गुजरात निवडणूक: महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनच मोदी-शहांना मदत

113

गेले काही दिवस महाराष्ट्र राज्यातील प्रकल्प गुजरातकडे पळवले जात आहेत. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आपल्या पदाचा वापर करत आहेत.या मुद्यावरून राज्यात रणकंदन माजले आहे. खास करून महाविकास आघाडीचे नेते भाजपावर तोंडसुख घेताना दिसत आहेत.राज्यातून वेदांत फॉक्सकॉन,वेदांता फायरफॉक्स, टाटा एअरबस,सॅफ्रन ग्रुप,बल्क ड्रग्स पार्क हे हजारो कोटींचे प्रकल्प गुजरातकडे नेण्यात आले आहेत.या प्रकल्पांमुळे राज्यात कोट्यवधींची गुंतवणूक होणार होती,परंतु ती गुंतवणूक आता गुजरातमध्ये होणार आहे. त्यामुळे तेथील तरूणांना रोजगार मिळणार आहे. मात्र महाराष्ट्राच्या हाती भिकेचा कटोराच राहणार आहे. कारण येथील तरूणांची बेकारीची फौज निर्माण होणार आहे.

लोकसभेत के.नवासकानी यांनी देशातील विविध राज्यांत किती परकी गुंतवणूक आली, याची माहिती विचारली होती. त्यावर उत्तर देताना केंद्र सरकारच्या व्यापार व उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी सांगितले की,२०१९-२० या आर्थिक वर्षात ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत संपूर्ण देशात एकूण ६७३८ कोटी ६७ लाख ६० हजार अमेरिकन डॉलरची परकी गुंतवणूक झाली.महाराष्ट्रात ७२६ कोटी २५ लाख ६० हजार अमेरिकन डॉलर इतकी परकी गुंतवणूक आली.२०२०-२१ या आर्थिक वर्षात नोव्हेंबर २०२० पर्यंत तब्बल १२६० कोटी २७ लाख २० हजार अमेरिकन डॉलर इतकी परकी गुंतवणूक आली. ऑक्टोबर १९ ते मार्च २०२० या कालावधीत एकूण १९८६ कोटी ५२ लाख ८० हजार अमेरिकन डॉलर इतकी थेट परकी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली.म्हणजेच गुजरातच्या कित्येक पटीने महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत आघाडीवर आहे. महाराष्ट्रात प्रत्येक व्यवसायासाठी संधी आहे. महाराष्ट्राला गुंतवणूकदारांनी कायमच पसंती दिली आहे, हेच या आकडेवारीवरून सिद्ध होते.

राज्य सरकारने गेल्या काही काळात करोनाचे संकट असतानाही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले होते.राज्याच्या उद्योगस्नेही धोरणामुळेच ही गुंतवणूक राज्यात आली होती.असे असताना अचानक वेदांत फॉक्सकॉन,वेदांता फायरफॉक्स,टाटा एअरबस,सॅफ्रन ग्रुप,बल्क ड्रग्स पार्कसारखे प्रकल्प गुजरातकडे गेले. त्यासाठी मोदी-शहा जोडगोळीने आपल्या पदाचा वापर करत हे प्रकल्प गुजरातकडे नेले.

आताच त्यांना हे प्रकल्प गुजरातकडे का वळवावे लागले. त्यामागेही गुजरात विधानसभा निवडणुकीचे गणित असू शकते. कारण मोदी-शहा यांनी २००७ नंतर गुजरात मॉडेलची डंका पिटायला सुरूवात केली. गुजरात मॉडेलमुळेच गुजरातचा विकास झाला अशाप्रकारे सांगण्यात आले. परंतु म्हणावा तसा विकास गुजरातचा झालाच नाही.गुंतवणुकीत गुजरात मागे पडलाच,त्याचबरोबर अनेक समस्याही निर्माण झाल्या.केवळ कागदावर गुजरात मॉडेल काम करत होते.कोरोना काळात झालेली ऑक्सिजनची कमतरता,रूग्णांची हेळसांड, मुसळधार पावसात शहरे तुंबणे,गुंतवणूकदारांना लागणार्‍या प्राथमिक सुविधांची वानवा या सार्‍या बाबी आहेत.त्यातच लोकांच्या प्राथमिक सुविधांकडे फिरवलेली पाठ होय. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे यंदा नवसारी,वलसाड,सूरत,नर्मदा,छोटा उदेयपूर, अहमदाबाद,सौराष्ट्रमधील गीर सोमनाथ,द्वारिका आणि राजकोटमधील अनेक भागांमध्ये अडचणीचा सामना करावा लागला होता.आहे. त्यात अनेक शहरे पाण्याखाली गेली होती, १०६ जणांचा मृत्यूही झाला होता.

आणखी एक घटना देशाला हादरवणारी समोर आली.बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींना सोडण्यात आले. त्यासाठी प्रधानमंत्री मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत बलात्कार्‍यांना सोडण्यात आले.बलात्कारी सुसंस्कृत असतात म्हणे,आता बोला,कुठले बलात्कारी सुसंस्कारित असतात.म्हणजे महिलांकडे पाहण्याचा यांचा दृष्टीकोन कसा आहेे हे लक्षात येते.आणखी गुजरात मॉडेल पहायचे असेल तर नुकतेच मोरबी पूल दुर्घटनेकडे पहा.हेच का ते गुजरात मॉडेल? दुरूस्तीसाठी बंद केलेला पूल अचानक खुला करायला लावून जवळजवळ १४० लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आले. गुजरात निवडणुका लक्षात घेऊन हा पूल खुला करण्याची घाई भाजपालाच लागली होती. त्याचा परिणाम हा असा दर्घटनेत झाला. बेरोजगारी व महागाईमुळे आधीच जनता त्रस्त आहे, त्यामुळे लोक कधीही जाब विचारू शकतात.
अल्पसंख्याकांचे आणि मुख्यतः मुस्लिमांचे दुय्यम दर्जाचे नागरिक या स्थानी विस्थापन करणे,मुख्यमंत्रिपदाकडे सत्तेचे केंद्रीकरण करून स्वतःभोवती स्तुतिपाठकांचा पंथ निर्माण करणे,विद्यापीठांच्या स्वातंत्र्यावर आणि स्वायत्ततेवर गदा आणणे, वृत्तपत्रांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणे आणि टीकाकार आणि राजकीय प्रतिस्पर्धी यांच्याविषयी सूडबुद्धीचा दृष्टिकोन असणे,असे हे घटक होते.

‘गुजरात मॉडेल’मधील या अंधारलेल्या बाजू नरेंद्र मोदींच्या प्रधानमंत्रीपदाच्या दिशेने चालवलेल्या मोहिमेत दुर्लक्षिल्या गेल्या. मात्र ते केंद्रात निवडून आल्यानंतरच्या आठ वर्षांत त्या निखालस स्पष्ट झाल्या आहेत.सांप्रदायिकतेचे राजकारण आणि लोकानुनयी भाषणे,सार्वजनिक संस्थांचा घेतलेला कब्जा,प्रसारमाध्यमांना दाखवलेला धाकधपटशा,पोलीस आणि तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा केलेला छळ आणि कदाचित या सर्वांवर कडी म्हणजे स्वपक्षाकडून,मंत्रिमंडळाकडून,सरकारमधून आणि ब्राम्हण-बनिया मीडियातून थोर नेत्यांचे केले गेलेले दैवतीकरण या सगळ्यांतून मोदींची कारकीर्द दर्शवता येते.

‘गुजरात मॉडेल’चे चार आधारस्तंभ म्हणजे अंधश्रद्धा,गुप्तता,केंद्रीकरण आणि आंधळा जातीयवाद हे आहेत.सर्व बाजूंनी होत असलेली कोंडी व राज्यातील लोकं मोठ्या प्रमाणात नाराज असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पराभव होऊ शकतो याची भीती मोदी-शहा यांना वाटत असावी. म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील हजारो कोटींचे प्रकल्प गुजरातकडे वळवले असतील. जेणेकरून बघा,आम्ही आपल्या लोकांसाठी कसे प्रकल्प आणत आहोत हे दाखवण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न आहे. तुमच्यासाठीच काम करत आहोत असे भासवले जात आहे. त्यातून लोकं आपल्या पारड्यात मते टाकतील आणि आपली बुडणारी नौका तरून जाईल या आशेपोटीच महाराष्ट्रातील हजारो कोटींचे प्रकल्प गुजरातकडे वळवण्याचा खटाटोप असू शकतो. गुजरात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हे सारे केले जात आहे. जेणेकरून प्रकल्पांचा मुद्दा कायम चर्चेत रहावा अशीच मोदी-शहा यांचे गणित असावे. त्याला महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेतेही बळी पडले आहेत. गुजरात प्रकल्प नेण्यावरून महाविकास आघाडीचे नेते भाजपावर तोफ डागत असताना तोच मुद्दा पुन्हा पुन्हा रेटण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे भाजपाला गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी बुस्टर डोस मिळत आहे. प्रकल्पांचा मुद्दा चर्चेत ठेवून महाविकास आघाडीचे नेते अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करताना दिसत आहेत.

✒️दिलीप बाईत(मंडणगड,जिल्हा रत्नागिरी)मो:-९२७०९६२६९८