चोर सभेत आहे.चोर मंडपात आहे

17

मी सुद्धा गद्दाराच्या, गुन्हेगारांचा, भ्रष्टाचाराचा विरोधक आहेच.पण राजकीय भुमिकेतून.धोरणात्मक भुमिकेतून.आपण अशा गुंड, गुन्हेगार लोकांना राजकारणात स्थान देऊ नये.राजकारण बिघडते.त्याचाच हा परिणाम आपण भोगत आहोत.महाराष्ट्र राजकारणात अधिकतम असेच अराजकीय लोक जास्त आहेत.म्हणून कोणत्याही पक्षाला,नेत्याला एकहाती सत्ता मिळत नाही.जसे बिजू पटनायक,के सी आर, जगमोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल,ममता बैनर्जी यांनी राजकीय स्थैर्य मिळवले आहे.राजकारण मुळातच सभ्य लोकांचे असते.सभ्य लोकांचे सभागृह बनते.असभ्य लोकांचे अड्डा बनतो.महाराष्ट्रातील काही पक्ष अड्डा,गॅंग ,टोळी म्हणून काम करतात.महाराष्ट्र जितका पुरोगामी म्हणवून मिरवतो त्यापेक्षा जास्त गुन्हेगारी राजकारणात अग्रेसर आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी स्वरूपाचे राजकारण जास्त होत आहे.म्हणून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची पकड बसत नाही,स्थान मिळत नाही.

दिल्ली मेट्रोपॉलिटन सीटी असूनही , संपूर्ण भारतातील नागरिक तेथे राहात असूनही त्यांनी भ्रष्टाचाराची चीड मानली.गुंड,गुन्हेगारांची चीड मानली.म्हणून अपेक्षित बदल झाला.असे महाराष्ट्रात होत नाही.त्याची कारणे आहेत, आम्ही गुन्हेगार, भ्रष्टाचार स्विकारला.नाकारला नाही.हे नाकारणे जेंव्हा कळेल,वळेल तेंव्हा आम्ही सुद्धा दिल्लीसारखाच बदल घडवू.घडू शकतो.आम्ही जळगाव, धुळे,नाशीक, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, नागपूर ची माणसे सुद्धा दिल्ली सारखीच आहेत.किंबहुना येथीलच माणसे दिल्लीत राहायला गेली आहेत.पण ते तेथे सुबुद्ध झालेत.आम्ही अजून निर्बुद्ध पडून आहोत.त्याचा हा परिणाम आहे.
जळगाव शहरातील एकही नगरसेवक असा नाही कि ज्याने मत विकत घेतले नाही.जर नगरसेवक पापी असेल, अनैतिक असेल, भ्रष्टाचार करीत असेल तर नगर सुधारणार नाही.शक्यच नाही.घरातील केर काढतांना केरसुणी स्वच्छ पाहिजे.कपड्याचा मळ काढतांना साबण स्वच्छ पाहिजे.केरसुणी आणि साबण घाणेरडा असेल तर घाण कमी न होता वाढेलच.तोच प्रकार जळगाव शहरातील नगरपालिकाबाबत झाला आहे.आमचा आमदार सुद्धा निषिद्ध धंदा करून पैसा कमावतो.तोच पैसा निर्बुद्ध मतदारांना देतो.

त्यांचे मत खरेदी करतो.आमची सुरूवात हिच निषिद्ध आहे तर यातून शुद्ध काहीच घडणार नाही.त्याचे परिणाम आम्ही मत विकणारे मतदार भोगत आहोत.म्हणे रस्ते का बनत नाहीत? याचे उत्तर आपले मत विकण्यात सापडते.आम्ही मतदार त्याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करतो.मतदार हाच पाप करतो, उमेदवार हाच पाप करतो आणि ओरडतो,पाप झाले हो! चोर स्वतः चोर चोर ओरडतो ,पळा पळा,धरा धरा .लोक पळतात.धरतील कोणाला?चोर तर तुमच्यातच आहे.चोर तर सभागृहात आहे.तो तर सुरक्षित आहे.हे लक्षात आणणे,लक्षात घेणे आवश्यक आहे.

जळगाव येथे एका माणसाने रस्ता बनवण्यासाठी जळगाव महापालिका इमारत समोर उपोषण सुरू केले.सर्वच नगरसेवक आणि शहराचे आमदार भेटून गेले.शुभेच्छा देऊन गेले.यांनी सुद्धा त्यांचे आभार मानले.हा विचित्र प्रकार आहे.एकाही नगरसेवकाला, आमदाराला लाज वाटत नाही कि,हा माणूस आपल्या चुकीमुळे , आपल्या चोरीमुळे येथे बसला आहे.पण चोर हा निर्लज्ज असतो.त्याला पैसा हाच परमेश्वर असतो.म्हणून तो हे सगळे अभिनय करतो.मतदार प्रेक्षक बनून कौतुक करतो.

विशेष म्हणजे उपोषणाला बसलेला माणूस येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अभिमानाने सांगतो,सगळे नगरसेवक, महापौर मला भेटून गेले.आमदार भेटून गेले.माझ्यासोबत फोटो काढला.खूप चांगला माणूस आहे.आता रस्ते बनवले नाहीत, याबद्दलचा माझा राग, संताप कमी झाला आहे.हा भ्रम अजूनही शिल्लक आहेच.तोपर्यंत अपेक्षित बदल शक्य नाही.जोपर्यंत चोर सभागृहात आहे,चोर मंडपात आहे तोपर्यंत तरी बदल शक्य नाही.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव