“पंचफुला प्रकाशनाने” दिली विद्रोही साहित्याला नवी उभारी

15

🔸डॉ. बालाजी जाधव यांच्याशी अविस्मरणीय भेट – लक्ष्मणराव पाटील[ सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते ]

✒️संभाजीनगर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

संभाजीनगर(दि.9नोव्हेंबर):– येथील “पंचफुला प्रकाशनामुळे” विद्रोही व पुरोगामी साहित्याला नवी उभारी तसेच हक्काचे विचारपीठ उपलब्ध झाल्यामुळे नवोदित लेखकांना अभिव्यक्त होण्याची अभिनव संधी उपलब्ध झाली आहे.

पुरोगामी विचारांचे गाढे अभ्यासक, विचारांशी कधीही तडजोड न करणारे, सत्याची कास धरून मार्गक्रमण करणारे, मनुवादी व्यवस्थेच्या डोळ्यात कुसळ प्रमाणे खुपणारे, ज्या विद्रोही साहित्याला प्रकाशित करण्याचं धाडस कोणीही दाखवत नाही अशा साहित्याला हक्काचे विचारपीठ उपलब्ध करून देणारे, मूळचा वैद्यकीय व्यवसाय सोडून दांभिक व्यवस्थेच्या महामारीतून बहुजनांना मुक्त करण्यासाठी वैचारिक खाद्य पुरविणारे प्रगल्भ लेखक, संवेदनशील माणूस, अभ्यासू वक्ते, पंचफुला प्रकाशन चे जनक डॉ. बालाजी जाधव सर आपल्या कार्यातून पुरोगामी विचारांची मशाल तेवत ठेवण्याचं कार्य सातत्याने करत आहेत.

काल संभाजीनगर येथे डॉ. बालाजी जाधव यांची भेट घेण्यासाठी लक्ष्मणराव पाटील, मोहीत पाटील, विशाल तोमर गेले असता डॉ. जाधव सरांनी मनमोकळे पणाने संवाद साधला. संभाजीनगर येथील कार्यालयात भेट घेतली, वैचारिक चळवळ आणि तिच्या कार्याबद्दल सविस्तर चर्चा झाली तसेच पंचफुला प्रकाशन ची अनमोल ग्रंथसंपदा घेऊन विचारगंगेच्या स्नानाने पवित्र झाल्याचा सुखद अनुभव घेतला.

होमिओपॅथी च्या माध्यमातून प्रॅक्टिशनर डॉक्टर म्हणून ज्यांची ख्याती होते आणि आहे असे डॉ. बालाजी जाधव पुरोगामी विचारांनी झपाटलेले लढवय्या योद्धे आहेत. असं म्हणतात की, ‘वेडे लोक इतिहास घडवितात आणि शहाणी माणसं तो इतिहास वाचतात’. आजच्या परिस्थितीत शहाणी माणसं मात्र आपल्या कामाशी काम ठेवून मला या सर्व बाबींशी काही देणंघेणं नाही असा साळसूदपणाचा आव आणतात. प्रवाहासोबत चालणं तसं सोपं असतं परंतु प्रवाहाच्या विरोधात जाण्यासाठी वेडेपणा असावा लागतो आणि तो वेडेपणा डॉ. बालाजी जाधव यांच्या व्यक्तिमत्वात झळकतो.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं त्यांचं व्यक्तिमत्त्व. तथागत गौतम बुध्दांपासून तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंपर्यंतच्या सर्व बहुजन महानायक व महानायिकांचा इतिहास परखडपणे लिहिण्याचे धाडस तसेच इतर लेखकांचे विद्रोही साहित्य प्रकाशित करण्याचं कार्य पंचफुला प्रकाशन करत आहे. परखड वक्तृत्व – कर्तृत्व आणि नेतृत्व असा त्रिवेणी संगम असणाऱ्या डॉ. बालाजी जाधव सरांच्या भेटीप्रसंगी धरणगाव येथील व्याख्याते लक्ष्मणराव पाटील, चंद्रमौळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे मोहीत पाटील, संभाजीनगर येथे कार्यरत असलेले शिक्षक विशाल तोमर उपस्थित होते.