केसरी टूर्सला ग्राहक न्यायालयाचा दणका-सहली साठी भरलेले 55 हजार शुल्क व्याज व नुकसान भरपाई सहित देण्याचे आदेश

32

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

आजीचे निधन झाल्याने सहलीसाठी पैसे भरलेले असताना सहल रद्द करून पुढच्या सहलीसाठी ते पैसे उपयोगात आणायची विनंती ग्राहकाने करूनही न जुमानणाऱ्या ‘ केसरी टूर्स ‘ या ट्रॅव्हल कंपनीने ग्राहकाला नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. यासंदर्भात ग्राहक मंगेश ससाणे यांनी वकिलांमार्फत ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

ग्राहकाने सहलीसाठी भरलेले 55 हजार रुपये, ९ टक्के व्याज व २० हजार नुकसान भरपाई सहित देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने केसरी टूर्स या ट्रॅव्हल कंपनीला दिले आहेत.

मंगेश ससाणे यांनी हनिमून साठी 55 हजार रुपये केसरी ट्रॅव्हल्स कडे जमा करून शिमला, कुलू, मनालीची सहल बुक केली होती. मात्र सहली पूर्वी आठ दिवस आधी त्यांच्या आजीचे निधन झाल्याने त्यांनी सहल कंपनीला त्याविषयी कळवले आणि बुकिंग ची रक्कम पुढील ट्रीप साठी उपयोगात आणण्याची विनंती केली. मात्र, त्यानंतर सहल कंपनीने त्यांना पुढील कोणत्याही सहलीत बाबत कळवले नाही व सहलीत समाविष्ट पण न केल्याने आणि पैसेही परत न दिल्याने ससाणे यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली.

या खटल्याचा निकाल लागून केसरी ट्रॅव्हल्स या सहल कंपनीला त्यांचे ग्राहक ससाणे यांना व्याजासहित नुकसान भरपाई देण्याचा आदेश पुणे जिल्हा ग्राहक मंचांनी दिला. हा आदेश अध्यक्ष उमेश जवळीकर, सदस्य क्षितिजा कुलकर्णी, सदस्य संगीता देशमुख यांच्या मंचाने दिला. ससाणे यांच्या वतीने अॅड. स्मिता माने, अॅड. प्रियांका मानकर यांनी काम पाहिले. मंगेश ससाणे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.