मातृसुरक्षा भविष्याची गरज

29

Ads
‘दुःखात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी अंगाई.
जगात असे काहीही नाही, जशी सर्वास प्रिय आई.
ठेच लागता बाळाला, वेदना तिलाच होई.
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ असे आई.’

अशा देवतुल्य व तेहतीस कोटी देवांमध्ये सुद्धा श्रेष्ठ पद असलेल्या मातांची सुरक्षा करण्याचा हा दिवस. २००५ सालापासून १० जुलै ‘मातृसुरक्षा दिन’ मानला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनं याची जगभर अंमलबजावणी सुद्धा सुरू केली. मातेचं संगोपन आणि मातृत्वादरम्यानच्या कालावधीत होणा-या मातांच्या मृत्युदरात झालेली वाढ, त्यांची होणारी परवड रोखण्यासाठी हा प्रयत्न सुरू झाला. परंतु त्या आधीपासूनच आपल्या संस्कृतीनं माता व तिला होणा-या बाळाच्या काळजीचा विचार केला आहे.मातृसुरक्षा दिन हा उत्सव आईचा सन्मानच नाही तर तिची सुरक्षा करण्यासाठी, तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी साजरा केला जातो. प्राचीन काळापासून भारतात अस्तित्वात असलेल्या मातृसुरक्षेबाबतचा वेध घेताना वास्तवाचं भान ठेवायला हवं. तंत्रज्ञान वा माध्यमांच्या प्रगतीमुळे काळ आणि तंत्रज्ञान कितीही पुढे गेलेलं असलं तरीही आज झालेल्या जाणीवेला, जागृतीला संस्कारांचं आणि संस्कृतीचं मोठं पाठबळ असावंच लागतं.

*आरोग्य सौख्य नांदेल घराघरा,
जर निरोगी असेल वसुंधरा*

हिरवंगार गर्भरेशमी वस्त्र परिधान केलेल्या धरतीलाही ‘मातृत्व प्राप्त होण्याच्या काळातच, म्हणजे १० जुलैला ‘मातृसुरक्षा दिन’ साजरा केला जातो, हा एक योगायोगाच म्हणायला हवा! कारण स्त्री ही सर्जनशील धरतीचीच प्रतिमा आहे. आज जागतिक पातळीवर ‘मातृसुरक्षा दिन’ साजरा होत असला, तरी भारतात मात्र प्राचीन काळापासूनच मातृसुरक्षेचा विचार झाला असल्याचा संदर्भ आढळतो. मातृत्वाशी सुसंगत उपमा देऊन असं म्हणता येईल, की या विषयालाही ‘दुधा’वरील मृदुमुलायम सायीप्रमाणे कोमल स्तर आहेत. आई म्हणजे दुधावरची साय असं सुद्धा म्हटलं जातं. ज्याप्रमाणे दुधावरची साय मऊ हवीहवीशी व कधीही कठोर किंवा नकोसी वाटत नाही त्याचप्रमाणे माता सुद्धा. पण जर ही माता स्वस्थ नसेल, तिचं स्वतःचंआरोग्य सुरक्षित नसेल तर ती आपल्या मुलांवर योग्य संस्कार कसे घडवेल?

आज मात्र ‘मातृसुरक्षा दिना’ची आजच्या मातृ-सुरक्षेइतकीच उपेक्षा झालेली दिसते. १० जुलैला साज-या होणा-या मातृसुरक्षा दिनामध्ये दोन अपत्यांदरम्यानच्या योग्य अंतराचा विचार केला गेला आहे.
*सुखी जीवनाचा खरा आधार, लहान आणि स्वस्थ परिवार*
मातृसुरक्षा दिनानंतरचा दुसरा दिवस म्हणजे ११ जुलै हा ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. अशा प्रकारे या दोन दिवसांचा परस्परांशी संबंध आहे. दोन मुलांमध्ये जर सुरक्षित अंतर राहिलं नाही, तर मातेचं व पर्यायानं बालकाचंही आरोग्य धोक्यात येईल. वारंवार धूप होऊन कस कमी होत जाणा-या जमिनीसारखी मातेची अवस्था होईल. ज्यामुळे तिचं मातृत्व हे ‘लाभलेलं’ न होता ‘लादलेलं’ होईल. जर दोन मुलांमधला ‘पाळणा लांबवला नाही’, तर ‘जगाच्या उद्धारासाठी’ तिच्या हाती असलेल्या ‘पाळण्याच्या दोरी’चा तिच्याच ‘गळ्याभोवती फास’ होऊ लागेल.
*कमी मुले व लहान परिवार,
हेच आहे मातृत्व सुरक्षेचे आधार*

प्राचीन काळापासून भारतात, मुलीला तिच्या भावी मातृत्वाचा विचार करून वाढवण्यात येतं आहे. बाहुलीच्या खेळातून तिला अप्रत्यक्षपणे अपत्य संगोपनाचं शिक्षण दिल्या जाते. प्राचीन भारतातील एक विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मुलींना ‘वृक्षसंवर्धना’तूनही मातृत्वाचं शिक्षण दिलं जात असे. ‘रोपांना पाणी घालून त्यांची जोपासना करण्यानं मुलींच्या मनात हळूहळू अपत्यप्रेमाचा अंकुर फुटतो सोबतच वृक्षसंवर्धन करतांना वृक्षांच्या सान्निध्यात मन रमतो, आनंदी व उत्साह वाढु शरिर आता सकारात्मक बदल घडून येतात.
वैदिक वाङ्मयानंतर अभिजात संस्कृत साहित्यातही मातृसुरक्षेचा विचार केलेला आढळतो. त्यामध्ये गर्भवतीच्या ‘दोहदा’चं म्हणजे डोहाळ्यांचं वर्णन अनेकदा आलं आहे. आजही गर्भवतीला ‘दोन जिवांची‘ म्हणतात. अशा स्त्रीची इच्छा म्हणजे तिच्या गर्भाचीच इच्छा असते. ती न पुरवल्यास तिच्या आणि गर्भाच्या आरोग्यावर परिणाम होतो, असं मानलं जातं.

मातृत्वप्राप्तीचा आनंद खरोखरच ‘दिव्य’ (स्वर्गीय) असला, तरी ते प्राप्त होण्यासाठीही तिला ‘दिव्या’तून जावं लागतं. म्हणूनच ‘सुखप्रसूती’ हाही मातृसुरक्षेचाच एक भाग आहे. या सुखप्रसूतीचा विचारही अथर्ववेदात केलेला आढळतो. प्राचीन भारतात मातृसुरक्षेचा सर्वागांनी विचार केला गेला होता. म्हणूनच त्या काळात प्रसूतीगृहात आढळणा-या काही प्रथा, उदा. षष्ठीपूजन, मोह-यांनी दृष्ट काढणं वगरे आजही आपल्याला (विशेषत: खेडयापाडयांत) आढळतात. या संस्कारांमागचं विज्ञान आज धावपळीच्या जगात वावरणा-या मातांनी समजून घेणं अत्यावश्यक आहे.
भारतात मातृसुरक्षेचा सर्वागांनी विचार करून कुपोषण, गरोदर माता मृत्यू दर कमी करणे व सकस आहार आणि आर्थिक मदत म्हणून मातृसुरक्षा योजना सुरू करण्यात आली असून याचा लाभ सर्वच मातांना मिळत आहे. त्याकरिता जवळ च्या अंगणवाडी केंद्रामध्ये नाव नोंदणी करणे अत्यावश्यक अस्तेय योजने अंतर्गत गरोदर व स्तनदा मातेच्या सुरक्षेच्या दृष्टीने सकस आहार व 6000रूपये मातेच्या नावाने बॅंक खात्यात जमा होतात. तरी आज मातृसुरक्षा दिन प्रसंगी सर्वांना एकच विनवणी की, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’, असं आपण म्हणतो पण जर पाळण्याची दोरी जिच्या हाती आहे तिच सुरक्षित नसेल तर जगाचा उद्धार कसा होईल?
म्हणूनच कमी मुले व लहान परिवार, हेच आहे प्रगती चे व मातृसुरक्षेचे आधार. आज देश स्वस्थ व निरोगी हवा असेल तर “मातृसुरक्षा” भविष्याची गरज आहे.

          सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे
                      गोंदिया
                  9423414686