पटलं तर बघा…विचार करा..आणि कृती करा..!-जाहिरात नाही तर बातमी पण नाही !!

14

“दिवाळी” सण हा पत्रकारांसाठी खऱ्या अर्थाने वार्षिक सण मानल्या जातो.गणपती उत्सव,नवरात्रोत्सव संपला की पत्रकार हा आपल्या दिवाळीच्या नियोजनासाठी कामी लागतो.आपल्या संपर्कातील व्यक्ती,संस्था, विविध पक्षाचे पुढारी तसेच आपण ज्यांना वर्षभर प्रसार माध्यमांतुन प्रसिद्धी देतो अश्यांकडून दिवाळीची जाहिरात घेऊन मिळेल तेवढ्या कमिशनवर दिवाळी साजरी करतो.मात्र यावर्षी पत्रकारांना एक वेगळाच अनुभव आलाय.यावेळी अनेक अधिकाऱ्यांनी,पतसंस्थांनी,पुढार्‍यांनी जाहिरातीसाठी स्पष्ट नकाराच दिला, त्याचे कारणही तसेच वेगळे आहे.

ज्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी एकच अनुभव ! आमच्याकडे इतकी शुभेच्छा कार्ड आली, निवेदने आली, आम्ही जाहिरात द्यायची तरी कुणाला अशा अनेकांकडून प्रतिक्रिया उमटत होत्या तर काहींनी तर चक्क सांगितले की आमच्याकडे आलेल्या यादीत तुमचे नावच नाही तर तुम्ही अधिकृत पत्रकार कसे तुमचे जर डीआयओ च्या यादीत नाव नाही तर तुम्ही पत्रकार नाहीत असा जणू काही त्यांचा समजच झाला असावा,यामुळे अनेक पत्रकारांना या समस्यांचा सामना करावा लागला.

खऱ्या अर्थाने त्यांचेही काय चुकते म्हणा आजच्या पत्रकारितेमध्ये ज्यांना लिहिता-वाचता येत नाही असे सुद्धा पत्रकारिता क्षेत्रामध्ये पदार्पण करून बसले काहींनी तर या दिवाळीला प्रति कार्ड कमिशन प्रमाणे व्यक्तीच नेमले होते असेही अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.अशा भुरट्या पत्रकारांमुळे पत्रकारिताक्षेत्रामध्ये अतिक्रमण होत चालले आहे.मात्र यावर नक्कीच तोडगा निघू शकतो, हो नक्कीच निघू शकतो यासाठी जिल्ह्यात विविध पत्रकार संघटना काम करत असून यांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.अन्यथा येणारा काळ पत्रकारांसाठी नक्कीच धोकादायक ठरू शकतो.या वर्षी दिवाळीतून आलेल्या अनुभवातून प्रत्येक पत्रकारांनी बोध घ्यावा.

 

*जाहिरात नाही तर बातमी पण नाही !!*

  ✍️ _यवतमाळ जिल्ह्यातील काही राजकीय,सामाजिक आणि अधिकारी मंडळी वर्षभर पत्रकारांना बातम्या देऊन त्यांचा वापर करून घेतात.परंतु दिपावलीची जाहिरात मागितली तर जाहिरातीला कारणे सांगतात. वर्षभर बातम्या छापायच्या आणि जाहिरात  द्यायची नाही…लोकांच्या या धोरणाला कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी ज्यांनी जाहिरात दिली नाही.त्यांची वर्षभर बातमी छापूच नये.ज्या प्रतिनिधींना (पत्रकारांना) जाहिरात मिळाली नसेल त्यांनी जर यापुढे अशा लोकांच्या बातम्या देण्याचे टाळले तर याचा निश्चितच चांगला परिणाम होईल.यासाठी सर्व पत्रकारांनी एकजूट होणे गरजेचे आहे. किमान वर्षभर तरी जाहिरात न देणाऱ्या नेत्यांच्या बातम्या अजिबात छापू नये हीच भूमिका पत्रकार बंधूंनी घेण्याची गरज आहे._

पटलं तर बघा…विचार करा..आणि कृती करा..!

✒️शब्दांकन:-सुकांत प्रकाश वंजारी(दैनिक लोकनायक,जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9689179267