‘उलगुलान’ घोषणेचे जनक- बिरसा मुंडा

34

आदिवासी समाजात जे काही क्रांतिकारक झाले त्यामध्ये बिरसा मुंडा यांचे नाव अग्रणी येईल. अगदी अल्पायुष्यात म्हणजे वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षातच ज्यांना धरती आबा,आदिवासी नेता,जननायक,क्रांतीवीर इतक्या मोठ्या उपाध्या लोकांनी दिल्या.ते बिरसा मुंडा आदिवासी समाजात किती लोकप्रीय असतील याची प्रचीती येते.

अशा या थोर क्रांतीकारक आदिवासी नेत्याचा जन्म झारखंड राज्यातील(तत्कालीन बिहार) रांची जिल्यातील ‘उलीहातू’ या खेडेगावात वडील सुगना व आई कर्मी हतू या दाम्पत्याचे पोटी झाला.ते लहानपणापासून धाडशी ,हुशार असल्याने त्यांची हुशारी पाहून त्यांच्या वडीलांच्या हितचिंतकांनी बिरसाला शाळेत भरती करण्याचा सल्ला दिला.त्यावेळी ख्रिश्चन मिशनरीच्या शाळा असल्याने त्याला मिशनरीच्या शाळेत घालण्यात आले.मात्र मिशनरी शाळेतील नियमानुसार त्याला ख्रिश्चन धर्म स्विकारावा लागला.अर्थातच त्याचे नाव शाळेत बिरसा मुंडा बदलवून बिरसा डेव्हीड नामकरण झाले.बिरसाला लहानपणापासून जंगलात खेळणे,मेंढ्या चारणे,बांसरी वाजविणे, धनुष्यबाण चालविणे असे छंद होते. बिरसा स्वाभिमानी व स्वतत्रं विचाराचा होता.

एके दिवशी अचानक तो वैष्णव पंथीय योगी आनंद पांडे यांच्या संपर्कात आला आणि त्यांचे जीवन मान बदलून गेले. त्यांच्यामुळे हिंदू धर्मातील गीता,रामायण सारख्या ग्रंथाचा त्यांना परीचय झाला.आता तो आदिवासी लोकांना प्रवचन देऊ लागला.त्यातून मादक पदार्थांचे सेवन करू नका, संघटीत रहा,हिंसा करू नका. अशाप्रकारे लोकांना उपदेश देत समाजप्रबोधन करू लागला. विशेष म्हणजे ते आपल्या आजारी आदिवासी बांधवांवर उपचार करीत.त्यांच्या उपचाराने लोक दुरूस्त होत असल्यामुळे ते त्यांना भगवान समजू लागले.त्यांच्या या समाजोपयोगी कार्यामुळेच ते प्रसिद्धीच्या झोतात येऊ लागले. लोक त्यांना देव समजू लागले.लोकांचा त्यांचेवर विश्वास बसू लागला. हळूहळू ते जननायक बनू लागले.या वृत्तीमुळे ख्रिश्चन धर्माचा त्यांनी त्याग केला.

त्याकाळी देशात सर्वत्र इंग्रजांची सत्ता होती. सर्व समाज इंग्रजांचा गुलाम बनला होता.त्यांचेच कानून कायदे देशात चालत होते. मात्र आदिवासी समाज स्वाभिमानी असल्याने ह्या कायद्यांना ते विरोध करायचे.ते गुलामीचे जीवन जगू इच्छीत नव्हते.

झारखंड घनदाट जंगलांने व्यापलेला प्रदेश.तत्कालीन इंग्रज सरकारने ‘जंगल कायदा’ (Forest Act) पास केला. त्यानुसार जंगलाची कत्तल करून शेती तयार करण्याचा आदेश देण्यात आला. यामुळे आदिवासींच्या हक्कावर गदा येत असल्यामुळे ते त्याला विरोध करू लागले.बिरसाला हा अत्याचार सहन झाला नाही.१८९५ मध्ये त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व स्वतःकडे घेतले. त्यांच्या विचाराने लोक प्रभावित होऊन साथ देऊ लागले. आदिवासींचे संघटन होऊ लागले आणि लगेच त्यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने इंग्रज पोलिस ठाण्यावर हमले करायला सुरुवात केली.यात त्यांनी ‘उलगुलान ‘हा नारा लोकांना दिला. वंदे मातरम् सारखा तो नारा आदिवासी बांधवात प्रभावी ठरला,लोक पेटून उठू लागले. चौक्यां,चौक्यांवर हमल्यांवर हमले होऊ लागले. इंग्रज अधिकारी यामुळे जेरीस आले. अधिकांश क्षेत्र बिरसाच्या साथीदारांनी काबीज केले.बिरसाला ते थरथर कापू लागले.बिरसा मुंडा चपळ असल्याने तो त्यांच्या हातीही लागत नव्हता.इंग्रजांनी नेहमीप्रमाणे नीती अवलंबली.पकडून देणाऱ्यास त्याच्या नावावर त्याकाळी ५०० रूपयाचे बक्षीस जाहीर केले. जी आजची किंमत अंदाजे पन्नास लाखांच्या घरात होईल.

या लालचेने त्यांच्याच साथीदाराने फितुरी करून त्याचा ठावठिकाण इंग्रज अधिकाऱ्यास सांगितले. ३ फेब्रुवारी १९०० मध्ये इंग्रजांनी मोठी कुमक व तोफा घेऊन त्यांच्या ठाव ठिकाणावर हमला केला.यात मोठी लढाई झाली. या लढाईत इंग्रजांनी महिला व बालकांची सुध्दा कत्तल केली.बिरसाकडे अत्याधुनिक शस्त्रे नसल्याने त्याने निकराचा लढा देऊनही त्यात त्यांचा पराभव झाला. चोहोबाजुनी त्यांना व त्यांच्या सैनिकांना वेढल्या गेले. त्यांना पकडून रांचीच्या जेलात टाकण्यात आले. जेलात असतांनी त्यांना स्लो पाईझन देऊन मारण्यात आले.मात्र ते प्लेग मुळे मरण पावल्याचे तत्कालीन जेल अधिकारी यांनी घोषित केले. काहीतर त्यांना फाशी दिल्याचे सांगतात.हे विवाद काहीही असोत मात्र आदिवासींसाठी ९ जुन १९०० हा काळा दिवस ठरला. अन्यायाविरोधात लढणाऱ्या एका आदिवासी जननायक, जनसेवकाचा अंत झाला.

बिरसा मुंडाच्या सन्मानार्थ केंद्र सरकारने बिहारपासून झारखंड वेगळा केला. तो दिवस बिरसा मुंडाच्या जयंतीचा दिवस ठरविला. भारतीय संसदेत बिरसा मुंडा या एकमेव आदिवासी क्रांतिकारकाचा फोटो लावला.झारखंडच्या एअरपोर्टला सुध्दा यांचेच नाव दिले त्यांच्या सन्मानार्थ अनेक ठिकाणी पुतळे झारखंड,बिहारमध्ये उभारले आहे एवढेच नाही तरबिहार,झारखंड,ओरीसा,छत्तीसगड , महाराष्ट्र या ठिकाणी बिरसाला भगवान मानणारा मोठा वर्ग आहे.या सर्व गोष्टीवरून बिरसांचे समाजासाठी किती मोठे योगदान आहे. हे दिसून येते.बिरसाच्या जीवनपटावर फार कमी माहिती उपलब्ध आहे.यावर संशोधन होणे गरजेचे आहे.

✒️डॉ. चंद्रकांत लेनगुरे(गडचिरोली)मो:-9423646743