मोहोळ नगरपरिषद कर्मचाऱ्यांची केली दिवाळी गोड : कर्मयोगी रमेश आप्पा बारसकर

17

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.25ऑक्टोबर):-मोहोळ नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेले सर्व कर्मचारी वृंद यांना दीपावलीच्या निमित्ताने मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी प्रतिकर्मचारी दहा किलो साखर याप्रमाणे कर्मचाऱ्यांना एक टन साखर दिवाळीची भेट म्हणून दिलेली आहे.

पाडव्याच्या पूर्वसंध्येला आज नगरपरिषदेच्या बागेमध्ये उपस्थित राहून सर्व कर्मचाऱ्यांना साखर वाटप करण्यात आली.रमेश बारसकर हे कायम नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आलेले आहे याची प्रचिती आपल्या सर्वांना त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये आलेली आहे अडीच वर्ष नगराध्यक्ष असताना कर्मचाऱ्यांना पगारीची कधीही अडचण त्यांनी येऊ दिली नाही वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून न्याय देण्याची भूमिका बारसकर यांनी घेतलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या माणसाचे हात बळकट करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे मनोगत व्यक्त करताना शिलवंत क्षिरसागर यांनी सांगितले.

तर पुढे रमेश बारसकर बोलत असताना म्हणाले की मोहोळ नगर परिषदेचे कर्मचारी शहरवासीयांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात परवा मोहोळ शहरांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातलेला असताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते अशावेळी जीवाची परवा न करता पिसाळलेल्या कुत्र्याला यम सदनी पाठवण्याचं धाडसी काम नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केलेले आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे.

ग्रामपंचायतचा सदस्य असल्यापासून कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी माझा लढा राहिलेला आहे नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर व नगराध्यक्ष असताना महिला-पुरुष असा भेदभाव न करता सरसकट पगारवाढीचा निर्णय घेऊन आपली सेवा केल्याचा आनंद मला आहे.येणाऱ्या काळात सुद्धा कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने पाठीशी उभा राहण्याची ग्वाही यावेळी बोलताना रमेश बारसकर यांनी कर्मचाऱ्यांना दिली.

बारसकर यांनी वाटलेल्या साखरे मुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांची दिवाळी काही प्रमाणात गोड झाली असून सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद उसांडून वाहत होता.

या कार्यक्रमासाठी रमेश बारसकर यांच्यासह अतुल क्षिरसागर,तन्वीर शेख,रमेश सनगर,शांतीकुमार अष्टुळ,सुभाष मोहोळकर,सागर अष्टुळ,अजय कुर्डे,शिलवंत क्षिरसागर, सिद्धार्थ एकमल्ले,राजू शेख,दिनेश गायकवाड,तानाजी कसबे यांच्यासह कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.