भंडारा, गोंदिया जिल्हयातील सिंचनप्रकल्पांसाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा

13

🔺विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई (दि.9जुलै):-भंडारा, गोंदिया जिल्हयातील प्रलंबित सिंचनप्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा आणि हे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होवून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या संदर्भात आज दिनांक 09 जुलै, 2020 रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची महत्वपूर्ण चर्चा झाली.  विधानभवन मुंबई येथे जलसंपदा मंत्री यांनी विधानसभा अध्यक्ष यांची भेट घेतली.  यावेळी विदर्भातील सिंचन अनुशेष आणि अन्य विषयांवर उभयतांमध्ये चर्चा झाली. 

            गोसीखुर्द पाटबंधारे प्रकल्पास शासनाने नियोजित केल्याप्रमाणे सन 2020-21 साठी रु.1,500 कोटी (पंधराशे कोटी) उपलब्ध करुन देण्यात यावेत, भंडारा तालुक्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजना प्रकल्पास तातडीने सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात यावी, भंडारा जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागास तुमसर व लाखांदूर येथे दोन नवीन उप विभाग मंजूर करण्यात यावेत, गोंदिया जिल्हयातील धापेवाडा उपसा जलसिंचन योजना टप्पा-2 ला येत्या पावसाळी अधिवेशनात रु.20 कोटी अधिकचा निधी पुरवणी मागणीव्दारे मंजूर करण्यात यावा आदि महत्वाच्या प्रश्नी यावेळी चर्चा झाली.  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना यासंदर्भात सकारात्मक दृष्टीकोन ठेवून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.