प्रेम उठाव : आंतरिक आंदोलनाचा मुक्त आविष्कार

38

कवी नवनाथ रणखांबे यांचा प्रेम उठाव कवितासंग्रह नुकताच वाचण्यात आला .या कविता संग्रहाच्या नावावरून हा कवितासंग्रह प्रेमाच्या विशालतेचा भावार्थ नमूद करणारा असावा असा भास होतो .पण जसजसा हा कवितासंग्रह वाचल्या जातो तसतसा या कवीची विशाल दृष्टीची जाणीव होते .

प्रेम हा शब्द जीवनाला नवहर्ष देणार आहे. पण या प्रेम उठाव हा शब्दच काहीतरी बदलाचा परिमार्ज प्रस्तुत करतो. कवीने जे अनुभवले त्याच्या मनोभावनेचा उत्स्फूर्त आविष्कार यामधून प्रकट झालेला आहे.

प्रेम उठाव या कवितासंग्रहातील कविता छोटेखानी शब्दछटा घेऊन आलेल्या आहेत .काही कविता दीर्घ आहेत .काही कविता मुक्तछंदातील तर काही कविता यमकधारी आहेत. अशा विविध शब्द जाणीवांनी हा कवितासंग्रह प्रेमाची अनुपम भूमिका मांडतो आहे .

कवीच्या वाटेला आलेल्या प्रेममय जीवन तसेच बदलत्या जीवनातील प्रेमाची होणारी वाहतात याचा शोधक व मनमोकळेपणाने संवाद कवीने मांडलेला आहे. ते आपल्या गझल राहिली हृदयात या कवितेत प्रकट होताना लिहितात की ,

दुःख माझे अंतरीचे रोखताना
वेदनेने रोज केली मात होती
तोडले होते जिने माझ्या मनाला
ती तरीही राहिली हृदयात होती .
पृ क्र ३०

कवीच्या आयुष्यात आलेले प्रेमविरहजीवन हे अत्यंत क्लेशदायक आहे .पण हा कवी घायाळ होत नाही. प्रेमिकाविषयी खंत करत नाही तर तो तिला हृदयात जपून ठेवतो. ही विश्वजाणीव नक्कीच प्रेरणादायी आहे.

तारुण्याच्या उमलत्या वयात प्रत्येक माणसाच्या मनाला सुंदर सौंदर्य कळीची सोबत असते. तो या काळात भावनेच्या व प्रेमाच्या आकांतात बुडाला असतो. तो नवनवीनतेचा ध्यास धरतो .प्रेमाचा अंकुर फुलणाऱ्या आयुष्यात सखी ही एक प्रेमाचा ओलावा असते .तिच्या येण्याने कवीचे जीवन हरितमय होते. गंध कोवळा घेऊन येणारी प्रेयसी मनाला नवी वाट दाखवणारी असते.ते आपल्या खास कवितेत म्हणतात की ,

प्रत्येकाच्या आयुष्यात
प्रेम होत असतं
प्रत्येकाच्या तारुण्यात
कोणीतरी खास असतं ..
पृ क्र २९

ही कविता सर्व मानवाच्या जीवनाचा परिमर्श घेते. कविने जीवनात प्रेमाबरोबर दुःख पाहिले आहे. त्याचे जीवन दुःखाने होरफडले आहे .पण तो पराभूत होत नाही. वेदनेचा डंक कितीही आले तरी मानवाच्या आर्त दुःखाला कवितेतून मांडावेच लागेल. जगाच्या वेशीवर व्यक्त भावनेचा नाजूकबांध दाखवावा लागेल .ते आपल्या अस्वस्थ कवितेत लिहितात की,

असेन मी
नसेन मी
कवितेने मी
हृदयात तुमच्या
बसेल मी..!

प्रेम उठाव या कवितासंग्रहातील उठाव, साखरदंड, भीमबाबा या कविता अत्यंत क्रांतिकारी विचारांच्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतामुलक समाजाचे स्वप्न साकार करायला असेल तर संविधान वाचावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे बघून संसदेचा मार्ग धरावा लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतिऊर्जा मनात घेऊन आपला मार्ग प्रस्थ केला पाहिजे. ते भीमबाबा या कवितेत म्हणतात की,

बाबाचं बळ
आहे जवळ
विचारांची शाळा
प्रगतीचा डोळा
मार्ग सोहळा
फुलला प्रज्ञावंत मळा !

तर उठाव
या कवितासंग्रहातील कवितेमध्ये ते लिहितात की,

प्रकाशदात्या, माणसांच्या अंधाराला संपवून टाक
सृष्टीमध्ये, चराचरात समतेचे तत्व आण
अन्
इडा पिडा जाऊ दे
समतेचे युग येऊ दे …

ही कविता मानवीय जीवनाला नवांकित करीत आहे. बदलत्या परिवेशाचा वेध घेणारी आहे. समतेचा ध्वज उंच करणारी आहे.

नवनाथ रणखांबे यांच्या प्रेम उठाव या कवितासंग्रहातील कविता विश्वकल्याणाचा टावो फोडणारी आहे. प्रेमात चिंब भिजलेल्या मुक्त मनाचा आविष्कार आहे. तरी या कवीने अजूनही मोठी वाटचाल करायची आहे. आपले वाचन समृद्ध करायचे आहे. तसेच कविताचा भावार्थ उत्कृष्ट भरला असला तरी त्यांनी समाजाकडे व देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. विशाल मनाची छताड दृष्टी मांडावी. कविता लिहिणे व प्रकाशित करणे म्हणजे खूप आहे असे नाही. प्रगल्भ जाणिवाची विस्तृत व सापेक्ष मांडणी पुढील कवितासंग्रहात नक्कीच पाहायला मिळणार यात शंका नाही. हा कवितासंग्रह अभिव्यक्तीच्या पातळीवर उंच ठरला असला तरी तत्व चिंतनाच्या पातळीवर माघारलेला आहे. त्याची जाणीव कवीने समजून घ्यावी .प्रेम उठाव हा कवितासंग्रह आंतरिक आंदोलनाच्या मुक्त आविष्कार आहे. त्यांना पुढील कवितासंग्रहासाठी मंगलकामना चिंतितो….!

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००