

पाकिस्तानमध्ये सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पंतप्रधान कोणीही असो मात्र तेथे सत्ता चालते ती लष्कराचीच. लष्कर सांगेल तीच व्यक्ती पंतप्रधान पदावर असते आणि त्या व्यक्तीला लष्कर सांगेल त्याचप्रमाणे वागावे लागते. एकाअर्थी पाकिस्तानचे पंतप्रधान लष्कराच्या हातचे बाहुले असते. जोवर लष्कराची मर्जी असेल तोवर ती व्यक्ती पंतप्रधानपदावर असते जेंव्हा लष्कराची खप्पामर्जी होते तेंव्हा त्या व्यक्तीला पंतप्रधानपदावर पाणी सोडावे लागते. पाकिस्तानात आजवर हेच घडले आहे. २०१८ साली पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इंसाफ पाकिस्तान संघाचे प्रमुख इम्रान खान हे लष्कराच्या मदतीनेच पंतप्रधान बनले आणि जोवर लष्कराची मर्जी होती तोवर पदावर राहिले मात्र पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जावेद कमर बाजवा यांच्याशी त्यांचे वितुष्ट आले आणि त्यांना आपली खुर्ची सोडावी लागली. लष्कराने आयएसआयचया मदतीने त्यांचे सरकार पाडले.
त्यानंतर पाकिस्तानमध्ये सर्वपक्षीय सरकार अस्तित्वात आले असून सध्या लष्कराचे ब्ल्यू आय बॉय असलेले पाकिस्तान मुस्लिम लीगचे शहाबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. शहाबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे लहान बंधू आहेत. शहाबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान असले तरी ते देखील लष्कराच्या हातचे बाहुलेच आहे. लष्कर सांगेल त्याप्रमाणेच त्यांचा कारभार चालू आहे त्यामुळे त्यांची सत्ता अजून काही काळ तरी शाबूत आहे. २०२३ साली पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहे या निवडणुकीत लष्कराच्याच मदतीने शहाबाज शरीफ हेच पंतप्रधान बनतील असे चिन्ह दिसू लागल्याने इम्रान खान पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. जोवर जावेद कमर बाजवा हे लष्करप्रमुख पदावर आहेत तोवर आपल्याला पुन्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची खुर्ची मिळणार नाही हे जाणून आता इम्रान खान यांनी थेट पाकिस्तानी लष्कराविरुद्धच एल्गार पुकारला आहे.
इम्रान खान यांनी लष्कर आणि शहाबाज शरीफ यांच्याविरोधात देशभर पदयात्रा काढली आहे. सुरवातीला या पदयात्रेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही मात्र केनियामध्ये पाकिस्तानच्या एका पत्रकाराची तेथील पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला हा पत्रकार इम्रान खान यांचा कट्टर समर्थक होता. या पत्रकाराची मृत्यू झाल्यावर इम्रान खान यांनी त्याचे भांडवल करत ही हत्या पाकिस्तानी लष्करानेच घडवली असल्याचे ठामपणे सांगितले. पदयात्रेत ते लोकांना ठामपणे सांगत असून लष्कराविरुद्ध जनतेच्या मनात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात काही प्रमाणात ते यशस्वीही झाले आहेत त्यामुळेच या पत्रकाराची हत्या नसून केनियाच्या पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात चुकून मृत्यू झाला असल्याचे लष्करामार्फत सांगण्यात आले आहे.
मात्र लष्कराच्या या स्पष्टीकरणावर पाकिस्तानी जनतेचा विश्वास नाही त्यामुळेच इम्रान खान यांच्या पदयात्रेला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. इम्रान खान यांच्या पदयात्रेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून पाकिस्तानी लष्कर हबकले आहे. पाकिस्तानी जनतेचा इम्रान खान यांना मिळणारा प्रतिसाद असाच वाढत राहिला तर २०२३ च्या निवडणुकीत इम्रान खान हे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरतील हे ओळखून पाकिस्तानी लष्कर इम्रान खान यांच्या विरोधात षढयंत्र आखत आहेत. यात लष्कर किती यशस्वी होईल हे येणारा काळच सांगेल मात्र आता इम्रान खान आणि लष्कर यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे.
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५