

🔹पुसद येथील समीतीच्या वतीने बिरसा पर्व व भव्य मिरवणुकीचे आयोजन
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.9नोव्हेंबर):-क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.15 ऑगस्ट 1947 पूर्वी आपली मायभूमी परकीयांच्या गुलामीत होती. त्यांनी सांगावे व आपण ऐकावे असे चालले होते. निसर्गदत्त स्वातंत्र्यावर पुंडपुरोतांनी घाला घातला होता. परकीयांच्या जोखडात भारत माता बंदिस्त होती. परकीयांच्या जोखंडातून मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीव मुठीत घेऊन इट का जबाब पत्थर से देने वाले अनेक मनगटवादी क्रांतीवीर निघाले होते. काही मनगटवादी क्रांतिवीर शस्त्राने तर काही बुद्धिवादी अस्त्राने लढले.
याच तारका मंडळातील क्रांतिवीर बिरसा मुंडा हे एक होतं ज्यांनी आपल्या क्रांतिकार्यातून परकीयांना सळो की पळो करून सोडले होते. या निधड्या छातीच्या क्रांतीवीरांचा इतिहास, त्यांचे समर्पण, केलेला त्याग, आणि त्यांचे उलगुलान आंदोलनाचा सर्वांना बोध व्हावा, जाणीव व्हावी या उद्दात हेतूने बिरसा पर्व २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. थोर क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी, युगप्रवर्तक विभूती यांचे जीवन कार्य हे दीपस्तंभा प्रमाणे असते तो दृष्टिकोन समोर ठेवून व पुसदकारांची रसिकता लक्षात घेता क्रांतीकारकांचे विचारातून सर्वच घटकातील समाजाचे प्रबोधन करण्यासाठी क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आदिवासी समाजाची बुलंद तोफ, ज्यांच्या त्यागीवृत्ती व क्रांतिकारी कृतीने तसेच समाजाची दशा, दिशा बदलण्याची विचारधारा पेरणारे बिरसा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सतिशदादा पेंदाम यांचे प्रमूख मार्गदर्शन होणार आहे त्या बिरसा पर्वाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 11- 11- 2022 रोजी लोकप्रतिनिधी आमदार इंद्रनिल नाईक यांचे शुभहस्ते आणि सदभावना मंच पुसद चे संयोजक तथा पुसद अर्बन बँक चे अध्यक्ष शरद मैंद यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. या उद्घाटकीय कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य आमदार ॲड निलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी शहरातील गणमान्य मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
तर रविवार दिनांक १२-११-२०२२ रोजी पुसद नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर मोहम्मद नदिम यांचे अध्यक्षतेखाली बहुजन विचारवंत प्रशांत वंजारे हे “आदिवासी चळवळ, वास्तव, व्यवहार आणि गतिरोध” या विषयावर आपले प्रबोधन पर द्वितीय पुष्प गुंफणार आहेत.
दिनांक १३-११-२०२२ रोजी यवतमाळ जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष डॉ.आरतीताई फुपाटे यांचे अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथील वैशालीताई डोळस ह्या “आदिवासी महिलांचे सामाजिक योगदान” या विषयावर आपले तृतीय पुष्प गुंफणार आहेत.तसेच 15 नोव्हेंबर रोजी च्या भव्य मिरवणुकीतून आदिवासी समाजाच्या रूढी, परंपरा, सांस्कृतिचे यथेच्छ दर्शन घडवून देण्यासाठी यथोचित, प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली. तसेच या प्रबोधन पर कार्यक्रमाचा व उत्सवाचा सर्वच समाज घटकाने लाभ घ्यावा असे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, कोषाध्यक्ष भास्कर मुकाडे, सचिव ॲड. रामदास भडंगे, तसेच सन्माननीय पदाधिकारी डॉ आरतीताई फुपाट, डॉ हरिभाऊ फुपाटे, मारोती भस्मे, गजानन भोगे, गजानन उघडे, वसंता चिरमाडे, गजानन टारफे, विठ्ठल मिरासे, अक्षय व्यवहारे, शंकर माहुरे, ज्ञानेश्वर मेतकर यांनी विश्रामगृह पुसद येथे आयोजित पत्रकार परिषदेतून आवाहन केले आहे.