

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.5नोव्हेंबर):-आत्मविश्वासाने जो पुढे जातो तोच आयुष्यात यशस्वी होतो. समाजात पुढे जाणाऱ्यांना मागे खेचणारे असतात. परंतु त्याकडे नेहमी दुर्लक्ष करून ध्येय गाठावे लागते. आणि ते ध्येय गाठण्यासाठी युवकांना हा मेळावा दिशा देणारा आहे, असा आशावाद गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला.
युवा उद्योजक सुनिल भैय्या गुट्टे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात
शहरातील संत जनाबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित दोन दिवसीय भव्य नौकरी मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी आयोजक सुनिल भैय्या गुट्टे, व्यवस्थापक श्रीराम सातपुते, अनिरुद्ध शिंगाडे, रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव रोकडे, जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप आळनुरे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब एंगडे, गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंढे, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, जिल्हा सरचिटणीस रवि कांबळे, विधानसभाध्यक्ष कृष्णाजी सोळंके, माजी जि.प.सदस्य किशनराव भोसले, माजी सभापती शिवाजी निरदुडे,तालुकाध्यक्ष रामजी सातपुते, गणेश कदम, शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, अॅड.मिलिंद क्षिरसागर, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, सचिन देशमुख, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, वैजनाथ टोले, पत्रकार पिराजी कांबळे, बाबा पोले, जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे, इंतेसार सिद्दीकी, इकबाल चाऊस, छोटू कामत, उध्दव शिंदे, खालेद शेख, प्रदीप वेरुळकर, प्रभाकर सातपुते, सचिन महाजन, सचिन नाव्हेकर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, कोरोनाच्या संकटात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हाताला काम नसलेले युवक निराश आणि हतबल झाले आहे. म्हणून निराश झालेल्या युवकास आशेचा नवा किरण देणारा हा मेळावा आयोजित करणे काळाची गरज आहे. परंतु असे मेळावे केवळ परभणी नव्हे तर राज्याच्या कानाकोपाऱ्यात नौकरी मेळावे झाले पाहिजेत.
दोन दिवसीय असणाऱ्या या मेळाव्यास पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील तब्बल २१७० बेरोजगार युवकांनी उपस्थित राहून मुलाखती दिल्या. त्यापैकी ७८२ युवकांना गुणवत्तेनुसार विविध कंपन्यांनी नियुक्ती पत्र दिले. त्यामुळे बेरोजगार युवकांनी आनंद व्यक्त केला.
दरम्यान, आज सुध्दा मेळाव्यात जवळपास २१०० हजार युवक उपस्थित राहाणार असून त्यांना सुध्दा शिक्षण, अनुभव आणि कौशल्य विचारात घेऊन नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत. उमेदवाराची निवड करताना संपूर्ण पारदर्शकता बाळगून नियोजन केले असल्याची माहिती गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे यांनी सांगितले.
*कहीं खुशी, कहीं गम – सुनिल भैय्या गुट्टे*
गावखेड्यातल्या तरुणाला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही हा मेळावा आयोजित केला असून पहिल्याच दिवशी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला समाधान वाटत आहे. परंतु तरुणांचे कौशल्य गुण व शिक्षणानुसार नौकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ हा अनुभव आम्ही दिवसभर बघत आहोत, अशी स्पष्टोक्ती आयोजक सुनिल भैय्या गुट्टे यांनी दिली.