

ढगफुटी पावसाने अनेकांची दाणादाण उडवून दिली. त्यात सर्वात नुकसान हे शेतकऱ्यांचे झाले.त्यांचे दुःख फारसे कुणाला झाले नाही. शेतकऱ्यांन बद्दल सरकार व प्रशासनातील कर्मचारी अधिकारी नेहमीच बेफिकीर आणि बेजबाबदार पणे वागतात. असे शहरात राहणाऱ्यांना वाटत नाही. कारण शहरात नोकरी करणाऱ्यांना दरमहिन्याला न चुकता पगार मिळतो,दरवर्षी पगारवाढ, भाववाढ, बोनस न चुकता मिळत असतो,तसे शेतकऱ्यांचे नाही, त्यांना कोणते फळ बिना मेहनत शिवाय मिळत नाही. खेड्यातील शेतकऱ्याचा मुलगा शहरात नोकरीला लागला की तो ही म्हणतो शेतकऱ्यांना गाय फुकट दूध देते. पण गाय कधीच दूध देत नाही तर ते काढावे लागते, आणि ते काढण्यासाठी कला कौशल्य, कष्ट त्याग व जिद्द लागते.तेच मी एका गोष्टीने समजावून सांगतो.
एक कष्टाळू शेतकरी होता. वडिलोपार्जित दोन एकर जमिनीची त्याने बारा एकर जमिन केली. फक्त शेतीवरच अवलंबून न रहाता त्याने गायी, म्हशी, कोंबड्यापण पाळलेल्या होत्या, त्यांच्यापासूनही अतिरिक्त कमाई होती त्याला. प्रामाणिक वृत्ती, सोबत त्याच्या पत्नीची प्रत्येक कामात पूर्ण साथ, यामुळे घरही नेहेमी आनंदी भासे, मुलांवर कला कौशल्य,कष्ट त्याग व जिद्द यांचे सुसंस्कार होत होते. त्या शेतकऱ्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. एक दिवस तो मुलांना म्हणाला, तुम्ही १४ वर्षांचे झाला की मी तुम्हाला जीवनाचं सत्य सांगेल “यशस्वी जीवनाचा मंत्र सांगेन.” निसर्गाच्या नियमाने मोठा मुलगा १४ वर्षांचा झाला. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस आनंदाने साजरा झाला. त्यावेळी मुलाने बाबाला विचारलं, “बाबा सांगा मला जीवनाचं सत्य,आणि यशाचा मंत्र.”
शेतकरी बाप हा नेहमीच हुशार असतो, निसर्गाच्या सानिध्यात राहून सर्व अलिखित नियम तो पाळतो. मुलाला शेतात घेऊन गेला, गायीजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “जीवनाचं मोठं सत्य सांगतो ते समजून घे.गाय दुध देत नाही!. हे जीवनाचं मोठं सत्य आहे.” मुलगा आश्चर्याने पहातच राहिला,म्हणाला, बाबा तुम्ही हे काय सांगताय? आपली गाय तर रोजच दुध देते, हे तर शंभर टक्के खोटं बोलताय तुम्ही!, आणि यात यशाचा मंत्र तर अजिबातच दिसत नाही.
शेतकरी बाप म्हणाला, होय, गाय दूध देत नाही, गाय दुध देत नाही,ते प्रेमाने कला कौशल्याने काढावे लागते.म्हणूनच दूध आपण काढलं तरच मिळतं.नाही तर नाहीच!.बाळा गाय पाळल्यावर तिची योग्य निगा घ्यावी लागते,चारापाणी व्यवस्थित करावं लागतं, वासरू झाल्यावर त्याची ही काळजी घ्यावी लागते. दुध काढण्यासाठी सकाळीच चार वाजता उठावं लागते,शेतात यावं लागते,गोठ्यातलं रात्रभर जमा झालेलं शेण साफ करावं लागते, चारा टाकावा लागतो.
गायीजवळ वासराला आणायचं, पान्हा फुटला की हळूच त्याला दुर करायचं त्यामुळे तिने गाय ने मारू नये म्हणून तिचे पाय बांधायला लागतात, शेपटी बांधावी लागते,तरी ती आपोआप दुध देत नाही.त्यासाठी तिला गोंजारत गोंजारत दुध काढावं लागते ,बाळा मगच ते आपल्याला दूध मिळते. म्हणजेच आपल्याला विना मेहनतीचं गाय दुध देत नाही, ते आपल्यालाच काढावं लागतं.गाय दुध देत नाही,ते प्रेमाने कला कौशल्याने काढावे लागते.मग सांग बाळा हा जीवनाचे सत्य आणि यशाचा मंत्र आहे की नाही.
बाळा मागितल्याने काहीच मिळत नाही आणि संघर्षाशिवाय कोणताही पर्याय नाही.हेच जीवनाचे सत्य, आणि यशाचा मंत्र हे तुमची आताची ही नवी पिढी समजून घेत नाही. तुम्हाला वाटते गाय स्वतःच दुध देते. प्रत्येक गोष्ट सहजच मिळते, मनात इच्छा झाली की ,पण दुध काढावं लागतं.कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात हे तुमची पिढी विसरतेय. “इच्छा करा,कॉल करा व मागवा. म्हणजे वस्तु समोर हजर,ही तुमची वृत्ती झाली आहे.
कोणतीही गोष्ट मनात आली,आईबाबाला सांगितलं की लगेच मिळते तुम्हाला,त्यासाठी किती कष्ट त्याग जिद्दीने मेहनत करावी लागते, तेव्हा ती मिळते, पण आजच्या तरूण पिढीला तशी सवयच झाली आहे.तु लहान आहेस तोपर्यंत तुझ्या गरजा पुरवणं आमचं कर्तव्यच आहे.पण आता तु १४ वर्षांचा झालास.सगळं आपोआप मिळत नसतं याची जाणिव करून देणं हेही आमचं कर्तव्यच,आणि संस्कार करण्याची जबाबदारी आहे.आतापर्यंत सहज मिळणाऱ्या गोष्टींमागेही कष्ट करावे लागतात, त्या आपोआप इच्छा केली की मिळत नाहीत, हेही तुला समजणं गरजेचंच आहे!
“बाळा तुला चांगलं शिक्षण, पदवी पाहिजे तर तुला जीव तोडून अभ्यास करावा लागेल. तुला यश,समृद्धी,पैसा पाहिजे तर हुशारीने मेहनत करावी लागेल. तुला नाव, प्रसिद्धी पाहिजे असेल तर समाजासाठी काही तरी करावे लागेल.इतकंच नाही बाळा तर तुझ्या आजूबाजूची माणसं, तुझा परिवार आनंदी, हसरा हवा असेल तर तोही आपोआप मिळणार नाही, त्यासाठी तुला आधी प्रेमळ आणि हसतमुख रहावं लागेल.” कोणतीही गोष्ट आपोआप, इच्छा केली की मिळत नसते. त्यासाठी परिश्रम हे घ्यावेच लागतात. आणि आयते, आपोआप मिळालेल तकलादू असते, टिकत नसते. सातत्य नसले की वाढत नसते.गाय दुध देत नाही,ते प्रेमाने कला कौशल्याने काढावे लागते.म्हणून गाय दुध देत नाही, ते काढावं लागते हे जीवनाचं महत्वाचं सत्य माहित असणे जरूरी आहे.कोणतेही काम हुशारीने केलेले नियोजन, परिश्रम, सातत्य आणि प्रयत्न हाच यशाचा मंत्र हे ही माहित असणे आवश्यक आहे.म्हणूनच बाळा गाय दुध देत नाही,ते प्रेमाने कला कौशल्याने काढावे लागते.तोच नियमित सुखी, समाधानी जीवन जगण्यासाठी लागू असतो.
(जनार्दन ओंकार डिवरे अनुसया बाई डिवरे मुक्काम पोस्ट खुमगांव बुर्ती,तालुका नांदुरा जिल्हा बुलडाणा यांच्याशी गाय दूध देते या विषयी खूप चर्चा करून त्यांनी त्यांच्या गायीसाठी किती त्याग व कष्ट केले ते सांगितले)
✒️सागर रामभाऊ तायडे(भांडुप मुंबई)मो:-9920403859