मळणीसाठी ठेवलेला सोयाबीनचा ढीग रात्री पेटवून दिला

32

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)

सातारा(दि.1नोव्हेंबर):-शेतकरी एकीकडे अतिवृष्टीने संकटात अडकला असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी विसापूर (ता. खटाव) येथील पंकज कदम यांच्या दोन एकर शेतातील सोयाबीन काढून मळणीसाठी ठेवलेला ढीग शनिवारी रात्री पेटवून दिला. यामध्ये सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.

खटाव तालुक्यातील खातगुण विसापूर हद्दीतील शेतकरी आदिक यादव यांचे शेत पंकज कदम हे गेली चार वर्षे खंडाने करत आहेत. या शेतात जुलै महिन्यात सोयाबीनचे पीक केले होते. सोयाबीन काढून ठेवलेले पीक अज्ञात व्यक्तीकडून जाळण्यात आले आहे. ज्या ठिकाणी सोयाबीन गाळण्यासाठी ठेवण्यात आले होते.

त्या ठिकाणी पिकाची राख झालेली पाहून कदम यांच्या डोळ्यात पाणी तरळले. संबंधित घटनेचा पंचनामा करण्याकरिता विभागातील सर्कल, तलाठी यांना फोन केला असता फोन बंद लागले. शेतकरी अतिवृष्टी विविध समस्यांतून चालला असताना समाजात काही विघ्नसंतोषी लोकांकडून अशा पद्धतीने पिकाची नासधूस होणे, ही गंभीर बाब आहे.