✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.12नोव्हेंबर):-वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नांव नागपूर विद्यापीठाला देण्याबाबत मी केलेल्या संसदीय संघर्षाला यश मिळाले याचा मला विशेष आनंद व अभिमान आहे. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंतांचे नांव दिल्यानंतर गुरूकुंज मोझरी येथील आश्रमात ज्या गादीवर राष्ट्रसंत बसायचे त्या गादीवर बसण्याचे भाग्य मला लाभले हा माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण होता. राष्ट्रसंतांनी स्थापन केलेल्या अ.भा. गुरूदेव सेवा मंडळाचा मी आज उपाध्यक्ष आहे. हे भाग्य मला लाभले ते तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा व आशिर्वादाच्या बळावरच. आज समाजात धन व मन अशी वैचारीक लढाई सुरू आहे. धनाने समाधान मिळत नाही पण मन निर्मळ असेल तर समाधान निश्चीत आहे.
मनातील अस्वच्छता दूर करण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीता आपल्यासमोर ठेवली. या ग्रामगीतेतील वैचारीक ठेवा आचरणात आणणे हीच वंदनीय राष्ट्रसंतांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मस्त्यव्यवसाय तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
दिनांक १२ नोव्हेंबर रोजी पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचार कृती सम्मेलन-२०२२ च्या उद्घाटन समारंभात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी सम्मेलनाध्यक्ष डॉ. नामदेवराव कोकोडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, स्वागताध्यक्ष विनोद देशमुख, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अलका आत्राम, पोंभुर्णा न.पं. अध्यक्षा सुलभा पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, माजी जि.प. सदस्य राहूल संतोषवार, अजय मस्के, भाऊसाहेब बराटे, दीपक सातपुते, चेतनसिंह गौर, लिंगा रेड्डी, किरण पाल, प्रफुल्ल निमसरकार, राजेंद्र जेनेकर, रामकृष्ण चनकापूरे, डॉ. गुरूप्रसाद पाकमोडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, करा धर्माचे आचरण, होईल व्यसनाचे उच्चाटन असा फलक वाचला. आज या सम्मेलनाच्या निमीत्ताने घाटकुळला व्यसनमुक्त करण्याचा संकल्प आपण करूया. मला माणूस द्या हा तुकडोजी महाराजांचा प्रमुख संदेश आहे. आज स्वतःचा विचार करणा-या नागरिकांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थीतीत समाजाचा विचार करणा-या नागरिकांची संख्या वाढण्याची आवश्यकता आहे. अनेक महामानवांनी मानवतेची ज्योत पेटविली, त्यातील प्रमुख नांव म्हणून वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आहे, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.