बालरोग उपचाराचा जादूगार…!

40

सन 2014 मध्ये ‘रेगे’ नावाचा एक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलिज झाला होता. मी काही तो पाहिला नाही; पण त्याचा सारांश एक लेखक म्हणून थोडक्यात माहिती आहे. आता तो आठवण्याचे कारण हे की, माझ्या छोट्या मुलाचे (वय- 2 वर्षे) ट्रीटमेंट सध्या डॉ.रमेश रेंगे(बालरोगतज्ज्ञ, नांदेड ) यांच्याकडे चालू आहे. ‘रेगे-रेंगे’ थोडे समसमान वाटले; (लिहिण्यापूरते) आणि रेगे चित्रपटाचे कथानकही वैद्यकीय क्षेत्राशी निगडितच आहे. फरक इतका की ते कथानक थोडे नकारात्मक आहे; पण डॉ.रेंगे सर हे त्यांच्या रुग्णांसाठी अत्यन्त सकारात्मक आहेत.

माझ्या मुलाची प्रतिकारक्षमता थोडी कमी असल्याकारणाने तो इतर मुलांच्या तुलनेत संसर्गास लवकर बळी पडतो; आणि सारखा आजारी राहतो. तसे रेंगे सरांनी सांगितले की वय वाढेल तशी सुधारणा होऊन जाईल. आता आम्ही आमच्या मुलाच्या सारखे मागे राहून पार थकून गेलोय. देव लवकर दर्शन देत नाहीत म्हणतात. त्यासाठी खूप कष्ट झेलावे लागतात; असेही म्हणतात. तशा डॉक्टररुपी अनेक देवांच्या वाऱ्या आम्ही केल्यात; पण आम्हाला हवाय तो देव लवकर पावला नाही. जे पावले ते नैवेद्यापुरतेच होते. आम्ही ज्या डॉक्टरकडे नेहमी जायचो त्यांच्याकडे एके दिवशी गर्दी होती म्हणून डॉ.रेंगेंकडे आम्ही चुकून आलो. एरवी आमचा नियमित डॉक्टर अनियमित आजाराचे निदान फारच वळसा मारून करायचे, त्यात आमचा फडशाच पडायचा. तो फडशा रेंगेंकडे पडत नाही हे विशेष! म्हणजे सुरुवात ही पाया करून कळस न होता, सरळ निशाणा रोगाच्या निदानाचा असतो (हे निदानापूरते). हं! त्याची सुरुवात ही पाया बांधण्याचीच असते. म्हणजे आधी औषोधोपचाराने रुग्ण बरा करण्याचा प्रयत्न होतो. जर औषोधोपचाराने फरक नाही पडला तर, काही दिवसांचा घरीच 3-4 दिवसांचा इंजेक्शनचा कोर्स दिला जातो; आणि या उपरांत पेशंट उपचाराला प्रतिसाद देत नसेल तरच त्याला रुग्णालयात काही दिवसांसाठी ऍडमिट केले जाते. अशी प्रक्रिया इथे पहायला मिळते.

जी रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी खरंच खूप जास्त सोयीस्कर आहे. विनाकारण रुग्णाला भरती करून त्याची व त्याच्या आई-वडिलांची दमछाक इथे होता र्हाईपर्यंत टाळली जाते. एखादा पेशंट आधीच खूप गंभीर असेल तर त्याला ताबडतोब ऍडमिट करून घेतल्याशिवाय पुढील उपचार करणे सोपे जात नाही. आम्ही बऱ्याच वेळा आमच्या मुलाला हॉस्पिटलाईझ करायच्या अंदाजानेच गेलो; पण चार दिवसांचे मेडिकेशन घेऊन परतलो. व रुग्ण नन्तर बराही या चार दिवसांच्या घरी दिलेल्या उपचारानेच झाला.

आम्ही ज्या जिल्ह्यात वास्तव्यास आहोत तिथे मराठवाड्यातील सर्वोत्कृष्ठ डॉक्टर्स आहेत. नांदेड म्हणजे शिक्षणाची गंगा आणि दवाखाण्याचा कारखाना झाला आहे. जिथे काही प्रॉडक्ट्स उत्तम तर काही जेमतेम आहेत. आमच्या वाट्याल्या तर जेमतेमही सुरुवातीच्या काळात आले नाही. रुग्णालयात गेलो की हे टेस्ट करा, ती टेस्ट करा! याने तोंडाची टेस्ट कधी गेली, ते कळालेच नाही. पण, डॉ. रेंगे सरांनी आमची टेस्ट अचूक ओळखून पाहिजे तीच ब्लड टेस्ट असो की एखादा छोटासा एक्सरे असो करून लवकरात लवकर निदान व तितक्याच लवकर उपचाराने आमची टेस्ट परत मिळवून दिली. आधी त्यांनी या लॅबवरून त्या लॅबवरची पळापळी थांबवून आम्हाला विस्थापित होण्यापासून वाचवले. त्यांचे ‘डोन्ट वरी’ हे नेहमी वापरले जाणारे वाक्य, वाक्य नसून नातेवाईकांसाठी आधाराचा मोठा आधार आहे.

मला एक लेखक म्हणून तसेच विज्ञानाचा विद्यार्थी व व्यवसायाने शिक्षक म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील बऱ्याच संज्ञा पाठ आहेत. बऱ्याच औषधांचे कंटेंट्सही माहिती आहेत. खूप साऱ्या ब्लड टेस्ट केल्या आहेत. काहीतर पाच दहा वेळाही झाल्या असतील. जिथे कोविड 19 पासून सी.आर.पी. टेस्ट करण्याचा सपाटाच लावला. जणू सी.आर.पी. चा शोध 2019 लाच लागला असावा. तिथे माझ्या ऐकिवात ‘विल फिलिक्स’ (weil felix) ही ब्लड टेस्ट पहिल्यांदाच आली. जी रेंगे हॉस्पिटलमध्येच झाली. लोकांचीही इतर रुग्णालयात झाली असेलही, पण सी.बी.सी., सी.आर.पी., विडाल, पी. टी. ओ. टी., मलेरिया, डेंग्यू आशा बऱ्याच टेस्ट करून वेस्ट घालायला आणखी पैसा उरलाच तर चुकून या टेस्टचा नंबर लागला असेल. जिथे लक्षणावरून डॉक्टरला आपल्या रुग्णाची अर्धी माहिती कळते, तिथे अचूक व लवकर निदान करायला या टेस्ट होणे अपेक्षित आहे. असा सरळ मार्ग रेंगे सर नेहमीच धरतात.

रुग्णालय काय फाइव्ह स्टार आहे; असे मी म्हणत नाही. पण याचा मालक व इथला हिरो स्टार नक्कीच आहे. जो बोलण्यामध्ये अत्यंत मृदू आहे. तशी डॉक्टरांची भाषा अशीच हवी; पण इतक्यात ती लुप्त होत आहे. ती जीवंत ठेवण्याचे कार्य रेंगे सर करत आहेत. त्यांचा एक विशेष गुण हा की ते रुग्णाच्या नातेवाईकांना उपचाराबद्धल किंवा पेशंटच्या प्रगतीबद्दल नकारात्मक कधीच बोलत नाही. सदैव चेहऱ्यावर प्रसन्नता व समाधान असते. जे पाहून आम्हाला नक्कीच हुरूप येतो.
रुग्णालयाचा संपूर्ण स्टाफ कर्मचारी म्हणून पाहिजे तसाच आहे. सर्वोत्कृष्टही नाही, अन बेकारही! आपण त्याला उत्तम म्हणू शकतो. विशेषकरून उल्लेख करावा अशी 60 वर्षांची सफाई करणारी एक मावशी आहे, जी इमानदारीने काम करते. रुग्णाचे नातेवाईक कधी त्या बाईची आस्थेवाईकपणे चौकशी करत असतील का नाही? काय माहित! पण आम्ही तिला बोलतो व तिचे तोंडभरून कौतुक करून कधीमधी बक्षिसही देतो. जे तिच्या मेहनतीला फार त्रोटक आहे, पण आम्ही दखल घेतली याचा तो पुरावा आहे.

डॉक्टरांकडे स्वतः पुरतेच काम घेऊन एकदा जा, की तीनदा जा! त्यांचा चेहरा तोच व वर्तनही तेच. शिष्टाचार व त्याला चांगल्या विचारांचा आधार, ही रेंगे सरांची यु. एस.पी. आपण म्हणून शकतो.
मला हे डॉक्टर आवडण्यामागचे कारण ते मला त्यांची फीस माफ करतात म्हणून नाही, अर्थात ती तर ते घेतातच. मला आवडण्यामागचे कारण हेच की मला एकाच दुखण्यासाठी माझ्या पोराला दवाखान्यात तीनदा घेऊन जायची गरज नाही. माझ्या मुलाचे आजारपण मुळातून बरे करायला काय ते देव नाहीत. पण देवातले देवत्व जीवंत ठेवून माझ्या काळजाच्या तुकड्याचा त्रास कमी करणारे ते ‘देवदूत’ नक्कीच आहेत.शेवटी जाताना एवढेच सांगतो, की माझ्या आयुष्यात आलेले हे काही पहिले डॉक्टर नाहीत. निदान एक-दीड डझन तर आले असतीलच. पण ज्यांच्या कामावर लिहावे वाटले ते कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद येथील डॉ.देशपांडे सरांनंतर डॉ.रेंगे हे दुसरेच! अर्थात उत्कृष्टमध्ये पहिला व दुसरा नसतो, फक्त अत्युच्च इतकेच असते. ज्या मापात डॉ.रेंगे सर व्यवस्थित बसतात.

सुरुवातीला ‘रेगे’ सिनेमाचे उदाहरण रेगे-रेंगे पुरते नव्हते. जो बरबटलेपणा वैद्यकीय क्षेत्रात फार खोलवर घुसला आहे, जी नकारात्मकता रेगे सिनेमात आहे, (मग ती कुठली का असेना!) त्यापेक्षा जास्त सकारात्मकता व सोज्वळपणा डॉ. रमेश रेंगे यांच्यात आहे. ही वेगळ्या अर्थाची दोन टोके मला सांगायची होती.
त्यांची फीस वाजवी असेल नाहीतर अवाजवी, लोकांना परवडणारी असेल किंवा नसेल. पण असाच नको तितका पैसा किंबहुना याहून जास्त लूट माझी अनेक वर्षे झाली, तिथे मला रेंगे सरांच्या अचुक कामाच्या कौशल्यामुळे व निष्ठेमुळे थोडासा आनंद तरी लुटता आला. तिथे वैद्यकीय खर्चाची फिकीर तरी कुठली म्हणावी.

हा लेख त्यांच्या कामाची पोचपावती समजा! यातली त्यांच्याकडील पावती तुमच्याकडे हवी असल्यास रुग्णालयास नक्की भेट द्या! मी म्हणतो म्हणून नाही, तुम्हाला पटले तर उपचार करा, नाहीतर नाही! जिथे हजार खर्चले तिथे शे-पाचशे आणखी. पण, आपल्या माणसासाठी काहीतरी केले, याचे समाधान तर मिळेल.

बुरखा पांघरलेल्या अवास्तव
वास्तवावरचे तेजस्वी विस्तव तुम्ही
जिथे सगळे एकाच माळेतले
तिथे वेगळा राहून
चमकणारा हिरा तुम्ही…!!

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती,नांदेड( लेखक/ कवी/व्याख्याते )मो:-8806721206