✒️कुंभोज (पुरोगामी संदेश नेटवर्क)

कुंभोज (दि.10 जुलै)-भारतीय घटनेचे शिल्पकार ,भारतरत्न परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर केलेला हल्ला आणि राज्यातील अन्याय अत्याचारांच्या 15 गंभीर प्रकरणांत कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अनुसुचित जाती विभागाचे राज्य समन्वयक विजयकुमार भोसले यांनी केली आहे.
भोसले यांनी महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविलेल्या निवेदनात सविस्तर वर्णन करताना म्हटले आहे की,आंबेडकरी समाजात आक्रोश निर्माण होण्यापूर्वी आरोपी शोधून कठोर कारवाई करण्यात यावी

त्यांनी सादर केलेल्या निवेदनात भारतीय घटनेचे शिल्पकार ,भारतरत्न ,परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेले *राजगृह* ही केवळ एक वास्तू नसून, जगातील तमाम आंबेडकरी अनुयायांचे श्रध्दास्थान व अस्मिता आहे. 7जुलै रोजी सायंकाळी राजगृहावर दगडफेक, मोडतोड करून देशाच्या संविधान निर्मात्याच्या विचारांवर ,देशभक्ती वर व आंबेडकर कुटुंबावर भयानक हल्ला केला आहे. या भ्याड हल्याने जरी कुठलीही जीवित हानी व मोठी वित्त हानी झाली नसली तरी भविष्यात यापेक्षा मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याचे कारण म्हणजे राज्यात कोरोना महामारीच्या साथीमुळे राज्यात लॉक डाऊन सुरू आहे, त्याकाळात आजपर्यंत बौद्ध, अनुसूचित जाती, जमातीतील लोकांवर जातीयवादी- मनुवादी लोकांनी अन्याय व अत्याचार केलेली 13 प्रकरणे समोर आलेली आहेत. यातील काही प्रकरणात तर मनुवादी – जातीवाद्यांनी खून केले असून, हातपाय तोडणे, दगडाने ठेचणे तसेच सामुदायिक हल्ला करून मोडतोड करणे, इत्यादी प्रकार करून दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.तसेच आणखी दोन प्रकरणे जातीयवादी अन्याय अत्याचारांची समोर आली आहेत, साखरखेडा जिल्हा हिंगोली येथील बौद्ध वस्तीवर सशस्त्र हल्ला केला. यात 150 जातीवादी गुंडांनी चाकु, तलवारी व कुर्हाडीने 5 तरुणांवर जीवघेणा हल्ला करुन, महिलांनाही मारहाण केली. अत्याचार पिडीतांपैकी एक जन हिंगोली जिल्हा रुग्णालयात भयानक गंभीर अवस्थेत आहे,बीड जिल्ह्यात पुन्हा दि. 2 जुलै रोजी दलितांना जबर मारहाण करण्यात आली. माजलगाव तालुक्यातील टाकरवंन जवळील रामनगर येथे दलीत कुटुंबातील सचिन पट्टेकर, त्यांची पत्नी, विकास पट्टेकर व प्रशांत पट्टेकर या चौघांना जातीवादी राहुल खिलारे, बबलु खिलारे, हरी खिलारे, स्वमनाथ खिलारे व जगन्नाथ मानकर या 5 आरोपींनी बेदम मारहाण केली.

यावरून राज्यात जातीयवाद झपाट्याने वाढत असल्याचेच दिसत आहे. सदर अत्याचार हा जातीयवादी, राजकीय सूडबुद्धी स्वरूपाचा आहे की कसा काय? हे अचानक येवढे जातीय तणाव वाढीचे काम कुणाचे आहे? सत्तेवरून महाराष्ट्र मध्ये रस्सीखेच आहे इत्यादी सर्व अँगलचा पोलिस प्रशासन व सरकारने शोध घेणे गरजेचे आहे अशी आंबेडकरी जनतेची भावना आहे.
या सर्व प्रकारांमुळे आंबेडकरी अनुयायांच्या रागाचा मोठा उद्रेक केंव्हाही उफाळू शकतो, परंतु आंबेडकर परिवाराने शांततेचे आवाहन केल्याने तो सध्यातरी शांत आहे.

थेट राजगृहावर भ्याड हल्ला करून व दगडफेक करून, तोडफोड करून एक प्रकारे या देशाची घटना लिहिणाऱ्या भारतीय राज्य घटनेच्या शिल्पकाराचे कुटुंब सुद्धा सुरक्षित नसल्याची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न असून जो असंविधानिक तर आहेच, शिवाय शिवराय -फुले-शाहू-आंबेडकर यांची जन्मभूमी व कर्म भूमी असल्यामूऴे, पुरोगामी म्हणविणाऱ्या या महाराष्ट्र सरकारसाठी अत्य॔त लाजिरवाणी गोष्ट असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

सरकारने या संवेदनशील विषयात तात्काळ लक्ष घालून कारवाई करावी.
या निवादनात बौध्द, अनुसूचित जाती व जमातीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाबाबत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनुसूचित विभागाने दि.23 जून 2020 रोजी निवेदनात केलेल्या 6 मागण्याप्रमाणे ताबडतोबीने कारवाई व्हावी ,राजगृहात तोडफोड करणाऱ्यांना व त्यामागचे असलेले सुत्रधार / मास्टर माईंड त्वरित शोधून त्यांनी केलेला गुन्हा हा देशद्रोहाचा गुन्हा असल्याने त्यांना फाशीची शिक्षा द्यावी की जेणेकरून भविष्यात कुणीही असे निंदनीय कृत्य करण्याचे धाडस करणार नाही, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृतीस्थाने जसे की, राजगृह, चैत्यभुमी, डॉ. आंबेडकर भवन, दीक्षाभूमी, जन्मभूमी महू आणि आंबेडकर घराण्याला कायम स्वरूपी उचित पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे.
वरील प्रकरणात तात्काळ/ वेळीच कारवाई झाली नाही, तर आंबेडकरी जनक्षोभाचा उद्रेक झाल्याशिवाय रहाणार नाही व अशावेळी परिस्थिती बिघडल्यास, त्याला आपले शासन जबाबदार असेल, असे निवेदनात नमूद आहे.

महाराष्ट्र, मागणी, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED