदाराच्या कार्यालयात एकटे दुकटे नाही,सोबत जाऊ.देतील ते.आमदार मोठ्या मनाचे आहेत.रस्त्याच्या निधीचे पैसे पडले आहेत त्यांच्याकडे.”
” अहो, शिवराम भाऊ, तुम्हाला काहीच माहिती नाही.त्यांचे इतर धंदे खूप आहेत.खूप माल कमवतात.नाही म्हणायला तर नको.”
” आपण हे पैसे तर मागू.पण असा प्रस्ताव मांडू कि,आम्हाला मताचे पांचशे रूपये देण्याऐवजी आमचे दवाखान्यातील बील भरण्याची जबाबदारी आमदाराने घ्यावी.रस्ते न बनवता,तोच पैसा जळगाव शहरातील , फक्त शहरातील मतदारांच्या दवाखान्यातील बील भरण्यासाठी वापरण्यात यावा.म्हणजे, रस्ता नाही बनवला तरी आपल्याला हरकत नाही.”
“शिवराम भाऊ,ही आयडीया चांगली आहे.पण आमदार ऐकतील का?”
“काय हरकत आहे.आमदाराला कुठे घरून द्यायचे आहेत? निधीतून द्यायचे आहेत.आमदाराचे राजकीय सदगुरू ह.भ.प.नरेंद्र मोदी यांनी जाहीर सांगितले आहे कि, आम्ही एका माणसाला पाच वर्षात प्रत्येकी पंदरा लाख देऊ.म्हणजे तितके पैसे सरकार च्या तिजोरीत असतीलच.मोदी साहेब कधीच खोटे बोलणार नाहीत.”
” हे,बरे आठवले बुवा तुम्हाला.आम्ही तर विसरलोच होतो.ते पंदरा लाख येणे बाकी आहे.मागायला पाहिजे.”
” मी तेच म्हणतो.आमची शाळा शिक्षण, आरोग्य, रस्ते,पाणी ,गटार असा सर्व खर्च वजा जात पंदरा लाख मधून पैसे उरतील.ते त्यांनी ठेवून घ्यावेत.”
” हे सगळे खरे आहे तुमचे.पण सांगायचे कोणाला?मोदी साहेब तर फोन वर बोलणार नाहीत,आपल्याशी.”
” सांगतो ना! मोदी साहेबांचे दोन प्रतिनिधी आपल्या ताब्यात आहेत.एक आमदार सुरेश भोळे.दुसरे खासदार उन्मेष पाटील.आपण मोदीसाहेबांचे भाषण ऐकून यांनाच मतदान केले आहे.तर आपण यांचेकडेच अपील करू.बॅंक केंद्र सरकारची असते‌.पण आपण खाते तर जळगाव शाखेतील मैनेजर कडेच उघडतो.तसे आमदार आणि खासदार हेच मोदी साहेबांचे प्रतिनिधी आहेत.आपण यांनाच मतदान करतो.तर आपले पंदरा लाख आणून द्यायला हेच जबाबदार आहेत.वाटल्यास त्यांना सवयीप्रमाणे वीस टक्के कमीशन कबूल करू.”
” शिवराम भाऊ, तुम्ही म्हणता,ते पटते.पण हा तर धंदा झाला.”
“काका, राजकारण धंदाच झाला आहे.आमदार बनण्यासाठी आठ कोटी टाकणे म्हणजे इनव्हेस्टमेंट असते.तो फुकट खर्च करील काय? खासदार साठी वीस कोटीचा बजेट असतो.तो काय धर्मार्थ खर्च करील काय? आपण मतदारांनी या धंद्याला सहमती दिली आहे. त्यात कस्टमर झालो आहोत.मताचे पैसे घेणे,हा सुद्धा धंदाच आहे.मताचे पैसे घेतांना लाज वाटत नाही,तर बोलायला का लाज वाटते? मतदार निर्लज्ज झाला आहे तर आमदार खासदार इज्जतदार असूच शकत नाहीत.साधी व्याख्या आहे, ” निर्लज्ज मतदारांचा लोकप्रतिनिधी निर्लज्ज असणारच.” न्यूटनच्या गतीच्या नियमांसारखाच हा राज नितीचा नियम आहे.आपण जळगावकर मतदार या नियमांचे तंतोतंत पालन करीत आहोत.”

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव