शिक्षण जागर करणारे साक्षात “विठ्ठल”…..

32

(आपला भवताल समृद्ध करणाऱ्या, आपल्या परिसराच्या शैक्षणिक विकासासाठी झटणाऱ्या, आपल्या शैक्षणिक कार्याने संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असणाऱ्या सह्याद्री एवढ्या भव्य, दिव्य, महान व्यक्तिमत्त्वाची कार्यगाथा मांडणारा हा तुटपुंजा शब्दप्रपंच…)

वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ करणारे संत नामदेव महाराज यांच्या कीर्तनात तल्लीन होऊन साक्षात पांडुरंग भक्तीभावाने नाचला हे सर्वश्रुत आहे.

नाचू कीर्तनाचे रंगी
ज्ञानदीप लावू जगी…..

असे म्हणत सबंध महाराष्ट्रभर नव्हे तर पंजाबात जाऊन सुद्धा वारकरी संप्रदायाचा ध्वज रोवणारे संत नामदेव महाराज आपणास माहिती आहेत.

दोघांच्या गावाचे अंतर जरी आहे
तू माझा मी तुझा खांदेकरी आहे
पाण्याची लाट तू पाण्याची लाट मी
सांग अशा सागरी कुठली दरी आहे

या आपल्या सुप्रसिद्ध गीतातून जात-पात-धर्म यापेक्षा माणूस आणि माणुसकी मोठी असते हे जगाला ठणकावून सांगणारे महाकवी लोकशाहीर वामनदादा कर्डक आपणा सर्वांना माहित आहेत.

अगदी याप्रमाणेच सर्व समावेशक विचारांचा वारसा घेऊन ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणारा सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलाला उत्तम प्रकारच्या भौतिक सोयी-सुविधा देता आल्या पाहिजेत. यासाठी केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता लोक जागृतीतून एक प्रभावी लोकचळवळ उभी करून जिल्हा परिषद शाळेचा कायापालट झाला पाहिजे. या ध्येयांचा ध्यास घेऊन प्रशासकीय शिक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून रुजू झालेल्या दिवसापासून एक व्यक्तिमत्व धडपडत आहे. ते म्हणजे जिल्हा परिषद परभणीचे मा. शिक्षणाधिकारी (प्रा) आदरणीय प्राध्यापक श्री विठ्ठलरावजी भुसारे साहेब.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यामध्ये असणाऱ्या नावकी या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. निष्ठेने काळ्या मातीची सेवा करणाऱ्या या कुटुंबाची शेती आणि मातीवर प्रचंड श्रद्धा. म्हणून त्यांच्या तोंडून कायम ऐकायला मिळते.

पेरला गेलाय माझा जन्म इथे
म्हणून मी शेतीमातीवर बोलतो…

उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठोबाचे निस्सीम भक्त असणाऱ्या या कुटुंबाला आठ पिढ्यांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेली. वडील नामांकित मृदुंगाचार्य आणि पंढरपुर वारीचे दिंडी चालक. अत्यंत संस्कारी, मोठे आणि एकत्र कुटुंब. निष्ठेने आणि प्रामाणिक कष्टाने शेती करणे ही परंपरा. भरपूर शेती असूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे गरिबीचे आणि दुःखाचे अनेक प्रसंग कुटुंबाने अनुभवले. तरीही उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही एकूणच धारणा.

या सगळ्या वातावरणात श्री विठ्ठलराव लहानपणापासून शिक्षणात विशेष अभिरुची असल्याने अत्यंत कष्टाने आणि निष्ठेने शिकले. बरेच दिवस वेगवेगळ्या संस्थेत अध्यापनाचे काम केले. दिवसागणिक समृद्ध होत गेले. नोकरी सोबत शिक्षण चालूच होते. अभ्यासाचा व्यासंग सुरूच होता. यामुळेच खूप मोठ्या संघर्षानंतर पुढे स्पर्धा परीक्षेद्वारे 2011 मध्ये उपशिक्षणाधिकारी या पदावर निवड झाली. शिक्षण विभागाला एक कार्यतत्पर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चाकोरी बाहेर जाऊन काम करणारा सक्षम अधिकारी मिळाला. हिंगोली जिल्ह्यात तत्कालीन शिक्षणाधिकारी श्री शिवाजीराव पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी म्हणून उत्कृष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली.

पुढे आपले आयुष्य घडवलेल्या पूर्णा तालुक्यातील नावकी आणि माटेगाव या जिल्हा परिषद शाळांचे ऋण फेडण्यासाठी पूर्णा तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून बदलीने रुजू झाले. याच काळात महाराष्ट्र राज्याचे मा. शिक्षण सचिव आदरणीय श्री नंदकुमार साहेब यांच्या महत्त्वकांक्षी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ज्ञानरचनावादाचे खूप मोठे काम संपूर्ण महाराष्ट्रभर चालू होते. अशावेळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यांनी दखल घ्यावी इतके उत्कृष्ट काम पूर्णा तालुक्यात श्री भुसारे साहेबांनी साकारले. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. एकूणच सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्तेसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज यांची नकारात्मकतेकडे झुकलेली मानसिकता बदलून ती पूर्णपणे सकारात्मक बनवली. ज्ञानार्जनासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये शिक्षण घेण्याची जबरदस्त इच्छाशक्ती निर्माण केली.

गावोगावी जाऊन “जागर शिक्षणाचा” या अभियानांतर्गत कित्येक लोकांचे प्रबोधन केले. या अभियानाच्या माध्यमातून समता, न्याय, बंधुता या तत्त्वावर आधारलेले आणि शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणारे फुले, शाहू, आंबेडकरांचे तत्त्वज्ञान गावागावात, घराघरात, माणसा-माणसा पर्यंत आणि त्यांच्या हृदया हृदयापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले.

“कुणी न राहो दुबळा येथे,
मनी असा निर्धार जागवू”

ही धारणा रुजवण्यासाठी अथक प्रयत्न केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सर्व जनसामान्यापर्यंत पोहोचवला. आपल्या करड्या आवाजात महाकवी वामनदादा कर्डक यांच्या “आम्ही तुफानातले दिवे” या गीताने सर्वसामान्य माणसांच्या काळजाचा ठाव घेतला. त्यांच्या आवाजात हे गीत ऐकतच राहावे वाटते.

तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे
तुफान वारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे…

हल्ल्यावरती होती हल्ले अभंग अमुचे बाले किल्ले
असाच ताठर अमुचा माथा जरा न खाली लवे….

हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा
ह्या वाऱ्‍याने मावळणारी ज्योत आमुची नव्हे….

तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून
भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे….

काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे
करील काळे आपुले अता काळ्या करणीसवे….

एक दिव्याने पेटवलेले,चरितेसाठी पाठविलेले
काळ्या रानी अखंड येथे फिरती आमुचे थवे….

जळू परंतू धरती उजळू ,प्रकाश येथे असाच उधळू
सदा चांदणे सुखी नांदणे हेच अम्हाला हवे….

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेच्या भौतिक सुस्सजतेसाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभाग जमा केला. शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाचा जागर करून….

गावाला शाळेचा अभिमान असावा.
शाळेला गावाचा आधार असावा.

हा विचार रुजवला. गावागावातील प्रार्थनास्थळांच्या विकासासाठी ज्याप्रमाणे आपण धडपडत असतो. तीच धडपड आपल्या गावातील ज्ञानमंदिर असणाऱ्या शाळेच्या विकासासाठी असली पाहिजे. ही भावना प्रत्येक व्यक्तीच्या काळजात बिंबवली.

विद्यालय हे माझे देवाचे मंदिर
एक एक मुर्तीपुढती जरा स्थिर व्हावे
आणि तिच्या हृदयामध्ये हळुच शिरावे
इथे घडे परमेशाचा खरा साक्षात्कार….

मग खऱ्या अर्थाने लोक जागृती झाली आणि त्यानंतर लोकसहभागाचा ओघ सुरू झाला. शालेय विकासासाठी जमा करण्यात लोकसहभागाच्या कार्यात गरिबातल्या गरिबांपासून ते श्रीमंतातल्या श्रीमंता पर्यंत प्रत्येकाने हातभार होता. याविषयीचे अनेक हृदयस्पर्शी अनुभव साहेब नेहमी सांगत असतात. त्यातल्या त्यात जिंतूर तालुक्यातील जि प प्रा शा पांगरी शाळेच्या विकासासाठी गावातील एका वयोवृद्ध महिलेने देऊ केलेल्या मौल्यवान दागिन्यांचा अनुभव प्रत्येकाला भावनिक करतो. “जागर शिक्षणाचा” हे अभियान केवळ पूर्णा तालुक्यातच नाही, तर संपूर्ण परभणी जिल्ह्यात राबवल्या गेले. हे अभियान अनेक दुर्गम आणि तळागाळातल्या छोट्या छोट्या शाळेत सुद्धा राबविण्यात आले. अक्षरशः जागर शिक्षणाचा अभियानामुळे दऱ्या-खोऱ्यात, वाड्या-वस्त्यात आणि गावागावात साहेबांचा करडा आवाज दुमदुमला. या अभियानामुळे अनेक शाळांचा कायपालट झाला. अनेक शाळा शैक्षणिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्या. राज्यभरातून लोक या शाळा बघायला येऊ लागले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्याची साहेबांच्या कार्यामुळे विशेष दखल घेण्यात आली. ज्ञानरचनावादाच्या कार्यशाळेसाठी साहेबांना राज्यभरातून अनेक ठिकाणी निमंत्रण आली. यातूनच त्यांनी राज्यभरामध्ये ज्ञानरचनावादाच्या कार्यशाळा आणि आपले जागर शिक्षणाचा हे अभियान यशस्वीपणे राबविले. आजच्या काळात महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामधील थोर विचारवंत आणि शिक्षणाचे सच्चे कार्यकर्ते म्हणून त्यांची मोठी ओळख आहे. हे आपल्यासारख्या जिल्ह्याचे रहिवासी असणाऱ्या प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे. खरे तर साहेबांच्या या सर्व कार्यावर स्वतंत्र पुस्तक लिहिले तरी कमीच आहे. त्यामानाने हा प्रयत्न म्हणजे अत्यंत तुटपुंजा आहे.

आपल्या जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात एवढे उत्तुंग कार्य आत्तापर्यंत झालेले नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातल्या अनेक नामांकित पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. शिक्षण क्षेत्रासोबतच पर्यावरणाच्या आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक अभियाना संदर्भात साहेबांना विशेष आस्था आणि आदर आहे. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून शाळेविषयीच्या आणि शिक्षणाविषयीच्या जागृती संदर्भाने बोलायला सुरुवात केली. साहेब शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत. सह्याद्रीसारख्या भव्य, दिव्य आणि महान विभूतीमत्व असणाऱ्या जिल्हा परिषद परभणीच्या मा. शिक्षणाधिकारी आदरणीय प्राध्यापक श्री. विठ्ठलरावजी भुसारे साहेबांना त्यांच्यावर लिहिलेल्या माझ्या स्वलिखित कवितेतून मनस्वी प्रणाम….

श्री. भुसारे साहेब…..

मार्ग दाखवी जगास साऱ्या
माणूस किती हो विशाल आहे
काळोखास या संपवण्याला
लख्ख पेटती मशाल आहे….

किती कष्टती गुणवत्तेसाठी
गावोगावी शिक्षण जागर करती
कशी होईल प्रगती शाळेची..?
मनात एकच सवाल आहे…

जात धर्म आणि वर्ण पाहुनी
कशास करता भेद कोणता…?
नको गुलामी कधीच कुणाची
माथ्यावरती समानतेचा गुलाल आहे….

कार्यतत्परता अंगी त्यांच्या
स्वार्थ नसे हो कधीच कशाचा
मोठेपणा योग्य व्यक्तींना त्यांनी
कायम केला बहाल आहे…..

रंजल्या, गांजल्या पीडितांचे
दुःख जाणती शेतकऱ्यांचे
अश्रू पुसण्या धडपड सारी
हातात त्यांच्या रुमाल आहे….

आहेत पदाने मोठे तरीही
माणुसकीचा विचार आहे
किती वागती सरळपणाने
हीच खरी तर कमाल आहे….

साहेब महान कर्तृत्वाचे
आदर्श ठेवती स्वकर्मानी
प्रेरित होऊ त्यांच्या विचारांनी
हाच तयांना सलाम आहे…..

✒️शब्दांकन:- मयूर मधुकरराव जोशी(लेखक, कवी, कथाकार, गझलकार)विठ्ठल रुक्मिणी नगर, जिंतूर.जि. परभणी.मो:-9767733560,7972344128