जित्या आव्हाडाला फासावर लटकवा रे !

61

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

इतिहासाचे विद्रुपीकरण व मोडतोड करणारा हर हर महादेव चित्रपट प्रदर्शित झाला आणि राज्यात वादंग माजले. छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर आणि त्या निमित्ताने इतिहासावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. सातत्याने शिवचरित्र विकृत केले जात आहे. शिवरायांचा इतिहास चित्रपटाच्याआडून विटंबीत केला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड दडत नेहमीच हे हल्ले होत आहेत. अशा प्रकारावर वादंग माजले की ‘मराठा तितुका झुंजवावा !” हा छूपा अजेंडा राबवत बहूजन आप-आपसात झुंजवले जातात. त्यांच्यातच वाद पेटवून दिले जातात. बाकी हरामखो-या करणारे गम्मत बघायला नामनिराळे राहतात. परवा हरहर महादेव चित्रपट बंद पाडला म्हणून राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना तातडीने अटकही करण्यात आली. या अटकेनंतर संजय राऊत बाहेर आल्याच्या सुतकात असलेल्या अनेकांना आनंदाचे भरते आले होते. जित्या आत गेला, जित्या आव्हाड आत गेला, तो आता बाहेर येत नाही अशा पध्दतीच्या प्रतिक्रीया सोशल माध्यमात येत होत्या.

सोशल माध्यमात ही सगळी मंडळी जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख जित्या आव्हाड असाच करतात. जित्या आव्हाड आतच राहिला पाहिजे अशीच या लोकांची मानसिकता होती. त्यासाठी ते देव पाण्यात घालून बसले होते. पण त्यांच्या मनासारखे घडले नाही. जितेंद्र आव्हाड सुटले, त्यांना जामिन झाला. त्यांना तुरूंगातच डांबून ठेवावे असे ज्यांना ज्यांना वाटत होते त्यांच्या आशा-अपेक्षांवर यामुळे पाणी पडले. संजय राऊंताची दिवाळी तुरूंगात गेली. आव्हाडही असेच आत खितपत पडावेत आणि पाडले पाहिजेत असे मनसुबे असणारे तोंडावर पडले. म्हणूनच जितेंद्र आव्हाडांच्यावर लगेच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला गेला. गुन्हा दाखल करणारी व्यक्ती भाजपाचीच असावी हा योगायोग आहे काय ? आव्हाड सुटले हे अनेकांच्या मनाला पटलेले नाही. ते तुरूंगातच खितपत पडावेत अशी मानसिता असताना ते सुटतातच कसे ? हा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करत असेल.

जितेंद्र आव्हाड आत गेल्याचा आनंद पुरेसा उपभोगायच्या आतच ते बाहेर आले. ते आत गेल्याच्या आनंदाने अजून विकृतीचा कंड जिरायचा होता त्या आधीच ते बाहेर आले. आव्हाड बाहेर येण्याने आणि त्यांना जामिन मिळण्याने अनेकांचा अहंकार दुखावला आहे. या दुखावलेल्या अहंकारापोटीच जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महाराष्ट्र जाणतो. कोणतीही सत्ता शाश्वत नसते. त्यामुळे सत्तेचा माजही शाश्वत नसतो. सुडाने पेटलेेल्या लोकांना मनातल्या मनात जित्या आव्हाडला फासावर लटकवावे असेही वाटत असेल. सुडाने पेटून मती भ्रष्ट झालेल्या लोकांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार ? मुख्यमंत्री साहेब या सर्वांच्या इच्छेसाठी जित्या आव्हाडला फासावर लटकवा. त्याला मारून टाका. तो व्यक्त होतो 

तो स्पष्ट बोलतो, तो इतिहासावर बोलतो, इतिहासातल्या चुका दाखवतो, तो जन्मजात अहंकाराच्या, श्रेष्ठत्वाच्या शिखरावर राज्य करतात त्यांना आव्हान देतो, त्यांच्या चुका दाखवतो. तो जातीयवादावर बोलतो, तो ब्राम्हण्यावर बोलतो. एका शुद्राने इतके अपराध का करावेत ? एक शुद्र इतका माजतोच कसा ? इतका बोलतोच कसा ? ते ही इतिहास, धर्म या विषयावर ? त्याची लायकी तरी आहे का ? त्यामुळे जित्या आव्हाडला जीवंत रहायचा अधिकार नाही. त्याच्या कानात उकळलेले शिसे ओता, त्याचे डोळे काढा, त्याची जिभ काढा. नसेल तर त्याला फासावर तरी लटकवला पाहिजे असे अनेकांना वाटत असेल. मुख्यमंत्री साहेब या सगळ्यांची इच्छा पुर्ण करा. कशाला विनयभंगाचे गुन्हे दाखल करत बसता. सरळ घरातून उचला त्याला. फरफटत आणा आणि ठाण्याच्या चौकात जाहिर फाशी द्या. त्याला फाशी देतानाचे लाईव्ह प्रक्षेपण करा. ते पाहून पुन्हा कुठला शु्द्र अशी चुक करणार नाही. तो इतिहासावर बोलणार नाही, तो धर्मावर बोलणार नाही, तो महाशक्तीला ललकारणार नाही.

देवून टाका त्याला एकदाची फाशी. केंद्रातली महाशक्ती तुमच्या पाठीशी आहेच. राज्यातले बहूमतही तुमच्या पाठीशी आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे उरलेले आमदारही येतील की गुवाहाटीला. त्यामुळे निवडणूकीत पराभूत व्हायचीही भिती बाळगण्याची गरज नाही. झालाच पराभव तर काढायची गुवाहटीची सहल. त्यातही चाण्यक्यांचे भरभक्कम पाठबळ आहे. ते तुमच्या सोबत आहेतच. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला कोण विचारणार आहे ? तुम्हाला विचारणाराची औकाद तरी काय ? तुम्हाला विचारेल अशी कुणाची माय तर व्याली आहे का ? त्यामुळे खुषाल फाशी द्या. सोडू नका त्याला. काही मिडीयावाले बोंबलले तर त्यांना सुपारीबाज म्हणता येईल, एच एम व्ही म्हणून त्यांचा आवाज बोथट करता येईल. त्यांचे आवाज दाबता येतील. त्यातून एखादा बोंबललाच तर त्याचा मालक खरेदी करता येईल नाहीतर त्यालाही गोळ्या घालून ठोकता येईल. मुळात ते बोंबलायला पुढेही येणार नाहीत. इकडे फाशी दिल्यावर कोण कशाला बोंबलेल ? चड्डी ओले करतील सगळे एच एम व्ही, चाय-बिस्कुटवाले. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब लवकरात लवकर आव्हाडांना लटकवा फासावर. तुमचं कुणीच काही वाकड करणार नाही.

माजी मंत्री आणि विधानसभेचा सदस्य असलेल्या माणसाची ही अवस्था असेल तर सर्व सामान्यांची काय स्थिती असणार ? हा चिंताजनक प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. सध्या राज्यातले वातावरण अतिशय विखारी आहे. विरोधकांना संपवून टाकण्याचीच मानसिकता आहे. अशी मानसिकता सामाजिक स्वास्थ चांगले असल्याचे सांगत नाही. यातून केवळ आणि केवळ रक्तपातच निर्माण होवू शकतो. कायद्याच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर जर सुडाचे राजकारण केले गेले तर अराजक जन्माला येते. महाराष्ट्र गतीने अराजकाच्या खाईत निघाला आहे. सर्वच पक्षियांनी ही अराजकता, हे सुडाचे राजकारण टाळले पाहिजे. आज जे पेरले जाईल तेच भरभरून उगवणार आहे. संजय राऊत आत गेले त्यावरही अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला. संजय राऊत तुरूंगातच सडतील आणि सडावेत असे अनेकांना वाटत होते. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी ती विकृत भावना बोलून दाखवली. संजय राऊत आता लवकर बाहेर येत नाहीत. हे शहाजी पाटील कशाच्या जोरावर सांगत होते ? हे सांगताना त्यांच्यात तो आत्मविश्वास कोठून आला ? ते काय कोर्ट आहेत की कायद्याचे अभ्यासक ? कशाच्या आधारावर, कशाच्या जोरावर ते इतक्या आत्मविश्वासाने बोलत होते ? जितेंद्र आव्हाड आत गेल्यावरही तीच मानसिकता व्यक्त झाली.

सुषमाताई अंधारे यांच्याशी काडीमोड झालेला पती राजकारणात आणून, त्याला पक्षप्रवेश करायला लावला जातो. त्याची ढाल करत त्याला आरोप करायला लावून सुषमा अंधारेंना रोखण्याचा प्रयत्न केला जातो हे सगळं भयंकर आहे. ही विकृती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी घाण पोसली जात नव्हती. सध्या सत्तेच्या माध्यमातून ती पोसली जातेय. सत्तास्थानी असणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या पध्दतीचे राजकारण टाळायला हवे. सुडाच्या राजकारणात त्यांनी वहात जावू नये. जनेतच्या कोर्टात जावून लोकशाही मार्गाने विरोधक नेस्तनाबूत करा. त्यांचा पराभव करा. त्यांना जबर हरवा पण निवडणूकीच्या मैदानाबाहेरचे विकृत फंडे उपयोगाचे नाहीत. सुडबुध्दी, द्वेष आणि विखाराचे राजकारण वाईट आहे. यातून काहीही चांगल निर्माण होणार नाही. महाराष्ट्राच्या व जनतेच्या हिताचे काहीही घडणार नाही. या राजकारणाला आळा घालायला हवा अन्यथा अनर्थ होईल. एकनाथजी, या अनर्थाचे पाप तुमच्या माथ्यावर नका घेवू. इतिहास चांगल्याची आणि वाईटाचीही नोंद ठेवतो. लोक चंगेजखानही लक्षात ठेवतात आणि छत्रपती शिवाजी महाराजही लक्षात ठेवतात. मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला कुठल्या रांगेत बसायच आहे ? ते तुम्हीच ठरवा.