संजीवन समाधी अमृत महोत्सवानिमित्त धार्मिक, अध्यात्मिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

16

✒️प्रतिनिधी सातारा,खटाव(नितीन राजे)

सातारा(दि.31ऑक्टोबर):- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. याकरिता ट्रस्टच्या वतीने संजीवन समाधी अमृत महोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर ते मंगळवार दिनांक २७ डिसेंबर अखेर धार्मिक, अध्यात्मिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र सोहळ्यात भाविका-भक्तांचे सुध्दा योगदान असावे यासाठी पैशांच्या स्वरूपात देणगी स्वीकारण्याचा निर्णय ट्रस्टमार्फत घेण्यात आल्याची माहिती देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव व विश्वस्तांनी दिली.

सोहळ्यात श्रीराम कथा सप्ताह, श्री भागवत कथा सप्ताह, श्री गुरुचरित्र व श्री सेवागिरी विजयामृत ग्रंथाचे पारायण, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने, हरिपाठ, भजन स्पर्धा, झेंडा मिरवणूक, क्रिकेट स्पर्धा, हॉलीबॉल स्पर्धा, श्री सेवागिरी मॅरेथॉन स्पर्धा, बैलगाडी शर्यती, कुस्त्यांचा आखाडा, रथोस्तव, कृषी प्रदर्शन, युवा महोत्सव, श्वान शर्यती कबड्डी स्पर्धा, खिलार जनावरांची नोंद, निवड व बक्षीस समारंभ इत्यादी कार्यक्रमांचा समावेश आहे.यंदाचा अमृतमहोत्सवी सोहळा दर्जेदार व्हावा.

यासाठी देवस्थान ट्रस्टने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आले असून देणगी स्विकारण्यास सुरुवात झाली आहे. श्री राम कथेसाठी तरडफ (ता. फलटण) येथील सुनील चंद्रकांत गोडसे यांनी १ लाख ५१ हजार रुपयांची देणगी जमा करून या पवित्र कार्यास प्रारंभ केला आहे. देणगी देऊन ज्या भाविक-भक्तांना अमृत महोत्सव सोहळ्यास हातभार लावण्याची इच्छा असेल त्यांनी ट्रस्टशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी केले आहे.दरम्यान, अमृत महोत्सव सोहळ्याच्या यशस्वीतेसठी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.